Grapes : आगाप छाटणीच्या बागेचे व्यवस्थापन

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका, तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये आगाप छाटणी घेतली जाते.
Grapes pruning
Grapes pruningAgrowon

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका, तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये आगाप छाटणी (Grapes pruning) घेतली जाते. सटाणा भागामध्ये प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या द्राक्षजातींची लागवड आहे, तर इंदापूर भागामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षजातींची लागवड होते. या भागात लवकर छाटणी केल्यानंतर बाजारात द्राक्षाची उपलब्धता डिसेंबर महिन्यामध्ये होते. खरेतर फळछाटणी ही ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. त्यामुळे हा भाग अपवादच म्हणावा लागेल. या छाटणीनंतर बागेत एकतर पावसाळी वातावरण असते किंवा सतत पाऊस सुरू असतो. त्यामुळे घडाच्या विकासामध्ये बऱ्याच अडचणी येत असल्याचे दिसून येते. या अडचणींवर मात करण्यासाठी बागेमध्ये काटेकोर व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

Grapes pruning
द्राक्ष बागेतील काडी परिपक्वता, आगाप छाटणी अवस्थेतील नियोजन

१) खतांचा वापर महत्त्वाचा -
फळछाटणीपूर्वी काडीची परिपक्वता झालेली असावी. या नंतर त्याच काडीमधून निघालेल्या घडाचा विकास होण्याकरिता अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे असते. यामध्ये स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक, बोरॉन आणि फेरस ही महत्त्वाची अन्नद्रव्ये समजली जातात. हंगाम सुरू होण्यापूर्वी जर माती परिक्षण केल्यास बागेची सध्याची परिस्थिती काय आहे, याची जाणीव होते. त्यानंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे सोपे होते. माती परीक्षण केलेले नसल्याच्या स्थितीमध्ये खतांचा वापर पुढील प्रकारे करता येईल.
-सिंगल सुपर फॉस्फेट ४५० ते ५०० ग्रॅम प्रति द्राक्ष वेल, डीएपी ५० किलो प्रति एकर, फेरस सल्फेट १० किलो प्रति एकर, झिंक सल्फेट ४ ते ५ किलो प्रति एकर व बोरॉन २ किलो प्रति एकर या प्रमाणे बोदामध्ये मिसळून घ्यावे. बऱ्याचशा बागेमध्ये चुनखडी कमी अधिक प्रमाणात असते. त्यामुळे वेलीला अन्य महत्त्वाची अन्नद्रव्ये उदा. पालाश, फेरस, मॅग्नेशिअम, स्फुरद इ. चा पुरवठा शक्य होत नाही. त्यामुळे पानांवर त्यांची कमतरता दिसून येते. फळछाटणीपूर्वीच सल्फर जमिनीतून ५० ते ६० किलो प्रति एकर शक्य होत असल्यास शेणखतांमध्ये मिसळून बोदामध्ये टाकावेत. बऱ्याच बागांत पावसाळ्यामुळे यावेळी शेणखत टाकले जात नाही, असे असल्यास ड्रिपर खाली जमिनीत सल्फर मिसळून घ्यावे.

Grapes pruning
Grape : द्राक्ष, डाळिंबाचे क्लस्टर, खरेच ठरेल का बूस्टर?

२) पानगळ करून घेणे महत्त्वाचे
फळछाटणीनंतर काडीवरील फुगलेले डोळे लवकर व एकसारखे फुटावे याकरिता पानगळ करून घेणे गरजेचे असते. रसायनाचा वापर करून किंवा हाताने हे शक्य होते. रसायनाचा वापर करण्यापूर्वी द्राक्ष वेलीला पाच ते सहा दिवस पाण्याचा ताण दिलेला असावा. त्यामुळे फवारणीनंतर १० ते ११ दिवसांत पूर्ण पानगळ होऊन पुढील चार ते पाच दिवस काडी पूर्ण उघडी राहील. हाताने पानगळ करतेवेळीही तितकीच काळजी घेणे गरजेचे. हाताने केलेल्या पानगळीनंतर काडी १० ते १२ दिवस उघडी राहिल्यास पानातील अन्नद्रव्ये काडीच्या डोळ्यामध्ये गोळा होतील. त्यानंतर डोळे फुगण्यास सुरुवात होतील. डोळे एकसारखे फुगल्यास फळछाटणीनंतर एकसारखी फूट निघण्यास मदत होते. परिणामी जीएची फवारणी, थिनिंग, फेलफुटी काढणे इ. गोष्टी सोप्या होतील.

३) काडीवरील डोळे तपासणी
द्राक्ष बागेत वेगवेगळ्या जाडीच्या काड्या उपलब्ध असतात. यामध्ये सरळ काडी व सबकेन दोन्ही आढळून येतात. वेगवेगळ्या जाडीच्या काडीवर सूक्ष्म घड निर्मिती वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येते. यासाठी डोळे तपासणी महत्त्वाची ठरते. काडीवरील डोळे तपासल्यामुळे बागेत नेमक्या कोणत्या प्रकारच्या काडीवर नेमक्या कोणत्या जागी चांगल्या प्रकारचा घड आहे, हे जाणून घेता येते. यामुळे छाटणीमधील चुका टाळता येतात. यासाठी एक एकर बागेतील पाच ते सहा जागेवरून वेगवेगळ्या जाडीच्या पाच ते सहा काड्या प्रत्येकी एका डोळ्यावर कापून ओल्या गोणपाटामध्ये गुंडाळून प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यासाठी पाठवाव्यात. जिथे ही सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी आपला पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षीही छाटणीचे नियोजन करावे. सरळ काडी असलेल्या परिस्थितीमध्ये काडीवर दोन पेऱ्यातील जिथे कमी असेल, त्या जागेवर चांगला द्राक्षघड येतो, असे समजले जाते. ही जागा मुख्यतः
६ ते ८ डोळ्यांमध्ये दिसून येते. सबकेन केलेल्या परिस्थितीत ज्या ठिकाणी गाठ तयार होते, त्याशेजारी आखूड पेरा असलेली जागा म्हणजे खात्रीशीर घड निर्मिती असा अर्थ लावला जातो. सबकेनच्या गाठीवरील डोळ्याला ‘टायगर बड’ असेही म्हटले जाते. या टायगर बडमधून द्राक्षघड मजबूत व जास्त वजनाचा मिळतो. त्यासाठी सबकेनच्या गाठीच्या एकदम जवळ छाटून या डोळ्याचा फायदा घेता येतो.

