Beekeeping
Beekeeping Agrowon
यशोगाथा

Beekeeping : व्यावसायिक मधमाशीपालक अन् प्रशिक्षकही

Raj Chougule

कोल्हापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र जोतिबा हे प्रसिद्ध पवित्र ठिकाण आहेत. येथील डोंगराच्या पायथ्याशी गिरोली (ता. पन्हाळा) गाव आहे. ऊस (Sugarcane), भात (Rice), सोयाबीन (Soybean), भुईमूग आदी पिके येथे होतात.

येथील मोहन उत्तम कदम (वय ३९) यांची पन्हाळा- जोतिबा मार्गावर गावच्या मुख्य रस्त्यावर साडेतीन एकर शेती आहे. त्यात फळबाग व भाजीपाला आहे. वडील दूधसंकलन व्यवसाय (Milk Collection Business) करतात.

‘बीकॉम एमबीए’ची पदवी घेतल्यानंतर मोहन यांच्याकडे नोकरीची संधी होती. पण मधमाश्‍यांची (Beekeeping) आवड, त्यांच्यासह पर्यावरणाचे संवर्धन आणि स्थानिक रोजगार निर्मिती अशा दृष्टिकोनातून व्यावसायिक मधमाशीपालन करण्याचे निश्‍चित केले.

प्रशिक्षणापासून सुरुवात

सन २०१२ मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अंतर्गत प्रशिक्षण केंद्रात मधमाशीपालन विषयातील प्रशिक्षण घेतले. सातेरी जातीच्या मधमाश्‍यांच्या पंचवीस मधपेट्यांसोत व्यवसायाची सुरुवात केली.

या विषयातील काही व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घेतले. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे तसेच ‘नॅशनल बी बोर्ड’, नवी दिल्ली येथील अधिकारी व तज्ज्ञांच्या संपर्कातही मोहन राहू लागले. व्यावसायिक दृष्टिकोन जपताना एपिस मेलिफेरा जातीच्या मधमाश्‍यांचे संगोपन सुरू केले.

व्यवसायाचा विस्तार

१) मधसंकलन

सातत्य, धडपड व उद्योजकाचा दृष्टिकोन अंगीकारल्याने मोहन यांनी व्यवसायाची वृद्धी केली. आज दहा वर्षांचा दीर्घ अनुभव तयार झाला आहे.

सध्या त्यांच्याकडे पाचशे मधपेट्या आहेत. आपल्या मधपेट्या ते लातूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, चंद्रपूर, नागपूर तसेच राजस्थानात स्थलांतरित करतात.

त्यासाठी सुमारे आठ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तेथील विविध पिके उदा. मोहरी, कोथिंबीर, तूर, कांदा आदी पिकांत या पेट्या ठेवण्यात येतात. त्याद्वारे मध संकलन केले जाते.

२) ‘दख्खन हनी’ ब्रँडने विक्री

वर्षभरात अडीच ते तीन टन मध संकलन होते. दख्खन हनी त्याचा ब्रॅण्ड तयार केला आहे. पाव किलो (१५० रु.) व अर्धा किलो (३०० रु.) पॅकिंगमधून व्यापारी व ग्राहकांना विशेषतः जोतिबा, पन्हाळा मार्गावरील पर्यटकांना विक्री होते.

३) पेट्या परागीभवनासाठी देणे

सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आदी भागांतील शेतकऱ्यांना (प्रामुख्याने डाळिंब, कलिंगड, कांदा) मधपेट्या परागीभवनासाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात. प्रति पेटी प्रति महिना ९०० ते १००० रुपये शुल्क आकारले जाते. सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांचे नेटवर्क या माध्यमातून तयार केले आहे.

४) मधपेट्यांची विक्री

मधमाशीपालनात मिळणाऱ्या मेणाचा वापर करून मधपेट्याची ‘वॅक्स शीट’ तयार केली जाते. मधमाश्‍यांच्या वसाहती असलेल्या पेट्यांची प्रति पाच हजार रुपये दराने विक्री होते.

सर्व स्रोतांमधून वर्षाला एकूण १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते. राज्यातील विविध ठिकाणी प्रदर्शनामध्ये मधाबरोबर पेट्या व आवश्यक साहित्यविक्रीही केली जाते.

श्‍यास्त्रीयदृष्ट्या मधसंकलन

स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद, मधनिर्मितीतील अडचणी दूर करणे आदींमध्येही मोहन यांचा पुढाकार असतो. पूर्वी अश्‍यास्त्रीय पद्धतीने जाळून किंवा कीटकनाशकांची फवारणी करून पोळी व मध काढला जायचा.

यात मधमाश्‍यांची मोठी हानी व्हायची. स्थानिकांना त्याबाबत प्रशिक्षणच नव्हते. मात्र मोहन यांनी त्यासंबंधीचे तांत्रिक शिक्षण स्वतः घेतले आहे.

त्यामुळे कोल्हापूर पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत शास्त्रीय पद्धतीने मध व मेण संकलन करण्यासाठी त्यांना बोलाविले जाते व ते तत्परतेने सेवा म्हणून हे कार्य बजावतात देखील.

मधमाश्‍यांना या प्रक्रियेत कोणतीही इजा पोहोचत नाही. केवळ स्वतः हे काम करून न थांबता मोहन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्याचे काम अनेक वर्षांपासून अव्याहतपणे करताहेत.

आग्या मधमाश्‍या संवर्धनाचे काम

आतापर्यंत मोहन यांनी एक हजारांहून अधिक मधपोळी श्‍यास्त्रीय पद्धतीने काढण्यात यश मिळवले आहे. त्या माध्यमातून आग्या मधमाश्यांचे संवर्धन केले जात आहे. पोळे काढताना विशेष काळजी घ्यावी लागते.

सुरक्षा म्हणून विशिष्ट पद्धतीचा पोशाख परिधान करावा लागतो. नैसर्गिक पद्धतीने धूर करून मधमाश्‍यांना हानी न पोहोचवता पोळे काढण्याचे काम होते. पोळ्यातील मधाचा भाग व्यवस्थित काढून घेतला जातो.

मोहन यांना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयाचेही सहकार्य मिळते. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात ‘आत्मा’च्या वतीने त्यांना प्रशिक्षणाठी पाठबळ देण्यात आले आहे.

पर्यटकांसाठी ‘हनी गार्डन’ उभारणार

पर्यावरण संवर्धन आणि परागीभवनासाठी मधमाश्‍या अत्यंत गरजेच्या आहेत. त्या जगल्या, वाचल्या तरच जीवसृष्टी जगणार आहे. येत्या काळात आपल्या शेतात पर्यटकांसाठी मधमाशी संवर्धनाची महत्त्व सांगणारे ‘हनी गार्डन’ उभारणार असल्याचा मानस असल्याचे मोहन यांनी सांगितले.

मोहन कदम, ९१५८३७७७०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT