Red Kandhari Cow
Red Kandhari Cow Agrowon
यशोगाथा

लाल कंधारीचे जतन, संशोधन अन प्रसारही

माणिक रासवे  

लाल कंधारी (Red Kandhari Cow) हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश (Desi Gowansh) आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते. कंधार, लोहा, मुखेड, बिलोली तसेच परभणी जिल्ह्यातील पालम, गंगाखेड तालुक्यातील शेतकरी या गायीचे पालन मोठ्या प्रमाणात करतात. संपूर्ण लाल रंग, मस्तक मध्यम आकाराचे, डोळे लांबट व काळे, नाकपुडी काळी, लहानसर, वशिंड आकर्षक व वाढेल तसेच काळसर होत जाते. कास गोलाकार व गुलाबी, चारही सड समान उंचीचे व लालसर असतात. दुधाची शीर स्पष्ट व सरळ असते. कातडी अत्यंत चमकदार व खूर करड्या रंगाचे व टणक असतात.

बहुउद्देशीय गोवंश

लाल कंधारी हा बहुउद्देशीय गोवंश आहे. गायी दूध उत्पादनासाठी तर बैल चपळ व ओढकामासाठी आदर्श असतात. कोरडे हवामान, दुष्काळ सदृश परिस्थितीत ही जनावरे तग धरुन राहतात. कालवड प्रथम माजावर येण्याचे वय १८ ते २४ महिने तर दोन वेतांतील अंतर १४ ते १६ महिने असते. दुग्धातील स्निग्धांश ३ ते ४.५ टक्के असते. भाकड कालावधी १२० ते १५० दिवसांचा असतो.

केंद्राचा विकास

परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय पूर्वी नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न होते. १८ मे १९७२ मध्ये ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत समाविष्ट झाले. सुरवातीची काही वर्षे जर्सी प्रजातीशी संकरीकरण करून लाल कंधारी गायीच्या दुग्धोत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले. सन २००० मध्ये धोरणात्मक बदलानंतर लाल कंधारी वंशाचा शुध्द पैदास कार्यक्रम राबविला जात आहे. त्यासाठी प्रक्षेत्र संकुल प्रशिक्षण केंद्र विकसित केले आहे..राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) सोबत सामंजस्य करार केले आहेत.

शुध्द जातीचे जतन, संशोधन

लाल कंधारी शुद्ध गोवंशाचे संवर्धन, प्रजनन क्षमता सुधारणा, आरोग्य सुधारणा घडवून दूध उत्पादकता वाढविणारे तंत्र अवलंबणे, गोवंश वितरण व प्रसार आदी उद्दिष्टे ठेऊन केंद्र कार्यरत आहे. त्यासाठी ५० वर्षांपासून शुध्द जातीचे जतन केले आहे. जनावरांतील वंध्यत्वावर उपचार केले जातात. गोवंशाचा रक्तगट, भारक्षमता, दीर्घ आयुष्यक्षमता या अनुषंगाने अभ्यास सुरू आहे. हा संसर्गजन्य आजारांपासून दूर असणारा गोवंश आहे. युरियाची प्रक्रिया केलेला चारा खाऊ घातल्यास वासरांची वाढ व्यवस्थित होते असे अभ्यासात आढळले आहे. स्थानिक चारापिकांचा अभ्यास करून त्यांचा पोषणासाठी वापर होतो.

केंद्रातील सुविधा

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य म्हणून डॉ. नितीन मार्कंडेय यांच्याकडे जबाबदारी आहे तर डॉ.सुहास अमृतकर प्रक्षेत्र व्यवस्थापन पाहतात. सध्या लहान मोठी मिळून सुमारे १०० लाल कंधारी जनावरे आहेत. मुक्तसंचार पध्दतीचा गोठा, पाणी पिण्यासाठी हौद, नळांच्या तोट्यांव्दारे पाणी पिण्याची व्यवस्था, सिमेंटच्या पत्र्याचा निवारा आदी व्यवस्था आहेत. छतावर हुरीकेन प्रकारचे वायूविजन यंत्र बसविले आहे. त्यामुळे गोठा कोरडा रहातो. कीटकांचा प्रादुर्भाव जाणवत नाही. गोठ्याभोवती कडुनिंबाच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यामुळे बाह्य परोपजीवींची संख्या कमी झाली आहे. गोठा

तसेच पाण्याच्या हौदाशेजारी पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली आहे. शेणाच्या खड्ड्यावर पॉलीथीनयुक्त आवरण असल्याने कीटकांची उगमस्थाने नष्ट होतात. पशुधनाच्या शेण, रक्त नमुन्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. आतड्यातील तसेच रक्तातील परजीवींचा प्रादुर्भाव आढळल्यास औषधोपचार केले जातात. रोगप्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात.

ठळक उपक्रम

-शून्य परोपजीवी अभियान राबविण्यात आले. लंपी स्कीन आजारावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम यशस्वी.

-दरवर्षी स्थानिक पशु प्रदर्शनांत केंद्राचा सहभाग. आजवर सुमारे तीनशे कालवडी व गोऱ्हे यांचे शेतकऱ्यांना वाटप.

-महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळास शुध्द पैदाशीचे गोऱ्हे (सिद्ध वळू) रेत मात्रा निर्मितीसाठी वितरित करण्यात येतात.

-दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी लाल कंधारी वार्षिक महोत्सवाचे आयोजन.

शेतकऱ्यांसाठी तीन व्हॉटस ॲप ग्रुप आहेत.

-प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी सायंकाळी गोरजा कट्टा उपक्रम. (दोन वर्षांपासून).

यात अडीअडचणी व व्यवस्थापनावर विचारमंथन.

-गोमूत्र अर्क निर्मिती सयंत्राचे प्रात्याक्षिक.

प्रवेशव्दारावर शिल्प

‘नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस ’ संस्थेकडून लाल कंधारी गोवंशाला ‘इंडिया कॅटल ११०० -आरके-०३२४’ हा राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी क्रमांक मिळाला आहे. याची आठवण सदैव स्मरणात राहावी व प्रेरणादायी म्हणून २०१८ मध्ये महाविद्यालयाच्या दर्शनीय भागात या गोवंशाची सवत्स शिल्पकृती प्रेरणादायक स्वरूपात बसविली आहे.

संपर्क -

डॉ.नितीन मार्कंडेय- ९४२२६५७२५१

डॉ.सुहास अमृतकर- ८७८८२७३४७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

SCROLL FOR NEXT