Grape Farming Agrowon
यशोगाथा

Success Story of Grape Farming : हवामान बदलाला अनुकूल केली द्राक्षशेती

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Technology : सांगली जिल्ह्यातील तासगाव हा कमी पर्जन्यमान असलेला तालुका आहे. तालुक्यातील काही गावे आजही दुष्काळाचा सामना करतात. पण कष्ट व प्रयोगशीलतेच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी द्राक्षांची निर्यात करण्यापर्यंत हातखंडा मिळवला आहे. तालुक्यातील सावळज हे त्यातीलच गाव. गावातून अग्रणी नदी जाते. ती कोरडी असते. गावात सुमारे ८० टक्के द्राक्षपीक घेतले जाते. बहुतांश द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेसह निर्यात केली जातात. बेदाणा तयार करण्यासाठीही इथला शेतकरी पुढे आला आहे. गावातील अंकुश माळी हे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी आहेत. ते रसायनशास्त्राचे पदवीधर आहेत. शेतीचा शास्त्रीय व तांत्रिक अभ्यास करण्याची वृत्ती आहे. पत्नी जयश्री, मुलगा अजय व सून प्रतिक्षा असे त्यांचे कुटुंब आहे.

द्राक्ष बागेची सुरुवात

माळी यांनी १९७८ मध्ये द्राक्ष बागेला सुरुवात केली. वडिलोपार्जित ४२ गुंठे शेती होती. वडिलांनी १० गुंठ्यांत थॉम्पसन सीडलेस वाणाची लागवड केली. पै पै जमा करीत थोडी थोडी शेती खरेदी करण्यास सुरुवात केली. विहीर आणि तीन कूपनलिकांच्या माध्यमातून हमखास पाण्याची सोय झाली. आर्थिक परिस्थितीची घडी बसू लागली. पण निसर्गापुढे शेती टिकवणे आव्हानात्मक होते. सन २००३ मध्ये दुष्काळानं घेरलं. अशावेळी द्राक्षाचं वाढवलेलं क्षेत्र टिकवण्यासाठी अपार कष्ट घेतले. पण गंभीर पाणीटंचाईपुढं बाग काढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आता फक्त फुलशेतीचा आधार होता. सन २००४ मध्ये निसर्गाने साथ दिली. पुन्हा जिद्दीनं शून्यातून द्राक्ष लागवडीस सुरुवात केली. सन २०१२ पर्यंत द्राक्षक्षेत्र वाढले होते. आता बाग कोणत्याही स्थितीत काढायची नाही. नव्या तंत्रांचा वापर करून ती टिकवायची यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले.

संशोधन केंद्रातून मिळाली चालना

पुणे- मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात माळी यांचे जाणे-येणे असायचे. सन २०१२ मध्ये येथे द्राक्ष बागेवर केलेला प्लॅस्टिक पेपर आच्छादनाचा प्रयोग पाहण्यात आला. विविध प्रकारचे आच्छादन पेपर, त्यांची गुणवत्ता, टिकवण क्षमता अशा अनेक बाबींचा अभ्यास त्या निमित्ताने करता आला. अतिवृष्टी, परतीचा वा अवकाळी पाऊस यासह नैसर्गिक आपत्तीच्या संकटांतून बाग सोडविण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरायचे माळी यांनी ठरविले.

प्लॅस्टिक पेपरचा प्रयोग

माळी यांची आज दहा एकर शेती आहे. पैकी नऊ एकर द्राक्ष बाग आहे. यात सुपर सोनाका सहा एकर, माणिक चमन एक एकर, अनुष्का दोन एकर आहे. सन २०१३ मध्ये प्लॅस्टिक पेपर आच्छादन तंत्रज्ञान प्रयोग सुरू केला. त्यासाठी लोखंडी ‘स्ट्रक्चर’ उभारले. जमिनीखाली दोन फूट, जमिनीपासून ओलांड्यापर्यंत पाच फूट व तेथून वरती पाच फूट अशी एकूण उंची बारा फूट आहे. पेपर आच्छादनाखाली सुरुवातीला एक एकर असलेले क्षेत्र आज सहा एकरांपर्यंत आहे.

तंत्रज्ञानातील काही बाबी

१५० जीएसम प्लॅस्टिक पेपर. इस्रायली तंत्रज्ञान.

अतिनील किरणे, धूळ व गंधक यांच्यापासून संरक्षण करणारा पेपर.

बागेत सूर्यप्रकाशाचे चांगले वितरण होते.

गोडी छाटणीनंतर पेपर आच्छादन करून मग पेस्ट लावणे व अन्य कामे केली जातात. म्हणजे त्या काळात पाऊस आल्यास ही कामे वाया जात नाहीत.

साडेचार ते पाच महिन्यांसाठी पेपरचे आच्छादन असते. त्यानंतर तो काढून व्यवस्थित संरक्षित ठेवला जातो.

हवामान केंद्राची जोड

बागेचे व्यवस्थापन अधिक काटेकोर होण्यासाठी सन २०१९ मध्ये हवामान केंद्रही उभारले आहे. जमिनीपासून खोल असलेली कार्यक्षम मुळे, त्यांना पाण्याची असलेली गरज समजण्यासाठी मुळींच्या कक्षेत सहा इंचावर व अडीच फुटांवर असे दोन सेन्सर्स बसविले आहेत. याचबरोबर हवेतील आर्द्रता, तापमान, पर्जन्यमान आदी घटकही समजून येतात. त्यातून ‘किडी-रोग प्रादुर्भाव समजून फवारणी प्रभावी करता येते.

तंत्रज्ञान वापराचे झालेले फायदे

अति किंवा अवकाळी पावसापासून द्राक्षवेलींचे संरक्षण होते.

घड जिरण्याचे प्रमाण कमी. शेंड्यांची चांगली वाढ.

फुलोरावस्थेत गळ व कुजीचे प्रमाण घटते.

डाऊनी, भुरी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे पूर्वीपेक्षा फवारण्यांची संख्या ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यावरील खर्चही कमी झाला आहे.

बागेवर पक्षी संरक्षक जाळी वापरल्याने वटवाघळांचा त्रास कमी झाला आहे.

पाण्याची ४० टक्के बचत होते.

आगाप फळ छाटणी घेणे शक्य होऊन अपेक्षित दर मिळण्यास मदत झाली आहे.

व्यवस्थापन, उत्पादन व दर

माळी यांनी व्यवस्थापन तंत्रही चांगले ठेवले आहे. एकसारख्या वयांचे घड ठेवल्याने त्यांची वाढ एकसारखी मिळते. प्रति वेलीला ३० घड ठेवले जातात. सुपर सोनाका वाण असल्याने प्रति घड १०० पर्यंत मणी संख्या ठेवण्यात येते. एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. जुलैपासूनच (आगाप) गोडी छाटणीस सुरुवात होते. त्याचे १० जुलै, २० जुलै, ऑगस्ट असे टप्पे केले आहेत. आगाप छाटणीमुळे बाजारपेठेत द्राक्षे लवकर आणणे शक्य होते. आखाती देशांसह देशांतर्गत दक्षिणेकडील राज्यांत विक्री होते. द्राक्षांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने प्रति किलो ९० रुपयांपासून ते १००, ११० रुपयांपर्यंत कमाल दर मिळतो. अर्थात, हा दर कायम नसतो. अनेक वेळा तो घसरतोही. मात्र तंत्रज्ञान वापर व जोडीला अभ्यास, नेटके व्यवस्थापन यातून द्राक्षाची गुणवत्ता निर्यातक्षम जोपासणे शक्य झाल्याचे माळी सांगतात.

द्राक्ष बागेला प्लॅस्टिक पेपर आच्छादनासाठी एकरी चार लाखांपर्यंत खर्च आला. हे आच्छादन पाच ते सहा वर्षांपर्यंत टिकू शकते. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी ही गुंतवणूक ठरते. शिवाय दरवर्षी फवारण्यांच्या संख्येत मोठी बचत होत असल्याने त्यावरील खर्च तेवढ्या वर्षांत निघून जाऊ शकतो. उत्पादन चांगले मिळून दरही चांगले मिळतात.

अंकुश माळी ९४२१२२१७३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT