Pomegranate Cultivation : एकेरी खोड, घनपद्धतीने डाळिंब लागवड

स्वअभ्यास, अनुभवातून बैरागवाडी (जि. सोलापूर) येथील प्रवीण माने यांनी विविध प्रयोग करून व तंत्रज्ञान वापरून डाळिंब बागेतील समस्या सोडवल्या आहेत.
Pomegranate Cultivation
Pomegranate CultivationAgrowon

स्वअभ्यास, अनुभवातून बैरागवाडी (जि. सोलापूर) येथील प्रवीण माने यांनी विविध प्रयोग करून व तंत्रज्ञान वापरून डाळिंब बागेतील (Pomegranate Gardens) समस्या सोडवल्या आहेत. एकेरी खोड व सघन पद्धत, दोन झाडांमध्ये प्लॅस्टिक पेपर, बागेवर प्लॅस्टिक आच्छादन आदी विविध प्रयोग केले. त्यातून उत्पादन खर्च कमी करीत गुणवत्तापूर्ण उत्पादनाला (Pomegranate Production) कमाल दरही सातत्याने मिळवला आहे.

Pomegranate Cultivation
Pomegranate : डाळिंबासाठी विमा योजना

सोलापूर- पुणे महामार्गावर मोडनिंबपासून पाच किलोमीटरवर बैरागवाडी हे छोटे गाव आहे. ऊस, डाळिंब, टोमॅटोसह अन्य भाजीपाला उत्पादनात गावाचा लौकिक आहे. गावातील प्रवीण माने यांची पाच एकर शेती आहे. त्यांचे वडील एक एकर डाळिंब आणि दोन एकर चमेली बोराची बाग सांभाळायचे. त्यातून प्रवीण यांनाही लहानपणापासून डाळिंब शेतीची गोडी लागली. आज १७ वर्षांचा गाढा अनुभव या पिकात तयार झाला आहे. बंधू सचिन, आई-वडील, पत्नी आणि भावजय अशा कुटुंबातील सदस्यांच्या पाठबळावरच प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे.

Pomegranate Cultivation
Pomegranate : शेतकरी नियोजन पीक - डाळिंब

शेतीतला ‘टर्निंग पॉइंट’

प्रवीण यांनी कृषी पदविका घेतली आहे. सन २००५ मध्ये मोडनिंबमध्ये त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केले. चांगला शेतकरी होण्याचे स्वप्न असल्याने स्वतःच्या हिमतीवर एक एकरांत डाळिंब लागवड केली. मोठा खर्चही केला. पण अपेक्षित यश मिळाले नाही. उलट ते अधिक आर्थिक अडचणीत आले. काहीसे खचले.

Pomegranate Cultivation
Pomegranate Rate : स्पेनच्या ‘पोमवंडर’शी भारताच्या ‘भगव्या’ची स्पर्धा

पण हिंमत हरली नाही. मग द्राक्षप्रयोगही केला. पुढे पाच-सात वर्षे ते नगरला गेले. तिथे काही डाळिंब उत्पादकांच्या बागा करायला घेतल्या. त्यातून अनुभव वाढत गेला. स्वतःच्या डाळिंब शेतीसाठी हाच ‘टर्निंग पॅाइंट’ ठरला. त्यानंतर आपल्या डाळिंब शेतीत झोकून काम करण्यास सुरुवात केली. तेलकट डाग, मर रोग, खोडकिडी आदींवर प्रतिबंधात्मक उपाय करणे, लागवड अंतर कमी- जास्त करणे, मल्चिंग पेपरचा वापर आदी प्रयोग सुरू केले.

Pomegranate Cultivation
Pomegranate : सोलापुरातील डाळिंब संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांची नाराजी

एक खोड व सघन पद्धत

दहा वर्षांपूर्वी एकेरी खोड (सिंगल स्टेम) पद्धतीने लागवडीचा प्रयोग दोन एकरांतील डाळिंबात सुरू केला. यात खालून सुमारे दीड फुटापर्यंत उंची व त्यानंतर डेरा तयार करणे अशी पद्धत ठेवली. त्या वेळी १० बाय ८ फूट असे लागवडीचे अंतर ठेवले. प्रवीण सांगतात, की काळ्या जमिनीत तीन वर्षांपर्यंतच बाग चांगले उत्पादन देऊ शकली असती.

Pomegranate Cultivation
Grape, Pomegranate : द्राक्ष, डाळिंब पिकांतून शाश्वत उत्पन्न शक्य

पण व्यवस्थापन सुधारून त्यापुढेही चांगले उत्पादन घेणे सुरू ठेवले. सुमारे तीन वर्षांपूर्वी तीन एकरांत अजून एक प्रयोग केला. तो म्हणजे एकेरी खोड पद्धतीत सहा फुटांपर्यंत झाडाची उंची केली. लागवडीचे अंतर १० बाय ६ फूट असे घन पद्धतीचे ठेवले.पारंपरिक पद्धतीपेक्षा यात एकरी झाडांची जवळपास दुप्पटीने अधिक म्हणजे ७२६ पर्यंत झाली.या पद्धतीत नवव्या महिन्यात बहर धरला व तेथून सहा महिन्यांनी फळ काढणी सुरू केली.या तंत्राद्वारे पहिले उत्पादन प्रति झाड १२, १४ ते १६ किलोपर्यंत मिळाल्याचे प्रवीण सांगतात.

एकेरी खोड, सघन लागवड तंत्राविषयी ठळक बाबी

-यात झाडाची वाढ बुडापासून वरपर्यंत केवळ एकाच खोडावर केली जाते.

झाडांचा गोल किंवा पसरट विस्तार होत नाही. ते सरळ वाढते. खाली अतिरिक्त फुटवे कमी निघतात. कीडनाशके थेट झाडावर पडतात. त्यांचे परिणाम चांगले मिळतात.

-बुडात किंवा वरपर्यंत झाडांना कमी जखमा होतात.

-सूर्यप्रकाश थेट खोडापर्यंत पोचतो.

-झाडाला चांगले स्टोअरेज मिळते. फळांना एकसारखा आकार मिळतो.

-छाटणीचा खर्च ५० टक्क्यांपर्यंत वाचतो.

-आंतरमशागत सुलभरीत्या करता येते.

-झाडांची एकरी संख्या जास्त असल्याने उत्पादनही वाढते.

-फळांचे वजनही २०० ते ७०० ग्रॅमपर्यंत मिळते.

मृग बहराचे नियोजन

-वाण भगवा. वर्षातून केवळ मृग बहार धरतात. मेमध्ये बाग ताणावर सोडली जाते.

-तत्पूर्वी बागेची छाटणी केली जाते. त्यानंतर प्रतिझाड २० किलो शेणखत आणि पाच किलो कंपोस्ट खत. त्यानंतर बेड उकरून बेसल डोस. एक जूनला पानगळ. त्यानंतर बोर्डोची फवारणी.

-पुढे गरजेनुसार बुरशीनाशके, कीटकनाशकांच्या फवारणीचे व पीकवाढीनुसार तसेच फळांना चकाकी री येणे, आकार यासाठी विद्राव्य खतांचे नियोजन.

-दर पंधरवड्याने हंगामाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत जिवामृत. एकरी २०० लिटर.

- ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये फळांचे सेटिंग. सनबर्न होऊ नये यासाठी फळांना इंग्लिश कागद लावण्यात येतो.

-नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काढणीस सुरुवात.

रोग प्रतिबंधासाठी पेपरचा प्रयोग

बागेवर प्लॅस्टिक पेपर आच्छादन प्रयोग केला. त्याशिवाय दोन झाडांमधील सहा फूट अंतरातील मध्यवर्ती तीन फुटांवर दीड फूट खोल व अडीच फूट रुंद चर खोदली. त्यात दोनशे मायक्रॉन जाडीचा प्लॅस्टिक पेपर उभा लावला. यामुळे दोन झाडांच्या मुळांचा एकमेकांना स्पर्श होत नाही. त्यामुळे मर सारख्या रोगाच्या प्रसाराला अटकाव तयार होतो असे ते सांगतात. ब्लोअर, ट्रॅक्टर, आधुनिक यांत्रिकीकरणाची जोड दिली आहे. सव्वा कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे.

निर्यातक्षम उत्पादन

सातत्यपूर्ण निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेण्याचे कसब तयार केले आहे. फळाचे वजन २०० पासून ७०० ग्रॅमपर्यंत भरते. स्थानिक बाजारात न विकता निर्यातदार व्यापाऱ्यांमार्फत बांगलादेश, दुबई या देशात डाळिंबांची निर्यात होते. एकरी ९, १० टनांपासून ते १५ टनांपर्यंत उत्पादनक्षमता तयार केली आहे. पूर्वी एकरी दीड लाख होणारा उत्पादन खर्च ६० ते ७० हजारांवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. किलोला ६५ रुपयांपासून १५०, २७० रुपयांपर्यंत दर प्रवीण त्यांच्याकडील डाळिंबाला मिळतात.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राकडून सन्मान

विविध रोगांवर नियंत्रण, नवे प्रयोग, तंत्रज्ञान वापर, ऐन पावसाळ्यात मृग बहराचे प्रभावी नियोजन, संशोधकवृत्ती आदींची दखल सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने घेतली आहे. त्यांचा अलीकडेच उत्कृष्ट डाळिंब उत्पादक पुरस्कार देऊन गौरव केला आहे. केंद्रातील शास्त्रज्ञांनी त्यांच्या बागेला भेट दिली आहे. शेतकऱ्यांना ते सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यातून डाळिंब उत्पादकांचा मोठा समूह तयार झाला आहे.

संपर्क ः प्रवीण माने, ८६२५८६३५०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com