Success Story
Success Story Agrowon
यशोगाथा

Success Story : छत्रपती संभाजीनगरमधील गोपाळ दांपत्याचा अस्सल स्वादाचा दही-धपाटा ते नावीन्यपूर्ण ‘डिझ्झा’

Santosh Munde

Chhatrapati Sambhajinagar Story : मूळ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील एकनाथ व आश्‍विनी या गोपाळ दांपत्याची तीन एकर कोरडवाहू शेती होती. त्यातून कुटुंबाचा चरितार्थ भागणे शक्य नव्हते. त्यामुळे एकनाथराव १९९६ पासून माजलगावात एसटीडी पीसीओ बूथ चालवायचे. तो चार वर्षे चालला. त्यानंतर बंद पडला. मग त्यांनी शेतीची वाट धरली.

सन २००१ मध्ये कमावलेल्या पैशातून विहीर खोदली. परंतु पाणीच लागले नाही. मग शेतीत उत्पन्न काढायचं कसं आणि चरितार्थ भागवायचा कसा असा प्रश्‍न उभा ठाकला.

पुन्हा नवे प्रयत्न

कबीरांच्या दोह्याप्रमाणे ‘खाली ना बैठ कुछ किया कर, भलेही अच्छा पैजामा फाडकर फिरसे सिया कर’ या विचारांप्रमाणे एकनाथराव स्वस्थ बसणारे नव्हतेच. त्यांनी पुन्हा तालुक्याचे ठिकाण माजलगावची वाट धरली. इच्छाशक्ती होती, परंतु जवळ पैसा नव्हता.

त्यातून मार्ग काढण्यासाठी चार जिवलग मित्रांकडून प्रत्येकी पाचशे रुपये आणि एका मित्राकडून १००० रुपये हात उसने घेतले. त्यातून माजलगावात गणपती मंदिराजवळ चहाचे कॅन्टीन सुरू केले. त्यातील उत्पन्नातून उसनवार पैशाची परतफेड केली.

दिली दही- धपाट्याची जोड

चहाचे कॅन्टीन चालवत असताना २००७ मध्ये ग्राहकांच्या मागणीवरून पोळी- भाजी ठेवणे सुरू केले. ते ग्राहकाच्या पसंतीस उतरल्यानंतर गावाकडच्या ‘धपाट्या’सोबत दही, शेंगदाणा चटणी, ठेचा, लोणचं अशा पद्धतीची डिश ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

चणाडाळ, ज्वारी पीठ व गव्हाचे पीठ यांचा प्रमाणशीर वापर करून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले अस्सल चवीचे धपाटे ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले. मागणी वाढू लागली, मग गोपाळ दांपत्याने या धपाट्याला शहरी खवय्यांच्या डिशमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्याचा निर्णय घेतला.

पोळी-भाजीला पंजाबी डिशेस आधारित राइस प्लेटची जोड दिली. मात्र ‘फोकस’ दही धपाट्यावर ठेवला. मुलाच्या नावावरून असलेला माजलगावचे प्रसिद्ध ‘ओम’चे दही-धपाटे हा ब्रॅण्ड अल्पावधीत बीड जिल्ह्यात लोकप्रिय झाला.

ब्रॅण्ड केला लोकप्रिय

दरम्यान, मुलांच्या शिक्षणासाठी या दांपत्याला माजलगाव सोडून श्री छत्रपती संभाजीनगर हे मोठे शहर गाठण्याची वेळ आली. खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी, नंतर मोठ्या शहरात येऊन धपाट्याच्या भरवशावर रेस्टॉरंट चालवणे. त्यावर मुलांचे शिक्षण आणि कुटुंब उभे करणे ही सोपी गोष्ट नव्हती.

कारण इथे आधीच विविध थाळ्या आणि पक्वान्नांचा गराडा होता. त्यात अस्तित्व टिकवणे सोपे नव्हतेच. पण मेहनत, सातत्य, जिद्द व गुणवत्ता व स्वादयुक्त निर्मिती यांच्या जोरावर गोपाळ दांपत्याने दही धपाटे उत्पादनात स्वतःची ओळख तयार केली. यात सिडको बसस्थानकाच्या परिसरात एका जागी चार वर्षे आणि अलीकडे आठ वर्षांपासून दुसऱ्या जागेत ‘ओम व्हेज रेस्टॉरंट’द्वारे ग्राहकांना सेवा देण्यात हे दांपत्य व्यस्त आहेत.

कोरोना काळात व्यवसायाचा कणाच मोडला. परंतु जमेल तसा व्यवसाय चालवून दांपत्याने सर्व नियम पाळून ग्राहकांच्या मागणीनुसार आपले अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. व्यवसायातले सातत्य टिकून राहिले.

‘डिझ्झा’चा जन्म

आजच्या तरुणाईला फास्ट फूड, जंक फूडची भुरळ. त्यात आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होणे आलेच. अशा तरुणाईला आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीतील धपाट्यातून सकस आणि दर्जेदार काही देता येईल का, याचा विचार लॉकडाऊन काळात गोपाळ दांपत्याने केला.

‘किचन’ची जबाबदारी सांभाळणाऱ्या आश्‍विनीताईंनी मैद्याचा ‘बेस’ न वापरता धपाट्याच्या पिठाचा ‘बेस’ वापरून पिझ्झाला पर्याय आणण्याचे प्रयोग सुरू केले. त्यासाठी चणाडाळ, ज्वारी व गव्हाचे पीठ यांच्या प्रमाणशीर वापरातून ‘बेस’ तयार केला. पालेभाज्या, चीज, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, पास्ता, मायोनिज, बारीक शेव, कोथिंबीर आणि सॉस टाकून यांचा वापर केला.

ओव्हनमध्ये ते ठेवून तरुणाईला पसंत पडेल असा ‘डिझ्झा’ तयार झाला. विशेष म्हणजे ग्राहक आले की दहा मिनिटांत ताजा ‘डिझ्झा' त्यांच्या ताटात पडतो. सध्या एकच फ्लेवर असला, तरी पुढील काळात १० ते १२ फ्लेवर्स आणण्याचा विचार आहे.

डिझ्झा केला लोकप्रिय

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन दांपत्याने डिझ्झाची चव विविध ग्राहकांना मोफत चाखायला दिली. तरुणाईच्या आवडीनुसार चीज, बटर, पनीर, सॉस आदींचा वापर त्यात केल्याने ग्राहकांनाही पसंत पडण्यास सुरुवात झाली. गोपाळ दांपत्यासाठी तो आनंद काही वेगळा होता.

अन्य शहरांतून मागणी

माजलगावचे ‘ओम’चे खमंग दही-धपाटे व ‘डिझ्झा’ हे दोन्ही पदार्थ अन्य शहरांतील ग्राहकांनाही आवडले. आमच्या शहरातही ते असायला हवेत अशी मागणी सुरू झाली. त्यातूनच त्याची फ्रॅंचायजी देणे सुरू केले. आज श्री छत्रपती संभाजीनगरसह कोल्हापूर व पुणे येथे मिळून दोन शाखा सुरू झाल्या आहेत. आणखी पाच- सात ठिकाणी शाखांची मागणी आहे.

मुले शिकली, कामगारांनाही रोजगार

याच व्यवसायाच्या आधारे दांपत्याला मुलांना चांगले शिक्षण देता आला. मुलगी अमृता हिंगोलीच्या महाविद्यालयातून ‘बीडीएस’, मुलगा आदित्य पुणे येथे इंजिनिअरिंग करतो आहे. मुलगा ओम बारावी झाला असून, घरच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी ‘हॉटेल मॅनेजमेंटचे’ शिक्षण घेणार आहे. या व्यवसायातून दांपत्याने पाच- दहा कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळतो आहे.

धपाटे व डिझ्झा उद्योग

-धपाटा विविध २४ फ्लेवर्समध्ये उपलब्ध. डिझ्झा हा शब्दही व्यापारी नोंदणीकृत झाला आहे.

-धपाटा ७० ते १३० रुपये, तर डिझ्झा १६० रुपये दर.

दिवसाला धपाट्यांची १२५ पासून ते २०० पर्यंत विक्री. डिझ्झा हळूहळू पिकअप घेत आहे.

-यंदाचे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून २०३१ पर्यंत भारतातील अधिकाधिक ग्राहक

आपला सकस डिझ्झा खातील असा गोपाळ दांपत्याचा संकल्प आहे. आरोग्य संवर्धन

हाच संकल्प घेऊन दांपत्याचे कार्य सुरू आहे.

परदेशात पोहोचला धपाटा

श्री छत्रपती संभाजीनगर शहरात विविध भागांतून विविध कामांनिमित्त लोक येत असतात. काही ना काही निमित्ताने त्यांच्या कानावर धपाटे व डिझ्झा यांची ख्याती जाते.

काही परदेशी पर्यटकही येथील रेस्टॉरंटमध्ये येतात. या सर्वांच्या माध्यमातून दुबई, आशियायी देश व अमेरिकेपर्यंत आपला धपाटा पोहोचल्याचे एकनाथराव सांगतात. काही ग्राहकांनी आपला अभिप्रायही नोंदविला आहे.

संपर्क : एकनाथराव गोपाळ, ९९२३५४२०४८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

SCROLL FOR NEXT