Bajra Farming Agrwoon
यशोगाथा

Bajra Cultivation : खानदेशी शेतकऱ्यांना बाजरी ठरतेय आश्‍वासक

Summer Bajra : खानदेशात खरीप व उन्हाळा अशा दोन्ही हंगामांमध्ये बाजरी घेतली जाते. धुळे व खानदेशातील बाजरी तसेच येथील बाजारपेठा देखील त्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : खानदेशात खरिपासह उन्हाळी हंगामात बाजरी सर्वाधिक घेतली जाते. मध्यम, मुरमाड जमिनीत जिथे गहू, हरभरा, मका आदी पिके जोमात येत नाहीत, तिथे बाजरी जोमात येते. अलीकडे अनेक शेतकरी उन्हाळ्यात बाजरीसाठी ठिबकचा वापर करीत आहेत.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडासह शिरपूर, धुळे, साक्री तालुक्यात तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर आदी भागात किंवा तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी सर्वच नद्यांच्या क्षेत्रात बाजरीची पेरणी होते. काळ्या कसदार जमिनीत चार सिंचनांमध्ये पीक हाती येते. शिंदखेडा पट्टा बाजरीसाठी अनेक वर्षे आघाडीवर असून येथील बाजरी आपली चव, कडकपणा यासाठी प्रसिद्ध आहे.

बाजरी शेतीचे नियोजन

खानदेशात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत बाजरीची पेरणी केली जाते. अलीकडे आगाप पेरणीकडेही कल आहे. कारण एप्रिलमध्ये बाजरीचे क्षेत्र रिकामे करून खरिपासाठी जमिनीला विश्रांती व ती तापू देणे शक्य होते. ज्यांच्याकडे पाणी आहे ते शेतकरी एप्रिलअखेरीस किंवा मेमध्ये या जमिनीत पपई, केळीची लागवड करतात.

जेवढी उशिरा पेरणी तेवढे उत्पादन अधिक असेही अनेक जण मानतात. उष्णतेत येणारे पीक असल्याने अनेक जण फेब्रुवारीच्या सुरुवातीलाही पेरणी करणे पसंत करतात. केळी, पपई या दीर्घ कालावधीच्या पिकांसाठी सुपीक जमीन असावी, त्यासाठी बाजरीचे बेवड शेतकरी महत्त्वाचे समजतात.

प्रसिद्ध बाजारपेठा

शिंदखेड्यातील दोंडाईचा येथील बाजार बाजरीसाठी प्रसिद्ध असून तेथे खरिपासह उन्हाळी हंगामातही बाजरीचे लिलाव व मोठी उलाढाल होते. धुळे, शिरपूर येथेही बाजार आहेत. जळगावातील अमळनेर व चोपडा,चाळीसगाव येथील बाजारही आघाडीवर आहेत. या भागातील शेतकरी अन्नात वर्षभर बाजरीचा उपयोग करतात. पुणे, मुंबई, गुजरात राज्यांत वास्तव्यास असलेली खानदेशी मंडळी खानदेशातील या बाजारपेठांमधून बाजरी घेतात. येथील आवक एप्रिलमध्ये सुरू होऊन जूनच्या सुरुवातीपर्यंत टिकून राहते.

धान्यासह सकस चारा

बाजरी धान्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहेच. शिवाय पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात अधिक दर्जेदार चारा उपलब्ध होतो. कडबा कुट्टीत शेतकरी मिठाचे मिश्रण करून पशुधनाला खाऊ घालतात. एकरी ३०० पेंढ्या कडबा उन्हाळी हंगामात हाती येतो. यंदा २२०० ते २३०० रुपये प्रति शेकडा असे त्याचे दर आहेत. हवामान, आवक आदी परिस्थितीत दर सात हजार रुपयांच्या घरातही पोहोचले आहेत.

