Processing Industry Agrowon
यशोगाथा

Agriculture Processing : प्रक्रिया उद्योगातून ‘प्रगती’ अन ‘वैभव’ही

Spices Production : प्रशिक्षण, मार्गदर्शन, चिकाटी, योजनांचा लाभ, सेवाभावी वृत्ती व ग्राहक तयार करण्याचे कौशल्य अशा विविध गुणांमधून त्यांनी डाळी व मसाले उद्योग भरभराटीला आणला आहे. प्रगती व वैभव हे उत्पादनांचे ब्रॅंड लोकप्रिय झाले आहेत.

 गोपाल हागे

Agriculture Success Story : वाशीम आकांक्षित जिल्हा म्हणून देशात ओळखला जातो. पावसावर आधारित शेतीपद्धती अधिक असल्याने उत्पन्नावर मर्यादा येतात. काही भाग बागायती आहे. परंतु उत्पन्नवाढीसाठी अनेक शेतकरी हिमतीने विविध मार्ग चोखाळत असतात. रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील दिलीप ज्ञानबा भालेराव हे त्यापैकीच एक आहेत.

त्यांची सहा एकर बागायती शेती आहे. त्यांनी नवनवीन पीकपद्धतीवर जोर दिला. भुईमूग, गहू, हरभरा, भाजीपाला यातून दोन पैसे अधिक मिळवले. भुईमुगाच्या टीएजी २४ वाणाचे विक्रमी बीजोत्पादन घेतले. आंध्रप्रदेशातील कृषी विज्ञान केंद्राला या बियाण्याचा पुरवठा केला.

प्रक्रिया उद्योगात पाऊल

शेतीला जोड व्यवसाय म्हणून भालेराव यांनी २०१७ मध्ये प्रक्रिया उद्योगात पाऊल ठेवले. करडा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ एस. के. देशमुख व अन्य तज्ज्ञांकडून या विषयात सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले. शासकीय योजनेतून मिनी डाळमिल अनुदानासाठी अर्ज केला. तो तत्काळ मंजूर झाला. यामुळे उत्साह वाढला. मालेगाव-रिसोड मार्गाला लागून असलेल्या आपल्या शेतातच डाळमिल युनिट सुरु केले.

सुरवातीला ५५ हजार रुपयांचा नफा मिळाला. पुरेसा अनुभव नसल्याने व यंत्रातून उतारा कमी मिळत असल्याने २० हजारांचा आर्थिक फटकाही सहन केला. पण हळूहळू अनुभव व कौशल्य भालेराव आत्मसात करीत गेले. उत्पादने व यांत्रिकीकरणाचा विस्तार केला. सन २०१९ पर्यंत उलाढाल पाच लाखांवर जाऊन पोचली. पुढे वर्षागणिक वाढ होत राहिली.

शेतकऱ्यांसाठी ठरला फायदेशीर उद्योग

भालेराव यांचा आजचा डाळमिल, धान्य स्वच्छता, मसाला प्रकल्प परिसरातील तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो आहे. दूरदूरहून शेतकरी, नागरिक या ठिकाणी आपल्याकडील धान्य आणून त्याची स्वच्छता, प्रतवारी करून घेतात. तूर, मूग, उडीद, हरभरा अशा विविध प्रकारच्या डाळीही या ठिकाणी बनवून देण्यात येतात. यासाठी भालेराव यांना प्रति क्विंटलमागे मोबदला मिळतो.

योजनांचे पाठबळ

भालेराव यांच्या या घौडदौडीत शासकीय योजनांचे पाठबळही महत्त्वाचे ठरले आहे. प्रशिक्षणासाठी स्पर्धाक्षम कृषी विकास योजनेचा लाभ झाला. याच योजनेतून डाळमिल उद्योगासाठी कर्ज मिळवले. पुढे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून यांत्रिककरणासाठी प्रस्ताव सादर केला. त्यासाठीही बँकेने १० लाखांचा कर्ज पुरवठा केला. त्यात साडेतीन लाख रुपयांचे अनुदान अद्याप हाती यायचे आहे. एकूण गुंतवणूक २५ लाखांची झाली आहे. त्यातून कांडणी यंत्र, आटा चक्की, डाळमिल, पापड निर्मिती यंत्र आदी विविध सामग्री घेणे शक्य झाले.

सेवाभावी वृत्ती व दर्जा राखला

उद्योग चालवताना सातत्याने सेवाभावी वृत्ती ठेवली. प्रत्येक उत्पादनाचा दर्जा टिकवला. यामुळे दरवर्षी ग्राहक जुळत गेले.आपल्या उत्पादनांना थेट ग्राहकांचे मार्केट तयार केले. शेतकरी, कर्मचारी, शहरी नागरिक विविध पदार्थ आवर्जून खरेदी करतात. डाळींसह मसाले, शेवया, पापड यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. उद्योगातून शिल्लक राहणारे घटक शेतकरी पशुखाद्य म्हणून घेऊन जातात. त्यासही मोठी मागणी तयार झाली असून पुरवठा करण्यात अपुरे पडत असल्याचे भालेराव सांगतात.

सर्वांच्या मदतीतून साधली प्रगती

जिद्द आणि चिकाटीतून भालेराव यांनी आर्थिक व कौटुंबिक प्रगती साधली. मालवाहतुकीसाठी चारचाकी वाहन घेतले. दुचाकी आली. शेतीत विविध प्रकारच्या सुधारणा केल्या. उद्योगासाठी इमारत बांधकाम करणे शक्य झाले. आपल्या प्रगतीचे श्रेय भालेराव कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ एस. के. देशमुख, त्यांचे सहकारी यांना देतात. मुख्य म्हणजे पत्नी सरस्वती, मुले विशाल व आकाश हे कुटुंबातील सदस्य देखील उद्योगात राबतात. प्रगती असे उद्योगाचे नाव असून पापडाचे ब्रॅंडिग वैभव नावाने केले आहे. आवश्‍यक सर्व शासकीय संमत्या, प्रमाणपत्रे आहेत. आज या उद्योगाने शेतीवरील आर्थिक भार जवळपास कमी केला आहे.

आश्‍वासक उलाढाल

ग्राहक तयार करण्यासाठी गावागावांमधून एका वाहन व त्यावर ध्वनीक्षेपक लावून ऑडिओ द्वारे उत्पादनांची जाहिरात वा प्रचार केला. माहितीपत्रके तयार करून ती वाटली. कृषी विज्ञान केंद्राचीही मदत झाली. विविध प्रदर्शनाचाही आधार घेतला. उद्योग व प्रयत्नांमध्ये सातत्य टिकवल्याने आजमितीला वार्षिक उलाढाल १५ लाखांपर्यंत पोचल्याचे भालेराव अभिमानाने सांगतात. एकेकाळी त्यांना इतरांच्या शेतात मजुरीला जावे लागे. आज त्यांनी या गृहोद्योगातून १० जणांसाठी रोजगार निर्माण केला आहे. खर्च वजा जाता वर्षाला ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा होतो.

उत्पादने व वार्षिक विक्री

हळद पावडर- ३ ते ४ क्विंटल

मिरची पावडर ५० ते ६० किलो

तूर डाळ २० क्विं.

उडीद-मूग डाळ प्रत्येकी २० क्विं.

हरभरा डाळ- १० क्विं.

पापड २ क्विं.

पशुखाद्य ४० क्विं.

दिलीप भालेराव- ९८२३४२८०६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT