
Kabuli Chana Rate : जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली.
यंदा देशातील उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काबुली हरभरा दर आवकेच्या हंगामातही टिकून राहू शकातात, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
देशात काबुली हरभरा पिकावर बदलते वातावरण आणि पावसाचा परिणाम झाला. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
देशात सुरुवातीच्या काळात ४ लाख ५० हजार टन काबुली हरभरा उत्पादनाचा अंदाज होता. पण आता उत्पादन ४ लाख टनांवरच स्थिरावेल, अशी शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात काबूली हरभऱ्याचाी टंचाई भासत आहे. त्यामुळे भारतीय काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याची निर्यात चालू आर्थिक वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे.
एप्रिलपासून चालू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षातही काबुली हरभरा निर्यात चांगली राहील. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता असतानाही दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
भारतीय काबुली हरभऱ्याला युएई आणि श्रीलंकेतून मोठी मागणी आहे. त्यामुळे देशातून निर्यात वाढली. भारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात १ हजार १२० लाख डाॅलरची निर्यात झाली. गेल्या आर्थिक वर्षात याच काळातील निर्यात ४६७ लाख डाॅलरवर होती, अशी माहिती विदेश व्यापार महासंचालनालयाच्या आकडेवारीवरून मिळाली.
रमजानमुळेही काबुली हरभऱ्याला चांगलीच मागणी वाढल्याचे वृत्त बिझनेलाईनने दिले. मयूर ग्लोबल काॅर्पोरेशनचे उपाध्यक्ष हर्षा राय यांनी सांगितले की, काबुली हरभऱ्याची जागतिक पाईपलाईन खाली आहे. रमजानमुळे मोठ्या आकाराच्या १२ एमएमच्या काबुली हरभऱ्याला चांगली मागणी आहे.
लहान आकाराच्या काबुलीलाही मागणी
जगात भारत आणि मेक्सिको या दोन देशांमध्ये मोठ्या आकाराच्या म्हणजेच १२ एमएमच्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन होते. मेक्सिकोतील पीक पुढील महिन्यात बाजारात येईल. त्यातच यंदा मेक्सिकोतील उत्पादन यंदा कमी राहणार आहे.
तसेच मेक्सिकोत मागील हंगामातील शिल्लक साठा नाही. त्यामुळे भारताला काबुली हरभरा निर्यातीची संधी आहे. मोठ्या आकाराच्या काबुली हरभऱ्याची टंचाई असल्याने लहान आकाराच्या म्हणजेच ८ एमएमच्या काबुलीलाही मागणी आहे.
महाराष्ट्रात लहान आकाराच्या काबुलीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. निर्यातही सुरळीत सुरु आहे. निर्यात आणि वापर चांगला असल्याने साठा कमी राहण्याची शक्यता आहे.
इतर देशांकडूनही मागणी
काबुली हरभऱ्याला मागणी असल्याने आवकेच्या तोंडावरही दर टिकून आहेत, असे आंतराष्ट्रीय ॲग्री कमोडिटी ब्रोकर सतिश उपाध्याय यांनी सांगितलं. उपाध्याय म्हणाले की, दुबई आणि अल्जेरियातूनही काबुली हरभऱ्याला मागणी येत आहे.
पण देशातील उत्पादनावर बदलत्या वातावरणाचा आणि पावसाचा परिणाम झाला आहे. सुरवातीला यंदा चांगल्या उत्पादनाची आशा होती. पण सध्या मोठ्या आकाराच्या काबुली हरबऱ्याची आवक कमी होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.