पंचवीस वर्षांपासून उन्हाळी बाजरीला पसंती

माचले (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील शांताराम लोटू पाटील यांना सुमारे २५ वर्षांपासून उन्हाळी बाजरीचा अनुभव आहे. कापसानंतर रिकाम्या झालेल्या काळ्या, कसदार शेतात जानेवारी किंवा फेब्रुवारीत पेरणी करतात. तीन कूपनलिका आहेत. पाट पद्धतीने सिंचन असून सहा ते सात वेळेस पाणी देतात. एकवेळ आंतरमशागत होते. तणनाशकाचाही उपयोग होतो. एकरी १८ ते २० क्विंटल उत्पादन साध्य करतात. मागील तीन वर्षे प्रति क्विंटल सरासरी १८०० रुपये, तर मागील वर्षी दोन हजार रुपये दर मिळाला. एकरी ३०० पेंढ्या चारा होऊन यंदा २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

शांताराम पाटील ९७६७६७४९६९

धान्य, बेवड आणि सकस चारा

गाढोदे (ता.जि.जळगाव) येथील भगवान फकीरचंद पाटील अनेक वर्षांपासून उन्हाळी बाजरीची शेती करतात. त्यांची २५ एकर शेती आहे. चार कूपनलिका आहेत. केळी व पपई ही प्रमुख पिके आहेत. विविध पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात जानेवारी अखेरीस मध्यम किंवा पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत ठिबकवर कमी कालावधीच्या संकरित वाणांची पेरणी करतात. एकरी चार किलोपर्यंत बियाणे लागते. तणनियंत्रण एकदाच करावे लागते. दर पंधरा दिवसाआड सिंचन केले जाते. एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी साध्य केले आहे. मागील वर्षी सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजरीचे पीक धान्य, केळीला बेवड व एकरी ३०० पेंढ्यांपर्यंत चारा एवढा फायदा करून देते असे पाटील म्हणतात.

भगवान पाटील ९९२३७८२१९८

यंदाचे चित्र

यंदा हवामान बदल, अवकाळी पावसाचा फटका बाजरीला बसला. मे महिन्यात बाजरी पट्ट्यांमध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे आवक उशिरा सुरू झाली. आगाप बाजरीचे उत्पादन व दरही चांगले मिळाले. जूनच्या सुमारास हाती आलेल्या बाजरीचे उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटलने कमी मिळाले. दर मात्र एप्रिलच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी अधिक राहिले. सध्या आवक स्थिर आहे. चोपडा व अमळनेर येथील बाजारात एप्रिलच्या अखेरच्या सात दिवसांत आवक बऱ्यापैकी होती.

त्या काळात प्रति दिन सरासरी दोन हजार क्विंटल झाली. दर प्रति क्विंटल किमान १९००, कमाल २३०० व सरासरी २२०० रुपये मिळाले. यंदा एप्रिल ते जूनच्या पहिल्या आठवड्यातील लिलाव, आवक व उत्पादन यांची स्थिती लक्षात घेता दरांत चढ-उतार जाणवले. किमान दर १८०० रुपयांखाली नव्हते. जूनमध्ये कमाल दर पातळी २५०० रुपयांवर पोचली. सध्या दर टिकून आहेत. बाजरीची धुळे, नंदुरबार,जळगावात विविध बाजार समित्यांच्या क्षेत्रात थेट शिवार खरेदीही होते. नागपूर, पुणे, मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे ती पाठवली जाते. खरिपाच्या तुलनेत उन्हाळी बाजरीचा हंगाम मागील चार वर्षे बऱ्यापैकी राहिला आहे.

खानदेशातील बाजरी क्षेत्र व दर

सन २०१९ मध्ये खानदेशात उन्हाळी बाजरीचा ११ हजार १४० हेक्टरपर्यंत पेरा होता. सन २०२० ते ते २०२५ या कालावधीत हे क्षेत्र १४ हजार ते साडेचौदा हजारांच्या आसपास राहिले आहे. यंदा पेरा १५ हजार हेक्टरच्या (१४,९००) आसपास पोहोचला आहे.

सतीश पाटील, ८६६८२५६२७०

अडतदार, बाजार समिती, चोपडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT