Rural Development
Rural Development Agrowon
यशोगाथा

Grape : द्राक्षशेतीसह ग्रामविकासात ढोराळेची शानदार कामगिरी

सुदर्शन सुतार

सोलापूर जिल्ह्यात ढोराळे हे गाव बार्शी तालुक्यापासून सुमारे ३३ किलोमीटरवर आहे. लोकसंख्या सुमारे १५०० पर्यंत आहे. संत बाळोजी महाराज यांचे जागृत देवस्थान गावात आहे. चैत्र महिन्यात आणि दिवाळीत कार्तिकवारी दरम्यान गावात मोठी यात्रा भरते या वेळी बाहेरगावी असलेले ग्रामस्थही आवर्जून यात्रेस येतात. गाव छोटे असले तरी सामाजिक, आर्थिक परिस्थिती अन्य गावांपेक्षा काहीशी वेगळी आहे. गावाला भोगावती नदीचा काठ लाभला आहे. अगदी नदीच्या काठावरच गाव वसले होते. पण १९९३ च्या भूकंपात गावाला त्याची झळ बसली. त्यानंतर नजीकच्या माळावर गावाचे पुनर्वसन करण्यात आले. साहजिकच गावाची रचना आखीव-रेखीव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज आदी सुविधा उपलब्ध करताना फारशा अडचणी आल्या नाहीत. सरपंच दीपक देशमुख, उपसरपंच सौ. सुरेखा बनसोडे तर राहुल खरात, सौ. शीतल जाधव, सौ. मालन चवरे, सौ. माधुरी शिंदे, अमोल जाधव हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. वंदना भालशंकर ग्रामसेविका आहेत.

पायाभूत सुविधांत आघाडी

गावातील बहुतांश रस्ते सिमेंटचे झाले आहेत. बंदिस्त गटार योजनेसह संपूर्ण गावातून विजेचे खांब फिरवले आहेत. नदीकाठीच पिण्याच्या पाणी योजनेची विहीर आहे. तेथून पाइपलाइन व टाकीद्वारे घरोघरी पाणी पोहोचवले आहे. गावात सुमारे ३५० कुटुंबे असून, बहुतांश घरात शंभर टक्के शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले आहे.

पाण्यात स्वयंपूर्णता

भोगावती नदीकाठ लाभल्याने शेतीच्या पाण्यासाठी मोठा फायदा होतो. त्यात चांगला पाऊस झाल्यास पिण्याच्या वा शेतीच्या पाण्यासाठी फारशी वणवण होत नाही. पण गावकरी एवढ्यावरच विसंबून राहिलेले नाहीत. गावशिवारात जलयुक्त शिवारची कामे झाली आहेत. त्याअंतर्गत कंपार्टबंडिंग, नालाबांध, वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. नदीवर तीन ठिकाणी बंधारे बांधले आहेत. पाण्याबाबत गाव स्वयंपूर्ण झाले आहे.

शेततळ्यांतूमन समृद्धी

पाण्याची एवढी उपलब्धता असूनही दुष्काळासारखी आपत्ती लक्षात घेऊन गावातील १५ ते २० शेतकऱ्यांकडे किमान १५ कोटी लिटर पाणी साठवणक्षमता होईल एवढ्या क्षमतेची शेततळी पाहण्यास मिळतात. रोजगार हमी योजनेतून अकरा विहिरींचा लाभही शेतकऱ्यांना दिला आहे.

पाच हजार लिटर दुधाचे संकलन

पाण्याचा उपलब्धतेमुळे चारा चांगला होतो. त्यामुळे दुभत्या गाई-म्हशींसह शेळीपालनही मोठ्या प्रमाणात आहे. गावात चार डेअरीज आहेत. त्यामाध्यमातून दररोज दोन्ही वेळेचे मिळून सुमारे पाच हजार लिटर दूध संकलन होते. यावरुन या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज

येतो.

द्राक्षमळे म्हणजे ‘ढोराळे’

गावाचे भौगोलिक क्षेत्र ७५० हेक्टर आहे. त्यात सोयाबीन, तूर, मका, गहू, हरभरा अशी हंगामी तर फळबागांमध्ये द्राक्ष, सीताफळ, पेरू, आंबा, डाळिंबाचे क्षेत्र आहे. सर्वाधिक १५० हेक्टरवर द्राक्ष आहे. सुमारे १०० कुटुंबाकडे द्राक्षशेती असावी. सुपरसोनाका, सोनाका, एसएसएन, माणिकचमन आदी वाणांची विविधता आहे. अनेकांकडे फवारणीसाठी आधुनिक पद्धतीचे ब्लोअर्स व छोटे-मोठे किमान शंभर ट्रॅक्टर आहेत. या द्राक्षशेतीनेच गावाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. द्राक्षमळे म्हणजे ढोराळे असे जणू समीकरण बनले आहे. गावातील शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीला सर्वाधिक पसंती दिली आहे.

पाचशे मजुरांना काम

गावचे द्राक्षशेतीचे क्षेत्र पाहात वर्षभरासाठी परराज्यातील सुमारे ३०० मजूर, तर परिसरातील १० ते १२ गावांतील २०० महिला व पुरुष मजुरांना काम मिळाले आहे. महिलांना प्रतिदिन ३०० रुपये आणि पुरुष मजुराला ४०० रुपये मजुरी दिली जाते. दिवसाकाठी दीड ते पावणेदोन लाख रुपये केवळ मजुरीचे वाटप गावातून होते. बेदाणा प्रक्रियेचे दोन प्रकल्प आहेत. त्या माध्यमातूनही मजुरांची सोयही झाली आहे.

पुरस्कारांवर मोहोर

-पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना राबवण्याबद्दल पुरस्काराने सन्मान.

-शंभर टक्के शोषखड्डे केल्याबाबत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून विशेष सन्मान.

-ओडीएफ प्लस हा हागणदारीमुक्त गाव योजनेसाठीचा पुरस्कार.

पायाभूत सुविधांसह स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन या योजनांमध्ये गावाने उल्लेखनीय काम केले आहे. द्राक्षशेतीने गावाचे अर्थकारण बदलले आहे.

दीपक देशमुख, सरपंच

९८२२७६८३५१

जलयुक्त शिवार, पर्यावरण संतुलन, संपूर्ण गाव हागणदारीमुक्त, शोषखड्डे यासारख्या विविध उपक्रमांत गावाने आघाडी घेतली आहे. लोकांचे सहकार्य चांगले मिळते आहे.
वंदना भालशंकर, ग्रामसेविका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT