Agricultural Success : सततच्या दुष्काळी स्थितीमुळे उत्पन्नाची जोखीम वाढली आहे. ती कमी करण्यासाठी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण करून परभणी जिल्ह्यातील शेतकरी ताजे उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांकडे वळले आहेत.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात तुलनेने अधिक सिंचनासाठी उपलब्ध असते. त्यामुळे परभणी तालुक्यातील या भागाची भाजीपाला उत्पादक पट्टा म्हणून ओळख तयार झाली आहे.
येथील शेतकरी वेलवर्गीय, शेंगवर्गीय, कंदवर्गीयसह पालेभाज्यांचे बारमाही उत्पादन घेतात. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. पैठण येथील जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाला की सिंचनासाठी पाण्याची चिंता मिटते.
श्रावणातील मागणी व उत्पादन
परभणी तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या उपलब्धेनुसार तसेच वर्षभरातील विविध सण, ऋतू या अनुषंगाने बाजारपेठेतील मागणी विचारात घेऊन बारा महिने विविध भाजीपाल्यांच्या लागवडीचे नियोजन करतात. जून महिन्यात लागवड केलेला भाजीपाला श्रावणाच्या हंगामात विक्रीसाठी उपलब्ध होतो.
त्यात मुळा, काकडी, दोडके, कारले, हिरवी मिरची, गवार, चवळी, वाल, भेंडी, पारसे दोडके, दुधी भोपळा, देवडांगर, काशीफळ, फ्लॉवर, कोबी, पालक, शेपू, टोमॅटो, ढोबळी मिरची आदींचा समावेश असतो. श्रावणात उपवासाचे दिवस असतात. त्यादृष्टीने यातील काही विशिष्ट भाज्यांना अधिक मागणी असते.
थेट विक्री करतात शेतकरी
विविध ठिकाणचे आठवडे बाजार तसेच परभणी शहरात शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्था तयार केली आहे. परभणी शहरापासून १० ते १५ किलोमीटर अंतरावरील गावांमधील अल्पभूधारक शेतकरी छोट्या छोट्या क्षेत्रावर दोन ते २० गुंठे क्षेत्रावर विविध भाज्या घेतात.
इटलापूर, बोरवंड, मिरखेल, खानापूर, देशमुख पिंपरी, दैठणा, शिर्शी, सहजपूर, जवळा, ब्रह्मपुरी, उमरी, मांडाखळी, उजळंबा, बाभळगाव आदी काही गावांचा उल्लेख येथे करता येईल. सिंगणापूर हे जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी सर्वांत प्रसिद्ध गाव आहे.
या सर्व गावांमधील शेतकरी दररोज सकाळी तसेच सायंकाळी परभणी शहरात वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतः थेट विक्री करतात. त्यामुळे नफा शिल्लक रहातो.
मोठ्या क्षेत्रावर उत्पादन घेणारे शेतकरी परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेतात. आदल्या दिवशी काढणी, स्वच्छता, प्रतवारी केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रेटमध्ये भरून गावातून जाणाऱ्या वाहनांद्वारे बाजारात माल पाठविला जातो.
शेतकऱ्यांचे अनुभव
इटलापूर (ता. जि. परभणी) येथील बाळासाहेब पुंड यांची पाच एकर शेती आहे. त्यापैकी एक एकरावर वर्षभरात अल्प कालावधीत येणाऱ्या विविध भाजीपाल्यांची छोट्या- छोट्या क्षेत्रावर ते लागवड करतात. आई, वडील, पत्नीसह ते शेतात राबतात. दरवर्षी एक एकर हळदीत गादीवाफ्यावर हिरवी मिरची, कोथिंबीर, चुका, शेपू अशी आंतरपिके ते घेतात. श्रावणात मुळ्याला अधिक मागणी असते. ती ओळखून दरवर्षी अर्ध्या गुंठ्यात मुळ्याची लागवड असते. त्यास प्रति नग पाच ते दहा रुपये दर मिळतो. दररोज परभणी येथे ते स्वतः विक्री करतो. दररोज एक हजार ते दीड हजार रुपये उत्पन्न ते मिळवतात.बाळासाहेब पुंड ९५२७४५६०३८
अंगद सोगे (सिंगणापूर) यांची संपूर्ण चार एकर शेतीत बारमाही भाजीपाला लागवड असते. टोमॅटो, वांगी, दोडकी, फ्लॉवर, काकडी, कारले आदींच्या उत्पादनावर भर असतो. गेल्या काही वर्षांपासून गादीवाफ्यावर पॉली मल्चिंगवर ते लागवड करतात. परभणी येथील मार्केटमध्ये गावातील वाहनाद्वारे भाजीपाला विक्रीसाठी पाठवतात. बाजारातील दरांच्या तेजी- मंदीवर नफा अवलंबून असतो. मात्र उत्पादनातील सातत्य कायम ठेवले आहे.अंगद सोगे ७९२२२४९८०१
एकनाथराव साळवे (सिंगणापूर) यांच्या कुटुंबाची १०० एकर शेती आहे. सिंचनासाठी विहिरी, शेततळ्यांची सुविधा आहे. साधारणतः २० एकरांत भाजीपाला लागवड असते. यंदा ढोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, हळद, आले लागवड आहे. पुणे, हैदराबाद येथेही ते भाजीपाला विक्रीसाठी पाठवतात.एकनाथराव साळवे ९८६०७९१८५८
पंडित थोरात (खानापूर) यांचे तीन एकरांपैकी दोन एकर क्षेत्र विविध भाजीपाला पिकांसाठी राखीव असते. श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते. या काळात विशिष्ट भाज्यांना मागणी असते. अन्य शेतकरी फारशी लागवड करत नसलेल्या अंबाडी, तांदूळजा, कुंजर, राजगिरा अशा भाज्यांचे उत्पादन ते घेतात. यंदा वेलवर्गीय देवडांगर (गोलभोपळा) दीड एकर तसेच एक एकरात काशीफळ उत्पादन घेतले. सणवार, उत्सव लक्षात घेऊन ते भाज्यांसह फुलांचेही उत्पादन घेतात. थेट विक्री करतात.पंडित थोरात ८०८७९४४३६१
मिरखेल येथील संभाजी गायकवाड यांची साडेचार एकरांपैकी दोन एकरांत विविध भाजीपाला लागवड दोडक्यात आंतरपीक तसेच सलग १० गुंठे क्षेत्रावर कोथिंबीर लागवड आहे. दररोज सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत शेतीतील कामे केली जातात. दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाजीपाला, फुलांची काढणी केली जाते. आपल्याबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांचा भाजीपाला देखील ते परभणी येथे घेऊन येतात. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत थेट विक्री करून गावी परत जातात.संभाजी गायकवाड ९७६३५७१५५९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.