गोपाल हागे
Edible Oil Production : अकोला जिल्ह्यात सिसा (उदेगाव) येथे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. केंद्रातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी अलीकडील काळातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे घाण्यावर खाद्यतेलनिर्मिती.
मात्र तेवढ्यापुरते न थांबता केव्हीकेने तेलनिर्मितीनंतर तयार होणाऱ्या उपउत्पादनापासून म्हणजे पेंडीचे (डी ऑइल्ड केक) मूल्यवर्धन करण्याचे ठरविले. आज समाजात आरोग्यविषयक जागरूकता कमालीची वाढली आहे.
दैनंदिन आहार पद्धती, आरोग्यवर्धक तेलांचा वापर याबाबत ग्राहक जागरूक झाला आहे. केव्हीकेने हीच संधी ओळखून त्यानुसार या मूल्यवर्धनाचे उद्योगात रूपांतर करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.
प्रकल्पातून मिळाली मूल्यवर्धनाची दिशा
या केव्हीकेकडे सन २०२०- २१ मध्ये एक प्रकल्प येऊ घातला. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व सी-डॅक कोलकत्ता यांच्यातर्फे संयुक्तपणे चालवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे ‘शुद्धता’ असे नाव होते.
शेंगदाणासारख्या तेलातील भेसळ निश्चित करण्यासाठी ई-नाक आणि ई-जीभ या इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर हा प्रकल्प होता. त्यात केव्हीकेकडे नमुना पृथ्थकरणाचे काम होते. त्याचबरोबर तेलनिर्मितीत तयार होणाऱ्या पेंडीचे अर्थात ‘डी ऑइल्ड केक’ चे मूल्यवर्धन करण्याची दिशा केंद्राला मिळाली.
त्यातून केव्हीकेच्या गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ज्ञ कीर्ती देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांना केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळाले. पेंडींपासून विविध खाद्यपदार्थांचे प्रयोग व रेसिपी तयार होऊ लागली.
विविध पदार्थांची निर्मिती
आज या पेंडीपासून विविध पदार्थ तयार करण्यास केव्हीकेला यश आले आहे. तेलांमध्ये शेंगदाणा, तीळ, नारळ, बदाम आदींचा समावेश आहे. शेंगदाणा तेलाचे वार्षिक उत्पादन तीनहजार लिटर असून त्याचा दर २९० रुपये प्रतिलिटर आहे.
बदाम तेलाचा दर लिटरला २५०० रुपये आहे. पेंडीचा समावेश करून ‘मिक्स चटणी’, खोबऱ्याची तसेच तिळाची चटणी तयार केली आहे. त्याचे दर किलोला ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तेले, चटणी, व विविध ढेपा यांच्या विक्रीतून केव्हीकेने १२ लाख ९५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
खर्च वजा जाता सुमारे पाच लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. तेल उत्पादन वाढविल्यास व उपलब्ध यंत्रसामग्रीच्या क्षमतेनुसार पूर्ण वापर केल्यास निव्वळ नफ्यात अजून काही पटीने वाढ शक्य आहे.
कच्चामालाचा वापर
उद्योगासाठी शेंगदाणा, नारळ, तीळ, बदाम आदी कच्चा माल अकोला येथील घाऊक बाजारपेठेतून आणला जातो. शेंगदाण्याचे एक लिटर तेल काढण्यासाठी अडीच किलो शेंगदाणा वापरला जातो.
शेंगदाण्यामध्ये ४० टक्के, तिळात ४० ते ४३ टक्के, नारळामध्ये ५५ ते ५८ टक्के, बदामात ४० ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण आहे.
केक, शंकरपाळे आदींचेही उत्पादन
याशिवाय शंकरपाळे, तीळ व शेंगदाणा चिक्की, टॉफी, कप केक, चॉकलेट बॉल, कुकीज आदी पदार्थांची निर्मिती देखील केली आहे. हे पदार्थ तयार करताना त्यातील घटकांचा केलेला समावेश प्रातिनिधीक स्वरूपात पुढीलप्रमाणे.
शंकरपाळे - मैदा ७० ग्रॅम, शेंगदाणा ढेप ३० ग्रॅम, पोहे ५० ग्रॅम, मसाला १६ ग्रॅम, तेल ४००मिलि.
तीळ चिक्की- तीळ ३१.५ ग्रॅम,, शेंगदाणा ढेप १३.५ ग्रॅम, गूळ ४५ ग्रॅम, तूप ५ ग्रॅम, मध ५ मिलि)
टॉफी- शेंगदाणा ढेप पावडर ३० ग्रॅम, आल्याचा रस ५ मिली, मीठ २ ग्रॅम, मध ३० ग्रॅम
कप केक- मैदा १९.२५ ग्रॅम, शेंगदाणा ढेप ८.२५ ग्रॅम, साखर ३० ग्रॅम
उत्पादनांचे ‘प्रमोशन’
सर्व उत्पादनांसाठी संपदा हा ब्रॅण्डनेम तयार करण्यात ला आहे. त्यासाठी पेट बॉटल तसेच उत्पादननिहाय अर्धा, एक, पाच लिटर, शंभर ग्रॅम असे वजनी पॅकिंग निवडण्यात आले आहे. डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बीज प्रमाणीकरण विभाग, आकाशवाणीसह अन्य शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी ही उत्पादने नियमित वापरत आहेत.
कृषी विभागामार्फत आयोजित प्रदर्शनांमधूनही त्यांची विक्री होते. दर महिन्याला ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. या उत्पादनांसाठी ‘फूड सेफ्टी’ विषयक केंद्रीय संस्थेचे प्रमाणपत्र घेतले आहे. वजने व मापे प्रमाणित केली आहेत.
उद्योग बनला प्रशिक्षणाचे केंद्र
केव्हीकेचा तेलघाणी उद्योग खरे तर उत्पादनांसह आता विविध योजनांमधील लाभार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकाचेही स्थळही ठरला आहे. या ठिकाणी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
त्यामध्ये शेतकऱ्यांना तेल प्रक्रियेवर प्रात्यक्षिक देण्यात येते. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर अकोट, राजंदा, एरंडा, अकोला, बार्शीटाकळी येथील काही जणांनी तेल प्रक्रिया उद्योग सुरु देखील केला आहे.
कीर्ती देशमुख ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ज्ञ, गृहविज्ञान,केव्हीके, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.