
Pune News: राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची चांगलीच संततधार सुरू आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे. सोमवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंत ताम्हिणी, शिरगाव घाटमाथ्यावर सर्वाधिक १७५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
या पावसामुळे अजूनही धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा काही प्रमाणात सुरुवात केली होती. मागील चार ते पाच दिवसांत राज्यातील विविध भागांत चांगलाच पाऊस पडला. कोकणात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक प्रमाणात सरी बरसत आहेत.
मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढला असून सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात जोरदार वादळीवारे वाहत आहेत. करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पावसाने सोमवारी (ता. २८) सकाळपासून उघडीप दिली आहे. रविवारी दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. रात्री उशिरा काही भागात जोरदार सरी कोसळल्या. घाट परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली.
पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. घाटमाथ्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपात्रात वाढ असली तरी वाढीची गती कमी होती. कोदे धरण क्षेत्रात विक्रमी १८२ मिलिमीटर पाऊस झाला तर कुंभी धरण क्षेत्रात १५४ मिलिमीटर पाऊस झाला.
कुंभी प्रकल्पाच्या विद्युत गृहातून ३०० तर चक्राकार दरवाजातून ४३७ असे एकूण ७३७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून सद्यःस्थितीला १४ हजार ८८० क्युसकने विसर्ग सुरू आहे.
गेल्या चोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रात ४८ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक, नगर भागाच्या पश्चिम पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने गंगापूर, भंडारदरा, निळवंडे या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडला आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर कमी झाला आहे. पूर्व भागात काही प्रमाणात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.