Exportable Banana Agrowon
यशोगाथा

Exportable Banana : निर्यातक्षम केळी, काबुली हरभरा पिकात चोपडा तालुक्यातील विटनेर गावाची ओळख

Success Story : विटनेर (ता. चोपडा, जि. जळगाव) गावाने निर्यातक्षम केळी व काबुली हरभरा पिकांमध्ये ओळख तयार केली आहे. विविध नगदी पिकांखाली १०० टक्के क्षेत्र सूक्ष्मसिंचन प्रणालीखाली आणले आहे. शेतीसह ग्रामविकासाची अनेक कामेही ग्रामस्थांनी मार्गी लावली आहेत.

Chandrakant Jadhav

Rural Development : विटनेर (ता. चोपडा, जि. जळगाव) गावाला तापी नदीचा लाभ आहे. या नदीचा कूपनलिकांना अधिकचा जलस्रोत मिळतो. कारण नदी वर्षातील अनेक दिवस प्रवाही असते. याच नदीच्या परिसरात विटनेर हे चोपडा शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर वसलेले गाव आहे.

गावात काळी कसदार व मध्यम जमीन आहे. गावची तीन हजार लोकसंख्या असून, सुमारे ५६३ हेक्टर एकूण क्षेत्र आहे. त्यात केळी हे प्रमुख पीक आहे. दरवर्षी ३०० ते ३१० हेक्टरवर या पिकाची लागवड होते. रब्बीमध्ये मका, काबुली हरभरा तर उन्हाळ्यासाठी म्हणून कलिंगड हे फळपीक असते. त्याची दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान लागवड केली जाते.

जल है तो कल है

पाण्याचे महत्त्व विटनेरच्या ग्रामस्थांनी वेळीच ओळखले. त्यादृष्टीने जलसंधारणावर भर दिला. गावात ग्रामपंचायतीच्या मदतीने दोन लहान बंधारे तयार झाले आहे. जलसाठे तसे मुबलक आहेत. अनेक शेतकरी पूर्वी पाट पद्धतीने सिंचन करायचे. पण ‘जल है तो कल है’ या संकल्पनेतून पाणी बचतीवर काम सुरू झाले.

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर भर दिला. तापी नदीच्या पाण्याचा लाभ होणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांसाठी १०० टक्के सूक्ष्म जलसिंचन करून घेतले. गावात केळी, हरभरा, मका, पपई ही पिके त्या पद्धतीने घेतली जातात.

ऊस, गहू ही तुलनेने पाण्याची अधिक गरज असलेली पिके शिवारात फारशी दिसत नाहीत. त्यादृष्टीनेच पाणी वापराचे काटेकोर नियोजन गावातील शेतकऱ्यांनी केले आहे. मागील तीन वर्षे पावसाची स्थिती चांगली राहिली. त्याचे सकारात्मक परिणाम शिवारात दिसत आहेत.

केळीतील सुधारित तंत्र

केळीची पूर्वी पारंपरिक पद्धतीने लागवड केली जायची. त्यात कंदांचा अधिक उपयोग व्हायचा. पाट पद्धतीने सिंचन, पीक फेरपालट न करणे, खतांचा माती परीक्षणाशिवाय वापर, पाण्याचा असंतुलित वापर अशा प्रकारचे व्यवस्थापन होते. त्याचा जमीन सुपीकतेवरही परिणाम होत होता. पर्यायाने केळीच्या उत्पादनावर परिणाम झाला.

गुणवत्तेचा प्रश्‍न होता. केळीला हवे तसे दर मिळत नव्हते. मग केळीची लागवड स्थिर ठेवून एकरी उत्पादकता वाढविण्यावर गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी भर दिला. अनेक केळी उत्पादकांनी अभ्यास दौऱ्यांत भाग घेत सुधारित व्यवस्थापन जाणून घेतले.

पीक फेरपालट, काटेकोर सूक्ष्मसिंचन, उतिसंवर्धित रोपांचा वापर, फ्रूट केअर तंत्र आदी तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम दिसू लागताच गावातील तरुण, अभ्यासू शेतकऱ्यांनीही तसे प्रयोग सुरू केले.

व्यवस्थापनातील बाबी

पूर्वी फक्त कांदेबाग (सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची अधिक लागवड व्हायची. तीही एकाच महिन्यात न करता दोन टप्प्यांत व्हायची. यातून जोखीम कमी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता.

फुलकिडीला रोखण्यासाठी निसवणीनंतर बड इंजेक्शन, फ्लोरेट काढणे, बागा स्वच्छ ठेवणे, करपा निर्मूलनासाठी सामूहिक व्यवस्थापन, रसायन अवशेषमुक्त केळी उत्पादनासाठी शिफारस केलेल्या कीडनाशकांचा वापर, घडांना स्कर्टिंग बॅगेचा वापर, केळीचे अवशेष शेतात गाडणे आदी बाबींचा वापर सुरू झाला.

उत्पादकता वाढली

एकूण व्यवस्थापनातून केळीची पूर्वी मिळणारी १४ ते १५ किलोची रास आता २५ पर्यंत मिळू लागली आहे. केळीसाठी पपई, काबुली हरभऱ्याचा बेवड लाभदायी असतो. हे लक्षात घेऊन तशा प्रकारे पीक नियोजन होऊ लागले. आजमितीला साडेपाच लाखांपर्यंत एकूण उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड गावात दरवर्षी होत असावी.

मागील तीन वर्षे किमान ९००, कमाल १७०० व सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. थेट शिवार खरेदी केली जाते. आखाती देशांसह उत्तर भारतात केळीची पाठवणूक केली जाते.

मोठ्या काबुलीस पसंती

शिवारात रब्बीमध्ये केळी पिकानंतर रिकाम्या झालेल्या क्षेत्रात सुमारे १५० ते १८० हेक्टरवर काबुली हरभरा पीक असते. त्याचा रंग काहीसा बासुंदीसारखा व आकार मोठा टपोरा असतो. त्याला डॉलर हरभरा नावानेही परिसरात ओळखले जाते.

हा हरभरा मध्यम, काळ्या कसदार जमिनीत सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञानावर घेतला जातो. त्याच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनावरही काही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्याची लागवड डिसेंबरच्या दरम्यान होते. बाजारातील सुरुवातीच्या दरांचा लाभ मिळतो. एकरी नऊ ते १० क्विंटल उत्पादन शेतकरी साध्य करतात.

हरभऱ्याचे दर व विक्री

मागील दोन वर्षे त्यास सरासरी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. किमान ७५००, तर कमाल दर ११ हजार रुपये मागील दोन वर्षे राहिला आहे. त्याची खरेदी चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर भागातील खरेदीदार थेट किंवा शिवार पद्धतीने करतात.

पुढे पाठवणूक मध्य प्रदेश, गुजरातेत होते. ज्यांच्याकडे जलसाठा करण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी केळीखालील रिकाम्या क्षेत्रात डिसेंबरमध्ये गहू, मका आदींची लागवड करून पीक फेरपालट करून घेतात.

लष्करी अळीला रोखण्याचा प्रयत्न

रब्बी हंगामात काबुली हरभऱ्यापाठोपाठ मका पिकाखाली क्षेत्र असते. या पिकात अमेरिकन लष्करी अळी रोखण्यासाठी देखील शेतकरी तीन वर्षे सतत एकात्मिक कीड व्यवस्थापनाची कार्यवाही करीत आहेत. त्यामुळे उत्पादनातील घट रोखण्यास मदत झाली आहे. त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या शिफारशी व कार्यवाहीचा फायदा झाला आहे.

अशा व्यवस्थापनातून एकरी २५ क्विंटलपर्यंत उत्पादकता गाठणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन या सूत्रांवर शेतकऱ्यांचे नियोजन आहे. मक्याची थेट विक्री केली जाते. त्यास मागील दोन हंगामांत सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर जागेवर मिळाला. काही शेतकऱ्यांना कमाल २१५० रुपये दरही मिळाला.

दूध व्यवसायाचेही बळ

गावात पूर्वी दूध उत्पादकांची संख्या मोठी होती. कालांतराने ती कमी झाली. परंतु आज अनेक अल्पभूधारक शेतकरी आपापल्या पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतात. गावातील संकलित दुधाची विक्री चोपडा व लगतच्या भागात केली जाते. मुऱ्हा, जाफराबादी जातीच्या म्हशी गावात अधिक संख्येने पाहण्यास मिळतात. गावात सहकारी दूध उत्पादक संस्थेची आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगतात.

शेतीत तरुण कार्यरत

गावातील अनेक युवकांनी विज्ञान व अन्य क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन शेती-मातीची सेवा सुरू केली. त्यात चांगली कामगिरीही केली. त्यामध्ये संभाजी भिका पाटील, श्यामकांत पाटील, मनोहर पाटील, नवल पाटील, डॉ. महेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, गणेश पाटील यांनी केळी, काबुली हरभऱ्याच्या शेतीत चांगली कामगिरी करून आदर्श तयार केला आहे.

मजबूत रस्त्यांची मागणी

शिवारात पावसाळ्यात व अन्य ऋतूत अवजड वाहतूक सुरू असते. केळी, पपई व अन्य पिकांची थेट विक्री केली जात असल्याने थेट शिवारात मालवाहू वाहने जातात. परंतु अनेक भागांत शेतरस्ते मजबूत नाहीत.

काही भागांत शेतकऱ्यांनी लोकसहभागातून शेतरस्ते तयार केले. परंतु पावसाळ्यात ते खराब होतात ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेत पाणंद रस्ते योजनेतून भरीव निधी उभारून शेतरस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

धार्मिक उपक्रमांचे आयोजन

गावात नवरात्रोत्सवात महाप्रसाद व महापूजेचा कार्यक्रम असतो. वर्षात दोन वेळेस यात्रा भरते. त्यात मरीआईची यात्रा तसेच जानेवारी किंवा फेब्रुवारीत श्रावणबाबांची यात्रा असते. श्रावण बाबा हे गावातील संत म्हणून प्रसिद्ध होते.

त्यांच्या मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होते. अलीकडेच चामुंडा मातेच्या गुजरात येथील मंदिराची प्रतिकृती गावात साकारली आहे. शेकडो भक्तगण या मंदिरात दर्शनास येतात.

विटनेर ग्रामविकास-

-ग्रामपंचायतीची इमारत भव्य प्रवेशद्वाराजवळ उभारली आहे.

- १०० टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण.

-गावाच्या वेशीवर मुख्य प्रवेशद्वार.

-गावाला पाणीपुरवठा मुबलक केला जातो.

-शेती व घरे गावातील महिलांच्या नावावर. सन १९९० मध्येच हे काम करून गावाने महिला सबलीकरणाचा संदेश दिला.

-विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या व ग्रामपंचायतीतही गावातील मंडळींनी १०० टक्के जागांवर महिलांची निवड केली. त्यातून राजकारणात महिलांचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला.

संपर्क - भानुदास पाटील, ९५४५१३३२१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT