Paddy Farming Agrowon
यशोगाथा

Paddy Farming : पट्टा पद्धतीच्या भात लागवड तंत्रातून मजूरसमस्येवर मात

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Paddy Plantation Technique : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका भातशेतीचे आगर समजला जातो. अन्य पिकांप्रमाणेच भातशेतीतही मजुरांची टंचाई जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिकीकरण किंवा चारसूत्री, एसआरटी, पट्टापद्धत अशा सुधारित लागवड तंत्रज्ञान पद्धतीकडे वळले आहेत. तालुक्यातील भदलवाडी येथील अनिल मारुती भधाले यांची तीन एकर शेती आहे. दरवर्षी खरिपात भात हेच त्यांचे मुख्य पीक असते.

भातशेतीतील प्रयोग

भधाले यांची शेती तीन ठिकाणी आहे. पैकी दोन ठिकाणचे क्षेत्र काहीसे कोरडवाहू आहे. पाऊस व ओढा हेच पाण्याचे स्रोत आहेत. तीनही ठिकाणी प्रत्येकी अंदाजे १५ गुंठे क्षेत्र ते भातासाठी देतात. मजुरांची समस्या व समाधानकारक उत्पादन या बाबी लक्षात घेऊन त्यांनी सुधारित तंत्राचा वापर सुरू केला आहे. तीनपैकी एकेठिकाणी एसआरटी, दुसरीकडे चारसूत्री तर मागील दोन वर्षांत तिसऱ्या १५ गुंठ्यांत पट्टा पद्धतीने भधाले भात लागवडीचे प्रयोग करीत आहेत. इंद्रायणी हेच त्यांचे मुख्य वाण असते.

पट्टा पद्धतीचे लागवड तंत्र

वडगाव मावळचे कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी भात लागवडीच्या पट्टा पद्धतीचे तंत्र विकसित केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भधाले यांनी हा प्रयोग राबवला आहे. या पद्धतीत १७५ सेंटिमीटर रुंदीचा पट्टा तयार केला जातो. त्यामध्ये भाताच्या आठ ओळी घेतल्या जातात. त्यानंतर ४० सेंमी अंतर सोडले जाते. त्यानंतर पुन्हा १७५ सेंमी.चा पट्टा अशी पद्धती ठेवली जाते. लोखंडी गज व सुतळी किंवा नायलॉन दोरींच्या साह्याने लागवडीसाठी फ्रेम तयार केली जाते. त्याच्या साह्याने कमी मजुरांमध्ये, कमी श्रमामध्ये व कमी वेळेत लागवड पूर्ण करता येते.

या पद्धतीत रोपांची संख्या नियंत्रित राहते. हेक्टरी सुमारे एक लाख ८७ हजार रोपे बसतात. दोन ओळीतील अंतर २० सेंमी, तर दोन रोपांतील अंतर २५ सेंमी. असते. एकरी लागवडीसाठी एरवी १५ ते १६ मजुरांची गरज भासत असेल तर पट्टा पद्धतीत हे काम ७ ते ८ व्यक्तीमध्ये व एक ते दोन दिवसांत करणे शक्य होते. भधाले तण उगवणीच्या आत तणनाशकाचा तर लागवडीनंतर २४ ते २५ दिवसांनी युरिया डीएपी ब्रिकेट्‍सचा वापर करतात. पट्टा पद्धतीमुळे ब्रिकेट खोचणे तसेच कीडनाशके किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणेही त्यांना सोपे झाले आहे. दाणे भरतेवेळी ते एका टॉनिकचा वापर करतात. कृषी विभागाच्या प्रिया पाटील यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.

मिळणारे उत्पादन

सुधारित लागवड तंत्राचा वापर सुरू केल्यानंतर भधाले यांना उत्पादनवाढ करणे शक्य झाले आहे. सध्या पट्टा पद्धतीत त्यांना प्रति १५ गुंठ्यांत ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. एकरी हिशेबाने मागील दोन वर्षांत २८ ते ३२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा एकरी ४० क्विंटल उत्पादनाचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. दोन वर्षे बियाणे घरचेच वापरण्यात येते. त्यामुळे त्यावरील खर्चात बचत होते. एकरी खर्च सुमारे १० हजार रुपयांपर्यंत येतो. कृषी विभागाने २०२२ मध्ये राबविलेल्या पीक स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवण्यात भधाले यशस्वी झाले आहेत. तसे प्रमाणपत्र कृषी विभागाकडून त्यांना मिळाले आहे. तालुक्यात प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

ग्राहकांना असते तांदळाची प्रतीक्षा

भधाले भात भरडून राइस मिलमधून तांदूळ तयार करून घेतात. आठवडी बाजारात ते प्रति किलो ६० रुपये दराने त्याची थेट ग्राहकांना विक्री करतात. आपल्या तांदळाला इतकी मागणी असते की ग्राहक कायम प्रतीक्षेत असतात असे त्यांनी सांगितले. बोधलेबुवा शेतकरी बचत गट त्यांनी स्थापन केला असून, त्याचे ते अध्यक्ष आहेत. कृषी विभागाचे कृषिमित्र म्हणूनही ते काम करतात. शेतीत पत्नी मनीषा यांची मोलाची साथ त्यांना लाभते.

पट्टा पद्धतीचे तंत्र

कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे म्हणाले, की अलीकडे मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक वेळा मजुरांचा वयोगट थोडा अधिक असेल तरी त्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन लागवड कष्टाची होऊन जाते. सर्वच सुधारित लागवड पद्धती चांगल्याच आहेत. पण मजुरांची तीव्र टंचाई व मजूरबळाची कार्यक्षमता लक्षात घेऊन पट्टा पद्धती मी विकसित केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या फ्रेमला केवळ ५० ते ६० रुपये खर्च येतो. अशा १० फ्रेम्स तयार करून घेतल्या तरी सर्व मिळून ७००रुपयांपर्यंतच खर्च येतो.

पट्टा पद्धतीचे होणारे फायदे

नियंत्रित पद्धतीने रोप लागवड करता येते.

युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर होतो सोपा.

रोपांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून हवा खेळती राहते. त्यामुळे तापमान नियंत्रणात राहते. रोग-किडीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

खते व कीडनाशके फवारणी होते सुलभ.

यंत्राद्वारे भात कापणी शक्य.

भात लोळण्याचा धोका कमी.

तण नियंत्रण सोयीचे होते.

अनिल भधाले ९६०४७६९३५२

नवीनचंद्र बोऱ्हाडे ९४०४९६३९७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT