Grape Farming : द्राक्ष संशोधनातील गुंतवणूक वाढवावीच लागेल ः शिंदे

Grape Research : राज्याच्या द्राक्षशेतीत शेतकऱ्यांनी केलेली २० हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीच्या तुलनेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून संशोधनावरील खर्च केवळ पाच-सहा कोटींच्या आसपास आहे.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Grape Crop : पुणे ः राज्याच्या द्राक्षशेतीत शेतकऱ्यांनी केलेली २० हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. या गुंतवणुकीच्या तुलनेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून संशोधनावरील खर्च केवळ पाच-सहा कोटींच्या आसपास आहे. यापुढे जगाच्या बाजारपेठेत ठामपणे उभे राहायची असल्यास संशोधनावरील गुंतवणूक वाढवावीच लागेल, असे आग्रही मत सह्याद्री फार्मस्’ चे अध्यक्ष विलास शिंदे यांनी मांडले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने आयोजित केलेल्या ‘द्राक्ष परिषद -२०२३’ मधील पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जी. एस. प्रकाश होते. व्यासपीठावर बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, कोषाध्यक्ष सुनील पवार, संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे होते.

श्री. शिंदे म्हणाले, “उसापेक्षाही द्राक्षाची बाजारपेठ मोठी आहे. सध्या जगाची द्राक्षाची बाजारपेठ दहा लाख कोटींची आहे. त्यात चीनचा वाटा दीड लाख कोटीचा आहे तर, भारताचा वाटा १५ हजार कोटींचा आहे. ही बाजारपेठ निश्चित वाढू शकते. सध्या विविध कारणांमुळे द्राक्ष शेती सतत तोट्याकडे झुकते आहे. हे पीक करावे की नाही, असा संभ्रमदेखील नव्या पिढीत आहे. कारण, या पिकातील भांडवली गुंतवणूक वाढते आहे.

शास्त्रीय पद्धतीने केल्यास द्राक्षशेतीतून नफा मिळतो. मात्र, त्यासाठी आधी जोखीम व्यवस्थापन उत्तमरीत्या सांभाळायला हवे.” जगात आघाडीच्या द्राक्ष उत्पादक देशांनी वाण विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, संशोधनाला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेसारखे देश आता ६८ टक्के पेटंटेड नव्या वाणांकडे वळाले आहेत, असे स्पष्ट करीत शिंदे म्हणाले, “ देशात द्राक्ष उत्पादन तुलनेने सोपे; पण विपणन अवघड झालेले आहे.

आपण बळीराजा म्हणत असलो; तरी बाजारात आता ग्राहक राजा बनलेला आहे. त्याला जे हवे तेच द्यायला हवे. त्यासाठी अनेक आव्हाने असून ती पेलण्यासाठी आपल्याला द्राक्षशेतीत एक उद्योग म्हणून नियोजनात्मक काम करावे लागेल.”

Grape Farming
Grape Farming : हवामान बदलामुळे द्राक्ष शेतीवर संकट

विलास शिंदे म्हणाले, -द्राक्षशेतीत आता रंगीत वाणांकडे वळावे. -जगातील उत्तम लागवड साहित्य देशात आयात करावे. -लागवड ते काढणी या वेळापत्रकाचे डिजिटलायझेशन व्हावे. -बाजारपेठेत द्राक्ष, बेदाण्याची प्रत व्याख्या करावी लागेल.

पॉलिफिनॉल तंत्र उपयुक्त ठरणार ः ब्रेकम्येर ब्राझीलचे शास्त्रज्ञ क्लॉज ब्रेकम्येर यांनी अतिवृष्टीमध्ये द्राक्षाचे व्यवस्थापन उत्तमरीत्या करायचे असल्यास अजैविक तणावाचे व्यवस्थापन समजावून घ्यावे असे सांगितले. ते पुढे म्हणाले, “जास्त पाण्यामुळे मण्यांना तडे जातात. क्षमतेनुसार बागांना पाणी दिल्यास या समस्येवर उपाय सापडतात. ही समस्या हाताळण्यासाठी ‘एनन्यूव्ही’ कंपनीने पॉलिफिनॉल आधारित एक पेटंटेड तंत्र बाजारात आणले आहे.

पॉलिफिनॉल व इतर धनभारित अन्नद्रव्ये घेऊन आम्ही हे इटलीत तंत्र बनविले आहे. मणी तडकू नयेत म्हणून पॉलिफिनॉलिक संयुगे उत्तम काम करतात. पीक संरक्षण देतात. रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे द्राक्षाची चव, रंग यावरही सकारात्मक फरक पडतो. द्राक्षाची उत्पादकता कमी होण्याचे मुख्य कारण जैविक किंवा अजैविक ताण हे आहे.

द्राक्ष शेतीत ताण असल्यास पॉलिफिनॉल मात्र उत्तम काम करते. ते लिग्निन तयार करते. त्यामुळे पेशीभित्तिका भक्कम होतात. परिणामी मणी दर्जेदार होतात. ताण सहन करून शकतात. द्राक्ष वेलींची पर्णरंध्रे उघडी राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते. त्यामुळे हिरवेपणा टिकून राहतो. परिणामी ते ताणाला जास्त प्रतिकार करते.

Grape Farming
Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

संतुलित खत व्यवस्थापन महत्त्वाचे ः डॉ. मराठे

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी जमिनीच्या प्रकारानुसार अन्नद्रव्यांचे होणारे व्यवस्थापन अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले. अन्नद्रव्ये मातीचे कण शोषतात. नंतर ते वनस्पतींकडे जातात. भारी जमीन असल्यास अन्नग्रहण क्षमता हलक्या जमिनीच्या तुलनेत एक लाख पटीने वाढलेली असते. जमिनीची अन्नद्रव्य धारण क्षमता लक्षात घेतली जात नाही हे गंभीर आहे.

मुरमापासून माती तयार होण्यासाठी काही हजार वर्षे लागतात. झाडाची नेमकी गरज काय आहे, हे तपासून शेती करायला हवी. पांढऱ्या मुळीच्या माध्यमातून झाड अन्नद्रव्य घेते. झाडाचा मूळ विस्तार, जमिनीची प्रत, अन्नधारण क्षमता विचारात घेतल्याशिवाय चांगले उत्पादन येऊ शकत नाही. सिलिकॉनचा वापर वाढतो आहे. त्याचा उपयुक्तता फळशेतीत दिसून येते आहे. १७ अन्नद्रव्यांचा पुरवठा आपण पिकाला देतो.

पालाश एकमेव अन्नद्रव्य असे आहे की ते वाया जात नाही. त्यामुळे त्याचा प्रमाणशीर पुरवठा करायला हवा. शेतकरी ४० प्रकारची खते टाकत असतो. जैविक खते हे खत नसून सूक्ष्मजीवाणू आहेत. त्यांना जगण्यासाठी सेंद्रिय पदार्थ लागतात.

ते नसतील तर जिवाणूंची वाढ होत नाही. पीएसबी हे सर्वात चांगले जैवखत असून, त्यासाठीही सेंद्रिय पदार्थ जोडीला लागतात. बाजारातील जैवखते आम्ही तपासले असता त्यात जिवाणू संख्या शिफारशीपेक्षा चिंताजनक कमी आढळली. आपण चिलेटेड खते वापरतो. पण सेंद्रिय पदार्थ सर्वात चांगले चिलेटेड असतात.

अन्नद्रव्यांसाठी मुळांची स्थिती महत्त्वाची ः थत्ते ‘सोल्यूशन फर्टिलायझर इंडस्ट्रीज असोसिएशन चे प्रमुख रवींद्र थत्ते यांनी द्राक्षबागेच्या उत्पादनात ‘सॉम्स्’ ही संकल्पना समजावून सांगितली. विद्राव्य खते, सेंद्रिय पदार्थ, खते व भूसुधारके याचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, जमीन, पान, देठ परीक्षणानंतरच खतांचा वापर व्हायला हवा.

निव्वळ जोरखते व विद्राव्य खतांच्या भरवशावर आपण सातत्याने दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेऊ शकत नाही. विद्राव्य खतांची क्षारता कमी असते. त्यामुळे कमी क्षारता असलेल्या खतांची निवड करता येते. गोण्यांनी खते देण्याऐवजी चमचा चमचा खत देण्याची संकल्पना उपयुक्त ठरते आहे. मात्र, खते मुळांच्या जवळ जायला हवी. मुळे काम करीत नसल्यास तुम्ही कितीही अन्नद्रव्य दिले तरी ते पिकाला उपलब्ध होणार नाही.

टप्प्याटप्प्याने छाटण्या करा ः

डॉ. उपाध्याय राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के.उपाध्याय यांनी द्राक्षशेती नफेशीर ठेवायची असल्यास अजैविक ताणाचे व्यवस्थापनावर भर दिला. ते म्हणाले, “जमिनीचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. बागांना जास्त पाणी देऊ नका. पावसाळ्यात अनावश्यक फवारण्या झाल्यास बागेच्या प्रकृतीवर ताण पडतो.

परिणामी टनेज घटते. छाटण्या एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे बाजारात मालदेखील एकाच वेळी येत आहे. हे टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने छाटण्या केल्या पाहिजे.” प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुहास थोरात (नारायणगाव), अतुल बाबर (सांगली), महादेव भोसले (सांगली), माणिकभाऊ गंगथडे (सोलापूर), नितीन पोपट कापसे (सोलापूर) यांनी त्यांच्या बागेत केलेल्या प्रयोग व नियोजनाची अभ्यासपूर्ण माहिती दिली.

आजही आपली शेतीच उत्तम आहे…

सोलापूर येथील प्रगतिशील शेतकरी माणिकभाऊ गंगथडे यांनी चर्चासत्रात साध्या शब्दात सांगितलेली शेती तंत्रे उपस्थितांना भावली. ते म्हणाले, “आजही शेती उत्तमच आहे. मध्यम व्यापार आहे आणि कनिष्ठ नोकरी आहे. कष्ट आणि तंत्र वापरले तर शेती आपल्याला बरकत देते.

चार वर्षे दुष्काळ पडला तरी त्यानंतर तीच शेती पाचव्या वर्षी आपल्याला साऱ्या नुकसानीतून बाहेर काढते. मात्र, त्यासाठी शेतीशी प्रामाणिक असायला हवे. प्रामाणिकपणे, नियोजनाने द्राक्षशेती करणाऱ्याला बाग कधीही दगा देणार नाही. मी अर्धा एकर द्राक्षशेती करीत होतो. आता २७ एकरची बाग सांभाळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com