Tur
Tur Agrowon
यशोगाथा

Tur : एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रातून वाढवली उत्पादकता

सुदर्शन सुतार

सोलापूर- करजगी मार्गावर कणबस (गं) (जि. सोलापूर) येथे सिद्धाराम अशोक चिट्टे यांची वडिलोपार्जित मध्यम भारी प्रतीची पाच एकर शेती आहे. त्यांचे वडील देखील पूर्वीपासून शेती करतात पाण्यासाठी विहीर आहे. मात्र केवळ हंगामी पाणी मिळते. त्यामुळे कायम कोरडवाहू पीक पद्धतीचाच (Dry Land Crop Method) वापर त्यांना करावे लागे. सिद्धाराम यांचे डीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षणानंतर (२०१२) त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र त्यासाठी पैशांची मागणी होऊ लागली. अखेर शेती हाच मुख्य व्यवसाय बनवायचा या हेतूने त्यांनी ती विकसित करण्यास सुरवात केली. आई-वडील आणि भाऊ अनिल यांच्यासह ते आज शेतीचे व्यवस्थापन (Agriculture Management) सांभाळतात.

संशोधन केंद्रामुळे मिळाली दिशा

पूर्वीपासून तूर, ज्वारी, उडीद, भुईमूग अशी पिके सिद्धाराम यांच्याकडे होतात. पण अलीकडील अनुभव आणि नावीन्यता यांचा विचार करून त्यात काही बदल केले. यंदा तुरीत सोयाबीनचे दीड एकरांत आंतरपीक घेतले असून प्रत्येकी अर्धा एकर उडीद, भुईमूग व ऊस घेतला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सोलापूर येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू संशोधन प्रकल्पांतर्गत २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरील संशोधन (ओएफआर) प्रकल्पासाठी कणबस गावची निवड झाली. त्यात सिध्दाराम यांचाही समावेश झाला. प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. विजय अमृतसागर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. शशिशेखर खडतरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॅा. सुहास उपाध्ये, वरिष्ठ संशोधन सहायक रामचंद्र सांगलीकर, ओंकार गरड, सुरेश माळी यांचे एकात्मिक शेतीसाठी मार्गदर्शन मिळू लागले. तिथून खऱ्या अर्थाने सिध्दाराम यांच्या शेतीला दिशा मिळाली.

व्यवस्थापनात बदल

अनेक वर्षांपासून चिट्टे कुटुंब तूर घेतात. मात्र संशोधन केंद्राने केलेल्या मार्गदर्शनातून व्यवस्थापनात सुधारणा करण्यास सुरवात केली. गेल्या दोन वर्षात त्यातून फरक जाणवतो आहे. यंदा तुरीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले आहे. तुरीसाठी बीडीएन-७११ आणि सोयाबीनचे केडीएस-७२६ हे सुधारित वाण वापरले आहे. उशिराच्या पावसामुळे ३० जूनला दीड एकर क्षेत्रावर लावण केली. एक ओळ तूर आणि दोन ओळी सोयाबीन अशी पध्दत आहे. तुरीच्या दोन ओळींत साधारण पाच फूट तर सोयाबीनच्या दोन्ही ओळींत १७ इंचाचे अंतर आहे. सध्या हे पीक कोळपणीसाठी आले आहे.

झालेले बदल

-पूर्वी तुरीसाठी घरगुती वाण वापरले जायचे. आता सुधारित वाणाचा वापर होतो.

-पूर्वी बैलाद्वारे पेरणी केली जायची. आता ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे ती

होते. शिवाय बियाण्याबरोबर

खतही पेरून दिले जाते.

-बीजप्रक्रिया आवर्जून केली जाते.

-बैलचलित पेरणीत पूर्वी तीन फूट अंतर राहायचे. आता ट्रॅक्टरद्वारे ते पाच फुटापर्यंत राहते.

-पूर्वी एखादी-दुसरी कोळपणी व्हायची. आता ठरवून दीड महिन्यांत एक आणि फुलोऱ्यात असताना दुसरी कोळपणी होते.

-फुलोऱ्यात एक आणि शेंगा लागताना एक अशा कीटकनाशकांच्या दोन फवारण्या होतात.

वाढले उत्पादन

पूर्वी एकरी सरासरी अडीच ते तीन क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन मिळायचे. आता चार, पाच ते सात क्विंटल पर्यंतं उत्पादन मिळत आहे. रब्बीतील ज्वारीमध्येही सुधारित बियाणांचा वापर (उदा. फुले रेवती), पेरणीबरोबर खतांचा वापर, बीजप्रक्रिया, कोळपणी या पद्धतीने प्रयोग सुरु केले. पाण्याचेही व्यवस्थापन सुधारले. पूर्वी ज्वारीचे एकरी सहा ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. मागील वर्षी तंत्रज्ञान वापरातून एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात सिध्दाराम यशस्वी झाले आहेत.

एकात्मिक पद्धती फायदेशीर

एकात्मिक पीक पध्दतीचा वापर सिध्दाराम यांना फायदेशीर ठरला आहे. शेतीला जोड म्हणून त्यांनी चार वर्षांपासून शेळीपालन सुरु केले आहे. सध्या दहा शेळ्या आहेत. बांधावर फळबागा लागवड केली आहे. त्यात नारळ, पेरू, सीताफळ, चिंच, पपई, रामफळ, केळी आदींचा समावेश आहे. शिवाय घरच्या घरी वर्षभर लागणारा भाजीपाला पिकविण्यासाठी परसबाग विकसित केली केली आहे. त्यात पडवळ, दोडका, वांगी, गवार, भेंडी, शेवगा आदी विविध भाज्यांचा समावेश आहे.

पूर्वमशागत, ‘कंपार्टमेंट बंडिंग’ चा फायदा

पीकपद्धती सुधारताना पावसाची स्थिती, उघडीप, दीर्घ खंड आदी विचार करून जलसंधारणाच्या काही उपचारांचाही वापर केला आहे. यात पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी उन्हाळ्यात उताराला आडवी नांगरट केली जाते.नांगरट केल्यानंतर एकरी चार गाड्या शेणखत मिसळून कुळवाच्या पाळ्या करून धसकटे वेचून जमीन स्वच्छ केली जाते. त्याशिवाय पाणी साठून राहण्यासाठी सारा यंत्राने सहा फूट बाय दोन फूट अंतराचे बंदिस्त वाफे तयार केले जातात. कणबस आणि परिसरात पडलेला पाऊस मोजण्यासाठी संशोधन केंद्राने सिध्दाराम यांना पर्जन्यमापक दिले आहे. ते शेतात कायमस्वरूपी एका जागी बसवले आहे. त्याद्वारे परिसरात पडलेला पाऊस समजतोच. शिवाय ग्रामस्थांनाही त्याचा दिशादर्शक म्हणून उपयोग होऊ लागला आहे.

सिद्धाराम चिट्टे- ९९७५२५२८९९

डॉ. शशीशेखर खडतरे- ७५८८६१०७७६

(वरिष्ठ शास्त्रज्ञ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT