Mushroom Production Agrowon
यशोगाथा

Mushroom Production : अळिंबी उत्पादनातून प्रगतीकडे प्रवास!

गणेश कोरे

Agriculture Success Story : अमर पडवळ यांचे शालेय शिक्षण डिंगोरे आणि राजुरी या गावामध्ये झाले. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी ठाणे येथे ‘व्हिज्युअल इफेक्ट’चा तीन वर्षांची पदविका केली.

या अभ्यासक्रमानंतर २०१३ मध्ये चित्रपटसृष्टीत संधी मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली. त्या धडपडीमध्ये सहायक दिग्दर्शक, स्क्रिप्ट असिस्टंट, अभिनयाची लहान मोठी मिळतील ती कामे करत केली.

तीन, चार वर्षांत विविध कामे केल्यानंतर २०२० मध्ये कोरोनामुळे टाळेबंदी झाली. सगळीच कामे ठप्प झाली. मोठ्या कलाकारांना जिथं काम नव्हतं, तिथे नवोदित तंत्रज्ञांना कोण विचारणार? गावाकडे परतावे लागले. वडिलोपार्जित ३ एकर शेती असून, तशी अमरला लहानपणापासून शेतीची आवड होतीच.

...असा ठरला मशरूमचा व्यवसाय

चित्रपटसृष्टीत काम करत असताना ही चंदेरी दुनिया बेभरवशाची असल्याचे अनेक ज्येष्ठ तंत्रज्ञ समजावत होतेच. या ठिकाणी कामे करताना अन्य पर्यायी व्यवसायही शोधून ठेवण्याचा त्यांचा सल्ला असे. चित्रपटांच्या व्यवसायामध्ये एखाद्या वेळी इतके काम असते, की जेवायलाही वेळ मिळत नाही, पण एखाद्या वेळी चांगल्या तंत्रज्ञांना सहा सहा महिने अजिबात काम नसते.

थोडे लक्ष घालूनही करता येईल, अशा व्यवसायाच्या शोधाला लागलो. त्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय हे जवळचे वाटत असले तरी क्षेत्र कमी होते. त्यातही पोल्ट्री, दुग्ध व्यवसायामध्ये खर्च, कष्ट अधिक असून, थोडे जरी दुर्लक्ष झाले तर जोखीमही मोठी असल्याचे लक्षात आले.

त्याच वेळी मशरूम (अळिंबी) उत्पादनाविषयी समजले. वेगवेगळ्या चालू व बंद प्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेतली. ठाणे, मुंबई आणि पुण्यात चांगली बाजारपेठ मिळू शकते, हे लक्षात आल्यानंतर २०१७ पासून या कल्पनेवर काम सुरू केले.

अळिंबी उत्पादनच का?

कमी काळात उत्पन्न देणारा शेतीपूरक व्यवसाय म्हणून अळिंबी उत्पादनाची ओळख आहे. या व्यवसायामध्ये स्पर्धाही तुलनेने कमी आहे. या नैसर्गिक उत्पादनामध्ये काहीही वाया जात नसल्याने पर्यावरणपूरक ठरतो. उलट टाकाऊ घटकांपासून शेतीसाठी कंपोस्ट खत उपलब्ध होते. अळिंबीतील पोषक तत्त्वामुळे भविष्यात याला प्रचंड मागणी राहील, असे वाटले. म्हणूनच या व्यवसायाची निवड केल्याचे अमर यांनी सांगितले.

...असा झाला श्री गणेशा

पहिल्या कोरोनाच्या लाटेनंतर थोडेसे वातावरण मोकळे झाल्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये आधीच्या कामातून कमावलेले ५० हजार रुपये आणि पत्नींचे दागिने गहाण ठेवून एक लाख रुपये अशा प्रकारे भांडवलाची उभारणी केली.

बांधकामावर खर्च करण्यापेक्षा शेजारीच असलेल्या राजुरी गावातीलच शिवाजी शेटे यांच्या रिकाम्या गोठ्यामध्ये थोडीशी डागडुजी व आवश्यक बदल करून घेतले. तिथेच अळिंबी उत्पादनाला सुरुवात केली.

त्या वेळी दुसऱ्या बाजूला सिनेसृष्टीमध्ये पंचायत सेशन २ वर स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून काम करत होतो. ते काम सांभाळताना अर्धवेळ, तर माझी पत्नी अक्षदा ही पूर्णवेळ अळिंबी उत्पादनाकडे लक्ष देत होतो.

...असे आहे व्यवस्थापन

- गहू आणि सोयाबीनचा भुस्सा उपलब्ध करून त्याचे निर्जंतुकीकरण करून घेतले.

- हा भुस्सा ८०० बॅगांमध्ये भरून पहिली बॅच तयार केली.

- बॅग भरताना प्रत्येक २ इंच जाडीच्या थरावर स्पॉन टाकून, असे पाच थर तयार केले.

- अळिंबीच्या वाढीसाठी आर्द्रता भरपूर लागते. या ठिकाणचे तापमान आणि आर्द्रता संतुलित ठेवण्यासाठी फॉगर वापरले.

- पाच ते सहा दिवसांनी अळिंबीचे कोंब फुटू लागतात.

- २० दिवसांनंतर कोंब वाढून बेडच्या बाहेर येण्यासाठी पिशवीला ठिकठिकाणी छिद्रे व छेद पाडले जातात.

- लागवडीनंतर २४-२५ व्या दिवशी त्याला अळिंबी वाढू लागते.

- ४० दिवसांमध्ये साधारण एका पिशवीद्वारे जवळपास दीड ते दोन किलो उत्पादन मिळते.

व्यवसायाचा विस्तार आणि उद्दिष्ट

जानेवारी २०२१ मध्ये रौंदळ या मराठी सिनेमासाठी प्रथम सहायक दिग्दर्शक म्हणून काम मिळाले. इकडे गावाकडे अळिंबी उत्पादनही जोरात सुरू होते. अशा प्रकारे पहिल्या तीन वर्षांमध्ये अळिंबी उत्पादनाच्या तंत्रावर चांगली हुकूमत मिळाली. सलग तीन वर्षे आपण यशस्वीपणे उत्पादन आणि विक्री करण्याचा आत्मविश्‍वास आल्यानंतर या वर्षी व्यवसायाच्या विस्ताराचे नियोजन केले.

जुलै २०२३ मध्ये व्यवसायाच्या विस्तारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे १० लाखांचे बिनव्याजी कर्जाला मंजुरी मिळाली. ऑगस्ट २०२३ मध्ये एका बॅंकेकडूनही कर्ज मंजूर झाले. या कर्जातून आता ९५ बाय ३६ फूट आकाराचे नवे शेड उभारले आहे. नव्या शेडमुळे साडेतीन हजार बॅग इतकी क्षमता वाढली आहे. आवश्यक त्या सर्व यंत्रणा उभारण्यात आल्या.

येत्या ८ ते १० दिवसांतच या नव्या शेडमध्ये साडेतीन हजार बॅगेमध्ये कल्चर लावण्यात येणार आहे. त्यातून दररोज ७० ते ८० किलो ताजी अळिंबी उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ४० दिवसांच्या बॅचमधून सुमारे अडीच ते तीन टन उत्पादन मिळेल. ५० टक्के व्यवस्थापनाचा खर्च लक्षात घेतला तरी साधारणपणे दीड महिन्यात दीड ते दोन लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. अळिंबीच्या विक्री ही ‘निर्वाणा’ या नावाने केली जाते. उत्तम व आकर्षक पॅकिंगमुळे बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे अमर यांनी सांगितले.

उत्पादन विक्री व्यवस्थापनात कुटुंबाची मदत

मशरूम उत्पादन आणि व्यवस्थापनात पत्नी अक्षदा हिची मोलाची साथ आहे. मिळते. विशेषतः अळिंबी बॅंगवर पाणी शिंपडणे, आवश्यक ती आर्द्रता स्थिर ठेवणे, योग्य वेळी काढणी करणे, पॅकिंग इ. सर्व व्यवस्थापनावर लक्ष देते. आॅनलाइन व्यासपीठावरून होणाऱ्या अळिंबी मागणी व पुरवठ्याचे नियोजनही अक्षदा पाहतात.

स्थानिक समाजमाध्यमांवरून वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात केली जाते. त्यावर हॉटेल, ढाबे व अन्य व्यावसायिकाकडून आलेल्या मागणीची पूर्तता केली जाते. काही नियमित घरगुती ग्राहकही तयार झाले आहे. त्यानंतर उर्वरित अळिंबीची विक्री किरकोळ बाजारात केली जाते. या वेळी सुकविलेले मशरूम साधारण १००० ते १२०० रुपये प्रति किलो, तर ताज्या अळिंबीला १५० ते २०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो.

अळिंबी काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या भुश्शाचे कंपोस्ट खत होते. त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. त्याची दर दोन ते अडीच महिन्यामध्ये एक बॅच निघते. सध्या दरमहा एक टन गांडूळ खत तयार होते. ८ रुपये प्रति किलो याप्रमाणे त्याची विक्री केली जाते. त्यासाठी मजुरी व अन्य खर्च ४ हजार रुपये प्रति टन धरला तरी ५० टक्के नफा शिल्लक राहतो.

उत्पादन, उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद ः

साधारण एका बॅगेचा भुस्सा व स्पॉन याचा मजुरीसह खर्च ७० रुपयांपर्यंत जातो. सुमारे ४० दिवसांमध्ये त्यातून दीड ते दोन किलो ओली अळिंबी मिळते. एका किलोला साधारण १५० ते २५० रुपये दर मिळतो. वार्षिक सरासरी किमान १०० रुपये दर मिळतो. आठशे बॅगमधून आठशे किलो अळिंबी मिळू शकते. सर्व खर्च वजा जाता सध्या सरासरी मासिक उत्पन्न ३० ते ३५ हजार रुपये मिळते. वर्षाला अशा सरासरी ६ ते ७ बॅच होतात. विस्तारानंतर उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल

उत्पन्नाचे स्रोत ः

१) ओल्या अळिंबीची विक्री (८० टक्के), २) वाळवलेल्या अळिंबीची विक्री (२० टक्के), ३) अळिंबीपासूनचे प्रक्रिया पदार्थ चॉकलेट, पावडर, रेडी टू कूक करी इ. ४) टाकाऊ भुश्शापासून गांडूळ खत निर्मिती व विक्री.

दरमहाचा खर्च ः

कच्चा माल ४००० रु., देखभाल खर्च १००० रु., मजुरी ६००० रु., शेड जागेचे भाडे २५०० रु., घराचे भाडे - ३५०० रु., घरखर्च व अन्य ८००० रु. असा एकूण २५ हजार रुपये.

अमर पडवळ, ८७७९३६६०५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT