Poultry Business Agrowon
यशोगाथा

Broiler Poultry Business : दुष्काळी माणमध्ये आधुनिक ‘पोल्ट्री’

Poultry Farming : सातारा जिल्ह्यात माण या दुष्काळी तालुक्यातील दीडवाघवाडी येथील महेश आणि सुहास या दीडवाघ बंधूंनी सुमारे १० वर्षांपूर्वी ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायास सुरुवात केली. एकेक अनुभव घेत, सातत्यातून आणि कौशल्य मिळवत आज आधुनिक अशा पर्यावरण नियंत्रित पोल्ट्रीपर्यंत व्यवसायाचा यशस्वी विस्तार केला आहे.

विकास जाधव : अॅग्रोवन वृत्तसेवा

विकास जाधव

Farmer Success Story : सातारा जिल्ह्यातील माणची सदैव दुष्काळी तालुका अशी ओळख आहे. साहजिकच शेतीला आर्थिक आधार म्हणून येथील शेतकरी दुग्ध, शेळी, कुक्कुटपालन असे पूरक व्यवसाय करतात. तालुक्यातील दीडवाघवाडी या छोट्या गावात महेश व सुहास हे दीडवाघ बंधू राहतात.

आई मंगल व वडील यांच्यासह हे दोघे बंधू पूर्वी मुंबई येथे राहायचे. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यांची २२ एकर शेती आहे. मुंबईपेक्षा गावीच शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण करता येईल असे केमिकल डिप्लोमा घेतलेल्या महेश यांना वाटायचे.

पण दुष्काळी भागात शेतीमधून अपेक्षित उत्पादन व उत्पन्न मिळण्याची शाश्‍वती नव्हती. मात्र कमी पाण्यात ‘पोल्ट्री’ हा चांगला पर्याय होऊ शकतो हे त्यांनी जाणले. फलटण येथे करार पद्धतीचा पोल्ट्री व्यवसाय पाहण्यात आला. त्याची सर्व तांत्रिक माहिती व आर्थिक गणिते समजून घेत त्यात उतरण्याचे नक्की केले.

सुरू केला पोल्ट्री व्यवसाय

वयाच्या २४ व्या वर्षी २०१३ च्या दरम्यान महेश मुंबईहून गावी परतले. भावाचीही साथ मिळाली. दहा ते बारा लाख रुपये खर्चून १७० बाय ३० फूट आकाराचे पाच हजार पक्षी क्षमतेचे शेड उभारले. मूळ इंडोनेशिया येथील कंपनीच्या पुणे येथील शाखेसोबत करार केला.

चार हजार पक्ष्यांची बॅच घेत संबंधित कंपनीस पक्ष्यांची विक्रीही केली. हळूहळू व्यवसायातील बारकावे कळू लागले. अर्थशास्त्राचा अभ्यास होऊ लागला. आत्मविश्‍वास वाढल्यानंतर २०१५ मध्ये २०० बाय ३० फूट आकाराचे सहा हजार पक्षी क्षमतेचे दुसरे शेड उभारले. दोन्ही शेडमधून मिळून ११ हजार पक्षांच्या बॅचेस घेतल्या जात होत्या.

ईसी युनिटची उभारणी

दरम्यान, करार शेतीत कंपनीकडून पर्यावरण संतुलित (इन्व्हॉयर्न्मेंटल कंट्रोल- ईसी) पोल्ट्री युनिट उभारणीचे महत्त्व पटवून देण्यात येत होते. विचारांती दोन्ही बंधूनी व्यवसायात तयार झालेले भांडवल, वडील व मोठे बंधू आनंद यांच्या आर्थिक मदतीवर आधारित ईसी युनिट उभारण्याचे नक्की केले.

दोनपैकी एका शेडमध्ये कंट्रोल पॅनेल, डीपी, जनरेटर युनिट, मोठे फॅन, फीडर (खाद्य व्यवस्था), पाणी यंत्रणा असा सर्व बदल केला. युनिटसाठी ४० ते ४२ लाख खर्च आला. यात एक बॅच यशस्वी घेतली असून दुसरी अंतिम टप्प्यात आहे.

व्यवस्थापनातील बाबी

एक दिवस वयाची पिले, औषधे, खाद्य व मार्गदर्शन अशा सर्व बाबींचा संबंधित कंपनीकडून पुरवठा.

प्रत्येक बॅचनंतर शेडमध्ये स्वच्छता, सर्व घटकांचे निर्जंतुकीकरण.

लसीकरण वेळापत्रक तयार करून त्यानुसार वर्षभर हा कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका कमी होऊन मरतुक टाळली जाते.

शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी ४० बाय ३० फूट आकाराची टाकी. सामू वेळोवेळी तपासून पाणी पिण्यासाठी देण्यात येते. पाण्याच्या पाइपमध्ये शेवाळ वाढू नये यासाठी वेळोवेळी त्यांची स्वच्छता.

उंचावर उभारणी केल्यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत. त्यामुळे पक्षी निरोगी राहून वाढ आणि आरोग्य उत्तम राहते.

दहा वर्षांत मिळालेल्या अनुभवातून व्यवस्थापन तंत्रात वेळोवेळी बदल.

व्यवसायाचे अर्थकारण

व्यवसायात आई-वडील, मोठे बंधू यांच्यासह शोभा (महेश यांची पत्नी), राणी (सुहास यांची पत्नी) यांची मोलाची मदत होते. कुटुंबाच्या एकीमुळेच मजुरीवरील खर्च कमी करता आला. आज ५० ते ६० टक्के नफा या व्यवसायातून मिळतो.

पोल्ट्रीला शेतीची चांगली जोड दिली आहे. सहा एकर केशर आंबा बाग व डाळिंब लागवड आहे. येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार, कृषी पर्यवेक्षक हरिभाऊ वेदपाठक यांचे मार्गदर्शन मिळते.

ईसी पोल्ट्री युनिटचे होत असलेले फायदे

तापमान, आर्द्रता, सिंचन यंत्रणा (फॉगर्स), खाद्य- पाणी अशा सर्व बाबी स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित करता येतात. दूर अंतरावर राहून ‘मोबाइल’द्वारेही ही यंत्रणा चालवणे शक्य होते.

खुल्या (पारंपरिक) पोल्ट्रीत वर्षाला पाच ते सहाच बॅचेस घेता येतात. याउलट या पोल्ट्रीत सात ते आठ बॅचेस घेता येतात.

पक्षी मरतुकीचे प्रमाण खूप कमी राहते.

खुल्या पोल्ट्रीत जिथे चारहजार पक्षी बसतात. तेथे या युनिटमध्ये आठ हजारांपर्यंत पक्षी बसतात. पक्ष्यांची वाढ चांगली होते. उत्पादनखर्च कमी होऊन उत्पादनक्षमता व गुणवत्ता वाढते.

खुल्या पोल्ट्रीत पक्ष्यांना प्रति किलो साडेसहा ते सात रुपये दर मिळतो. त्या तुलनेत येथील पक्ष्यांना नऊ रुपये ३० पैसे असा वाढीव दर मिळतो.

कोणा मजुराची मदत भासत नाही.

महेश दीडवाघ ९८९२९७७५३१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT