Agriculture Processing : दीपालीताईचा राजगिरा लाडू, चिक्कीचा ब्रॅण्ड

Food Processing : गुणवत्तापूर्ण खुसखुशीत, चविष्ठ राजगिरा लाडू आणि विविध प्रकारच्या चिक्की निर्मितीतून बार्शीतील सौ. दीपाली धीरज साळुंखे यांनी स्वतःचा `सुप्रस` ब्रॅण्ड तयार केला आहे.
Agriculture Processing
Agriculture Processing Agrowon

सुदर्शन सुतार
Groundnut Processing : गुणवत्तापूर्ण खुसखुशीत, चविष्ठ राजगिरा लाडू आणि विविध प्रकारच्या चिक्की निर्मितीतून बार्शीतील सौ. दीपाली धीरज साळुंखे यांनी स्वतःचा `सुप्रस` ब्रॅण्ड तयार केला आहे. गेल्या बारा वर्षात सोलापूरसह लातूर, धाराशिव, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यात त्यांच्या उत्पादनांना वेगळी ओळख मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे बाजारपेठेचं मोठं केंद्र. डाळ मिलसारख्या विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायासाठी बार्शीची ओळख आहे. बार्शी शहरातील साळुंखे कुटुंबात २००७ साली दीपाली या सून म्हणून आल्या. दिपालीताईंचे पती धीरज आणि सासुबाई सुभद्राताई या पूर्वीपासून राजगिरा लाडू, चिक्की अशा खाद्यपदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करत. त्यावेळी त्यांच्याकडे लाडू,चिक्कीचे उत्पादन होत नव्हते. शहरातील घाऊक विक्रेत्यांकडून लाडू,चिक्की आणायचे आणि किरकोळ विक्री करायच्या. घरोघरी फिरुन लाडू,चिक्कीची विक्री केली जायची. मुख्यतः घरातील कुटुंबकर्त्या म्हणून सासुबाई सुभद्राताई या कामात अग्रभागी राहायच्या. पुढे दीपाली आणि त्यांचे पती धीरज हे विक्री व्यवसायात सक्रिय झाले. पती धीरज हे पदवीधर आहेत. नोकरी किंवा अन्य व्यवसायाचा विचार करण्यापेक्षा घरच्याच व्यवसायात प्रगती करूयात असात्यांनी विचार केला. २०११मध्ये साळुंखे कुटुंबीय राजगिरा लाडू, चिक्की निर्मितीत उतरले. दीपाली यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांच्यासाठी राजगिरा लाडू, चिक्की उत्पादन आणि विक्री या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. पण त्यांनी जिद्दीने या गोष्टी शिकून घेतल्या. आज संपूर्ण व्यवसाय स्वतः दीपालीताई सांभाळतात. राजगिरा लाडू, चिक्की उत्पादन ते विक्रीपर्यंतच्या सगळ्या पातळीवर त्या स्वतः काम पाहतात. गेल्या दहा वर्षात त्यांनी या व्यवसायाचा विस्तार केला आहे. यांत्रिकीकरणाचा वापर वाढवला आहे. प्रक्रिया उद्योगामध्ये पती आणि सासुबाईंची चांगली साथ त्यांना मिळाली आहे. मुलगी स्वरिता ही दहावीत आहे. तीही जमेल, तसा या व्यवसायामध्ये हातभार लावते.

गुणवत्तापुर्ण उत्पादनावर भर ः
राजगिरा लाडू आणि चिक्की हे सर्वाधिक उपवासाला लागणारे खाद्यपदार्थ आहेत. चिक्की ही तशी कायमस्वरुपी बाजारपेठेत मागणी असणारा खाद्य पदार्थ आहे. बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास आणि पूर्वीपासूनच विक्री व्यवसायात असल्याने त्यातील सर्व बारकावे आणि अनुभव दीपाली आणि त्यांचे पती धीरज यांच्या पाठीशी होता. त्यामुळे त्यांनी या व्यवसायाचा विचार केला.
राजगिरा लाडूची सुरुवातीची निर्मिती काहीशी कठीण असते. लाडूसाठी राजगिराच्या लाह्या बनवून, त्यापासून लाडू बनवला जातो. पूर्वी त्यासाठी गरम कढईत राजगिरा भाजत-भाजत त्यावर कापडाच्या साह्याने हात फिरवून लाह्या बनवल्या जायच्या. तेव्हा ही कामे स्वतः दीपाली आणि त्यांचे पती धीरज हे करायचे. पण अलीकडे त्यांनी स्वयंचलीत यंत्र घेतले आहे. आता त्यात राजगिरा टाकला की लाह्या तयार होतात. पूर्वी हाताने पॅकिंग केले जायचे, आता हव्या त्या आकारात स्वयंचलीत यंत्रावर पॅकिंग, लेबलिंग होते. सध्या त्यांच्याकडे पाच महिला आणि दोन पुरुष कामगार कार्यरत आहेत.

राजगिरा लाडू तयार करण्यासाठी लाह्यामध्ये गुळाचा पाक मिसळला जातो. या दोन्हीचे चांगले मिश्रण झाल्यानंतर गरम असतानाच त्याचे ठरलेल्या आकारातील लाडू बांधले जातात. चिक्कीसाठी चांगले भाजलेले, सोललेले शेंगदाणे घेतले जातात. शेंगदाण्यात गुळाचा पाक मिसळला जातो. मिश्रण गरम असतानाचा एका पाटावर ते ठराविक आकारात मिश्रण लाटले जाते. त्यानंतर कटरच्या साह्याने हव्या तेवढ्या आकारामध्ये चिक्की कापली जाते.

Agriculture Processing
Food Processing : चिक्की, लाडू उत्पादनांनी जागवली ‘उमंग’

पाच स्वादाची चिक्की ः
लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकाराच्या आकारातील राजगिरा लाडूंची निर्मिती केली जाते. याचबरोबरीने पाच प्रकारच्या चिक्की दीपालीताई तयार करतात. यामध्ये शेंगदाणा, गुडदाणी, खोबरा, तीळ आणि पीनट बटर असे प्रकार आहेत. याचबरोबरीने मागणीनुसार काजू आणि बदाम चिक्की तयार केली जाते. साधारणपणे २०० ते ५०० किलो या प्रमाणात ग्राहकांच्या मागणीनुसार चिक्की निर्मिती केली जाते.

उत्पादनांचा `सुप्रस` ब्रॅण्ड
अलीकडच्या काही वर्षात राजगिरा लाडू आणि चिक्कीला राज्यभरातून मागणी वाढली आहे. दिपाली ताईंनी या उत्पादनांचा `सुप्रस` ब्रॅण्ड तयार केला. ग्राहकांच्या मागणीचा अभ्यासकरून साधारणपणे २० ग्रॅम, ५० ग्रॅम, १०० ग्रॅम,२००ग्रॅम, ५०० ग्रॅम वजनाची चिक्की पॅकेट तयार केली आहेत. चिक्कीच्या संख्येनुसार पाच रूपये ते दिडशे रूपये अशी पॅकेटची किंमत आहे. राजगिरा लाडू ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. पॅकिंगनुसार १० ते ५० रूपये अशी किंमत आहे. याचबरोबरीने ग्राहकांच्या मागणीनुसार अर्धा ते एक किलो या प्रमाणात उत्पादनाची विक्री केली जाते.

Agriculture Processing
Milk Processing : दूध प्रक्रिया उत्पादनांचा तयार झाला ब्रॅण्ड

पाचशे किलो लाडू, एक हजार किलो चिक्कीची निर्मिती
आज बार्शीसह संपूर्ण सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर, पुणे, नगर आणि सातारा जिल्ह्यापर्यंत दिपालीताईंच्या उत्पादनांचा विस्तार झाला आहे. या जिल्ह्यात पन्नास मुख्य विक्रेते त्यांनी नेमले आहेत. त्यांच्या मार्फत किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडे उत्पादने पाठविली जातात. दरमहा सरासरी ५०० किलो राजगिरा लाडू आणि एक हजार किलो चिक्कीची निर्मिती होते. यातून दरमहा पावणे दोन लाखांपर्यंत उलाढाल होते. यातून कच्चा माल, वाहतूक खर्च, मजुरी यासह अन्य व्यवस्थापन खर्च वजा जाता दरमहा सरासरी पंचवीस हजारांचा निव्वळ नफा मिळतो. येत्या काळात नमकीन भेळ निर्मितीचे त्यांनी नियोजन केले आहे.

पुरस्काराने गौरव
दीपाली साळुंखे यांच्या प्रक्रिया व्यवसायाची दखल विविध संस्थांनी घेतली आहे. भारत विकास परिषद, लायन्स क्लब ऑफ बार्शी, रोटरी क्लब ऑफ बार्शी यासारख्या संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले आहे.
----------------------------------------
संपर्क ः दीपाली साळुंखे,९२८४७५७५१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com