४) प्रत्यक्ष छाटणी घेणे
डोळे तपासणीचा अहवाल आपल्यासोबत असल्यास प्रत्येक फळछाटणी घेणे फार सोपे होते. अहवाल उपलब्ध नसलेल्या ठिकाणी मात्र काळजीपूर्वक छाटणी घ्यावी लागेल. सहा मि.मी. किंवा त्यापेक्षा कमी जाडीच्या काडीवर फळछाटणी घ्यायची झाल्यास चार ते पाच डोळ्यावर छाटणी घ्यावी. कारण या काडीवर सूक्ष्मघड निर्मिती प्रत्येक डोळ्यांवर झालेली असेल. या काडीतून निघालेला द्राक्षघड फारतर दीडशे ते दोनशे ग्रॅम वजनाचा असेल. फळछाटणी करतेवेळी ओलांड्यावर हिरव्या काड्या मुळीच राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. या काडीमधील पीथ पांढरा असतो. त्यामुळे फळछाटणीनंतर निघालेला घड एकतर गोळीघडावर जातो किंवा घडाचे रूपांतर बाळीमध्ये होते. यालाच ‘घड जिरणे’ असेही म्हटले जाते.
रोगनियंत्रणाच्या दृष्टीने ओलांड्यावर तसेच काडीवर असलेल्या रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. फळछाटणीपूर्वी बोर्डो मिश्रण एक टक्का या प्रमाणे फवारणी करून घ्यावी. पानगळ झालेल्या काड्या, ओलांडा व जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यावर व्यवस्थित कव्हरेज होईल, अशा प्रकारे फवारणी घ्यावी. काही परिस्थितीत पावसाळी वातावरण किंवा सतत पाऊस अनुभवास येत असल्यास फळछाटणीनंतर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा एक बोर्डो मिश्रणाची एक टक्के प्रमाणे फवारणी करून घ्यावी. जर पावसाळी परिस्थिती सतत राहत असल्यास जैविक नियंत्रण घटक उदा. बाजारात उपलब्ध ट्रायकोडर्मा पाच मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे काड्या, ओलांडा, खोड, बोद आणि दोन ओळींमधील जागेमध्ये फवारणी करून घ्यावी. या फवारणीकरिता साधारणपणे ४०० लिटर पाणी वापरावे. असे केल्यास जिवाणूंची संख्या त्वरित वाढून रोगनियंत्रणात राहील.

५) हायड्रोजन सायनामाइडचा वापर
काडीच्या जाडीनुसार, बागेतील तापमानानुसार व डोळे किती फुगलेले आहेत यानुसार हायड्रोजन सायनामाइडची मात्रा ठरवली जाते. साधारण स्थितीमध्ये ८ ते १० मि.मी. जाड काडीवर सुमारे ४० मि.लि. हायड्रोजन सायनामाइड प्रति लिटर पाणी या प्रमाणे वापरता येईल. याचे पेस्टिंग व्यवस्थित झाले की नाही, याची खात्री करण्याकरिता त्या द्रावण लाल रंग मिसळता येईल. किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम अथवा सल्फर ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळता येईल. वेलीवर जवळपास १० टक्के काड्या जास्त जाडीच्या दिसून येतील. अशा या निवडक काडीवर तितक्याच मात्रेचे हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग पुन्हा एकदा करून घ्यावे. त्याच काडींना वाकवून घ्यावे किंवा पीळ द्यावे. यामुळे सर्व प्रकारच्या काड्या एकाच वेळी फुटण्यास मदत होते.

६) डोळे फुटण्याची अवस्था
बागेत काडीवरील डोळे व्यवस्थितरित्या फुगलेले असल्यास आणि हायड्रोजन सायनामाइडचा वापर केलेला असल्यास फळछाटणीनंतर साधारणपणे आठव्या दिवशी डोळा कापसायला सुरुवात होते. याच अवस्थेला ‘पोंगा अवस्था’ असेही म्हणता येते. ही घड निघण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची अवस्था आहे. बागेत या वेळी पाऊस पडलेल्या असल्याने तापमानात घट झालेली असेल, तसेच आर्द्रतेचे प्रमाण वाढले असेल अशा वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढले असेल. सायटोकायनीन कमी झाले असेल. त्यामुळे घड जिरण्याची समस्या निर्माण होते. यासाठी बागेमध्ये फुटी निघत असताना एक ते दोन पानांच्या अवस्थेत पोटॅश अर्धा ते एक ग्रॅम व सायटोकायनीनयुक्त संजीवके उदा. ६ बीए यांची दहा पीपीएम प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

Grapes pruning
Grape : पावसाळी वातावरणातील द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com