Vanrai Bund Agrowon
यशोगाथा

Rural Development : वनराई बंधारे निर्मितीतून पिंप्राणीचे शिवार हिरवेगार

Vanrai Bunds : नंदूरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्राणी गावाला बारमाही पाण्याचा ठोस आधार नव्हता. त्यामुळे खरिपाचाच काय तो आधार होता. ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांतून वनराई बंधारे उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम गावशिवारात पार पडले.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : नंदूरबार जिल्ह्यातील पिंप्राणी (ता. शहादा) हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी सुमारे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. मका, कापूस, तूर आदी मुख्य पिके आहेत. मोठ्या नदीचा स्रोत गावाला नव्हता. चांगला पाऊस झाल्यास पिके साध्य करणे शक्य व्हायचे. पावसाचा खंड राहिल्यास परिस्थिती नाजूक बनायची. सातपुड्यातून विविध नाले, झरे येत असल्याने त्यावर खरीप साधला जायचा. जानेवारी, फेब्रुवारीत पाणीटंचाई असायची. गावातील जमीन डोंगराळ, मुरमाड, मध्यम व काही तीव्र उताराची आहे.

लोकसहभाग ठरला महत्त्वाचा

गावशिवार हिरवेगार करण्याची इच्छा ग्रामस्थांची होती. त्यासाठी प्रोत्साहनासह निधीचीही कमतरता होती. गावातील रवींद्र पावरा, शेगा पावरा, युवराज पावरा आणि काही महिलांनी जलसंधारण, पाणी व शेती नियोजन याबाबत जळगाव येथे पाणी फाउंडेशन संस्थेच्या तीनदिवसीय प्रशिक्षणात सहभाग घेतला. जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली.

त्यातूनच सातपुडा महिला व पुरूष शेतकरी गट आणि कुंडमाउली गटाची स्थापना झाली. सुमारे ४० सदस्यांचा त्यात सहभाग राहिला. डिसेंबरपर्यंत नाले अनेकदा प्रवाही असतात. परंतु पाणी वाहून जाते. ते अडवून उपयोगात कसे आणता येईल यासंबंधी चर्चा सुरू झाली. निधी नसल्याने मोठे बंधारे तयार करणे शक्य नव्हते. त्यामुळे कमी वेळेत व खर्चात पाणी अडवण्याच्या दृष्टीने वनराई बंधारे निर्मितीचा पर्याय निवडून सातपुड्यातून येणारे लहान नाले, झरे अडविण्यास सुरुवात झाली. सिमेंटच्या गोण्या घरोघरी जावून गोळा करण्यात आल्या. महिला, युवक, शेतकरी मंडळी आदी सर्वांनी श्रमदान करून सुमारे दहा बंधारे तयार केले. अडवलेले पाणी मोठ्या नाल्यात आणून ते आपापल्या शेतापर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला.

शिवारे झाली हिरवीगार

बंधाऱ्यांमुळे पाणीसंचय होऊन गावातील सुमारे ५० एकर कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. त्यात रब्बीत मका, गहू, हरभरा आदी पिके घेण्यास सुरुवात झाली. पूर्वी जानेवारी- फेब्रुवारीत ओसाड दिसणारी शिवारे हिरवीगार होऊ लागली. काही शेतकरी किरकोळ किंवा आपल्या कुटुंबापुरता भाजीपाला घेऊ लागले. सध्या पाट पद्धतीने सिंचन केले जाते. स्वप्नवत वाटणारी बागायती गावात फुलू लागली. गावात आंबा बागाही आहेत. सुमारे एक हजार झाडांची लागवड मध्यंतरी झाली होती.

त्यातूनही शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार झाला आहे. शेतकरी गटांनी घेतलेल्या प्रशिक्षणाधारे शेतीचा खर्च कसा कमी करावा यावर काम सुरू झाले. त्यामध्ये बियाणे, निविष्ठांची सामूहिक खरेदी करण्यात आली. रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर टाळून जीवामृत, दशपर्णी अर्काची निर्मिती सुरू झाली. इर्जिक पद्धतीने एकमेकांना शेतीकामांत मदत करून मजुरी खर्च शून्यावर आणण्याचा प्रयत्न झाला. अद्याप कृषिपंप वा विजेची सुविधा तेवढी नाही. ही यंत्रणा मजबूत उभारली जावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

उत्पादनवाढीकडे लक्ष

शेतकऱ्यांनी जमीन आरोग्याकडे लक्ष दिल्याने उत्पादकता वाढण्यासाठी दिशा मिळाली. पूर्वी मक्याचे एकरी सात- आठ क्विंटलपुढे उत्पादन जात नव्हते. आता खरिपात त्याचे १४ क्विंटलर्यंत तर रब्बीत १८ क्विंटलपर्यंत उत्पादन गाठले आहे. देशी तुरीचे एकरी अडीच ते तीन क्विंटल उत्पादन शेतकरी साध्य करतात. पिंप्राणी गाव काहीसे दुर्गम क्षेत्रात असल्याने शेतमाल खरेदीसाठी खरेदीदार, व्यापारी थेट गावात जात नाहीत. ग्रामस्थांना नजीकच्या म्हसावद (ता. शहादा) येथील बाजारात यावे लागते. आज गावाची मका व अन्य धान्यांमध्ये सेंद्रिय गुणवतेच्या दृष्टीने बाजारपेठेत ओळख तयार केली आहे.

बियाणे बँकेची उभारणी

महिला व शेतकऱ्यांनी सातपुड्यातील पारंपरिक, देशी वाणांची बियाणे बँक उभारली आहे. वाल, भेंडी, चवळी, अंबाडी, मका, साधी व लाल ज्वारी, हरभरा, तूर, रानभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या आदी मिळून सुमारे ५५ प्रकारचे वाण त्यात आहेत. बॅंक अधिकाधिक समृद्ध करण्यात येत आहे. विविध प्रदर्शनांमधून सहभाग घेत मानवी आरोग्यासाठी हे वाण कसे महत्त्वाचे आहेत यासाठी जनजागृतीपर उपक्रमही घेतले जाणार आहेत. गावातील शेतकरी शेगा चौधरी म्हणतात, की गावात एकी जपल्यानेच प्रगती साधणे शक्य होत आहे. बियाणे बँकेच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक स्वरूपही देण्याचा प्रयत्न आहे.

जैवविविधता टिकवण्याचा प्रयत्न

गावात सुमारे आठ बायोगॅस युनिट्‍स आहेत. सातपुड्यातील जैवविविधता टिकवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील असून, वृक्षतोड थांबवणे, टेकड्या, जुन्या वृक्षांचा सांभाळ करण्याविषयी त्यांचा कटाक्ष आहे डिसेंबरमध्ये गावातील झरे प्रवाही असतात. यामुळे वन्यप्राण्यांचा सांभाळ परिसरात दिसतो अनेक शेतकरी शेळी व गोपालन करतात. त्यातून कुटुंबाच्या चरितार्थासाठी आधार मिळतो.

शेगा चौधरी (शेतकरी, पिंप्राणी)

८७६६५१३२८८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Death : रानडुकरासाठीच्या तारकुंपणातील विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित

Soybean Pest Control: सोयाबीनवर हुमणी आणि पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला! शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाय

Rain Update : जतमध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT