Silage Production Agrowon
यशोगाथा

Silage Production : यांत्रिक मुरघास निर्मितीतील ‘पेंडगाव आकाश’ कंपनी

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Silage Production Techniques : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुका मका पिकासाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील पेंडगाव, आमठाणा या दोन गावांच्या परिसरातील सुमारे २० समविचारी शेतकरी एकत्र आले. आपल्या भागातील दुग्ध व्यवसायाला मोठी चालना देणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.

सन २०१९ मध्ये त्या दृष्टीने त्यांनी पेंडगाव आकाश ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. अंबादास सोमासे हे अध्यक्ष तर संजय सुस्ते, कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्यासोबत योगेश चौधरी, मनाजी पवार, दत्तू पारखे, अंकुश अंभोरे या मंडळींनीही कंपनीच्या विकासासाठी पुढाकार घेतला. आज दोन मुख्य गावांसह परिसरातील काही गावांतील मिळून दोनशेहून अधिक शेतकरी कंपनीचे सभासद झाले आहेत.

मुरघास निर्मितीला चालना

येथील काही गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करतात. त्यांना बारमाही हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. त्यांची ही समस्या या शेतकरी कंपनीच्या लक्षात आली. शासनाच्या गटशेती योजनेतून त्यांनी मुरघास निर्मितीला चालना दिली. सोबतच कंपनीतर्फे जनावरे संगोपन व दूध प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले.

हा एकूण प्रकल्प सुमारे एक कोटी ६९ लाख रुपयांचा होता. पैकी एक कोटी शासकीय अनुदान तर ३५ लाखांपर्यंतची रक्कम कंपनीचे पाच संस्थापक संचालक गुंतवणार होते. बाकी रक्कम बॅंकेकडून कर्ज स्वरूपात मिळणार होती. या व्यतिरिक्त कंपनीने चारनेर शिवारात दोन एकर जागाही खरेदी केली. तेथेच मुरघास निर्मिती, दुग्ध प्रक्रिया, गोदाम, मका भरडा निर्मिती असे नियोजन केले. प्रत्यक्ष मुरघास निर्मितीला २०१९ मध्ये सुरुवात झाली.

...अशी होते मुरघास गाठी निर्मिती

‘पेंडगाव आकाश ॲग्रो’ कंपनीने ट्रॅक्टर व हार्वेस्टर घेतले आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे जात त्यांच्याकडील मक्याची कापणी करून दिली जाते. यात सुमारे ९० दिवस झालेल्या मका पिकाची निवड करण्यात येते. कंपनीचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना अन्य शेतकऱ्यांपेक्षा मक्याचे दर वाढवून देण्यात येतात. चाफकटरद्वारे प्रक्रिया केलेला मका ट्रॉलीमध्ये स्वयंचलित पद्धतीने भरण्यात येतो.

त्यानंतर त्याचे यांत्रिक पद्धतीने वजन होते. हा मका त्यानंतर कंपनीच्या प्रक्रियास्थळी येतो. कंपनीचे मुरघास गाठी (बेल्स) तयार करण्याचे यंत्रही आहे. प्रति दिन सुमारे २० टन अशी त्याची क्षमता आहे. त्याआधारे गाठी तयार होतात. पॉलिथिन पेपरमध्ये आच्छादित केलेल्या या बेल्स विक्रीसाठी तयार होतात. हवाबंद अशा सरासरी ५०, ६० ते ७० किलोच्या या बेल्स असतात. मका कापणी केल्यापासून सहा तासाच्या आत ही सर्व प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तयार केलेला मुरघास व्यवस्थित सांभाळल्यास दोन वर्षांपर्यंत टिकाऊ स्थितीत राहू शकतो असे कंपनीचे पदाधिकारी सांगतात.

आश्‍वासक विक्री

पहिल्याच वर्षी २०१९-२० सुमारे २०० टन मुरघास गाठी तयार केल्या. त्याची विक्री छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या दोन, तीन जिल्ह्यांत केली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून सातत्याने निर्मिती वाढत गेली. सन २०२१-२२ मध्ये ८०० टन तर २०२२-२३ मध्ये हे उत्पादन १२०० टनांपर्यंत नेले. सन २०२३-२४ मध्ये कमी पावसामुळे मका लागवड घटल्याने ७०० टनांपर्यंतच उत्पादन करणे शक्‍य झाले. यंदा तब्बल दोनहजार टन मुरघास उत्पादनाचा लक्षांक कंपनीने ठेवला आहे. पैकीपहिल्या टप्प्यात सुमारे ८० टन मुरघास तयार करण्यात आले आहे.

विविध राज्यांत विक्री

कंपनीने छोट्या- मोठ्या मिळून ३०० ते ३५० ग्राहकांना मुरघासाची विक्री केली आहे. यात बहुतांशी अल्पभूधारक शेतकरी व २५ ते ३० मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात यांसह सुमारे १६ राज्यांत पेंडगाव मुरघासाचा ब्रॅंड पोहोचवण्यात कंपनी यशस्वी झाली आहे.

पाचशे किलोपासून ते एक टन, दोन टन यानुसार मागणी असते. त्यानुसार बेल्स वाहनात भरल्या जातात. वजनकाटा केल्यानंतर त्याची पावती संबोधित मागणीदाराला तत्काळ पाठविली जाते. त्यावरून तो ग्राहक पेमेंट कंपनीच्या खात्यावर पाठवितो. पैसे प्राप्त झाले की वाहन इच्छितस्थळी रवाना होते. छोटे ग्राहक कंपनीकडून थेट त्यांच्या आवश्‍यकतेनुसार जागेवरून खरेदी करून घेऊन जातात. आतापर्यंतच्या एकूण कालावधीत वार्षिक ३० लाखांपासून ते ८० लाखांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत कंपनीने मजल मारली आहे

डेअरीचा प्रकल्प

सुमारे दोनशेपर्यंत दुधाळ जनावरे (गायी, म्हशी) घेऊन दुधावर प्रक्रिया करणारा निर्माणाधीन मावाचा प्रकल्पही उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे २५ ते ३० किलोमीटर परिसरातूनही दूध संकलन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठीचा सुमारे ८० ते ९० टक्के यांत्रिक ‘सेटअप’ उभारण्यात आला आहे. मात्र त्यासाठी भांडवल अपुरे पडत असून, ते उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही प्रक्रियायुक्त उत्पादनेही तयार केली जाणार आहेत. सध्या मका भरडा तयार करून त्याचीही दुग्धोत्पादकांना विक्री होत आहे.

संजय सुस्ते ९७६५३३७६९९

(कार्यकारी संचालक, शेतकरी कंपनी)

अंबादास सोमासे ८८८८२५१३२८

(अध्यक्ष, शेतकरी कंपनी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT