Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली परिसरात ऊस हे प्रमुख पीक आहे. त्यापाठोपाठ डाळिंब, द्राक्षासह हंगामी फळपिके व भाजीपाला यांचे उत्पादन होते. गावापासून २ ते ४ किलोमीटरवर भीमा नदी आहे. तेथून काहींनी पाइपलाइन करून पाणी आणले आहे, काहीजणांकडे स्वतःच्या विहिरी आणि बोअर आहेत. त्यावर शेतीच्या पाण्याची गरज भागते. याच गावातील नागेश जाधव यांची साडेसात एकर शेती आहे. पैकी चार एकरांत डाळिंब, एक एकरात शेडनेटमध्ये सिमला मिरची, एक एकरांत चारापिके तर एक एकर क्षेत्र त्यांनी खरबुजाला दिले आहे.
विहीर खोदाई आणि मजुरी
जाधव कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्वीपासूनच कमजोर होती. नागेश त्यांचे वडील ज्ञानोबा पूर्वीपासून शेतमजुरी करायचे. एक गुंठाही शेती त्यांच्याकडे नव्हती. या बिकट परिस्थितीमुळे नागेश यांनाही शिक्षण घेता आले नाही. सन १९९४ च्या सुमारास दहावीतूनच त्यांना शाळा सोडून द्यावी लागली. पुढे त्यांनीही शेतमजुरी सुरू केली.
विहीर खोदाईच्या क्रेनवर मजूर म्हणून काम सुरू केले. पाच-सहा वर्षे हा खडतर संघर्ष केला. दरम्यान, पैशाची जुळवाजुळव व आर्थिक नियोजन सुरू होते. त्यातूनच १९९९ मध्ये स्वतःची क्रेन घेत विहीर खोदाईची कामे घेण्यास सुरुवात केली. इथेच आयुष्याला खऱ्या अर्थाने ‘टर्निंग पॉइंट’ मिळाला.
याच व्यवसायाच्या बळावर २००९ मध्ये सव्वातीन एकर शेती घेणे शक्य झाले. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. अविरत कष्ट आणि समस्यांशी सामना करीत नागेश पै पै जोडत राहिले. त्यातूनच २०१८ आणि २०१९ मध्ये सव्वाचार एकर शेती घेता आली. आता एकूण क्षेत्र साडेसात एकरांपर्यंत पोहोचले.
शेतीत सुरू झाली प्रयोगशीलता
शेतीचे क्षेत्र विस्तारल्यावर नागेश विविध प्रयोग करण्यासाठी सिद्ध झाले. सन २००९ मध्ये त्यांनी डाळिंबाची लागवड केली. प्रत्येक पिकाचा सूक्ष्म अभ्यास करून उल्लेखनीय अधिक उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. आता दरवर्षी एकरी १० ते १२ टनांपर्यंत डाळिंबाचे उत्पादन ते घेतात. गुणवत्तापूर्ण मालाला प्रति किलो ८० ते १५० रुपयांपर्यंत दरही मिळवतात.
डाळिंबापाठोपाठ २०१५ मध्ये शेडनेट उभारून ‘हायटेक’ शेतीचा प्रयोग केला. त्यात सिमला मिरची लावली. या पिकातही हातखंडा तयार केला आहे. एकरी किमान ३२ ते कमाल ४८ टनांपर्यंतचे उत्पादन मी या पिकातून घेतो असे ते आत्मविश्वासपूर्वक सांगतात. प्रति किलो २५ ते ३० रुपये दर मिळतो.
खरबुजाची यशस्वी शेती
डाळिंब व ढोबळी मिरची यांच्याबरोबर खरबूज हे नागेश यांचे तिसरे व महत्त्वाचे व्यावसायिक पीक झाले आहे. सुमारे पाच वर्षांपासून या पिकात सातत्य ठेवले आहे. दरवर्षी उन्हाळी हंगामाच्या तोंडावर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एक एकर क्षेत्र खरबुजासाठी राखीव ठेवले जाते. हिरवट व काहीसे तपकिरी, मध्यम आकार व टिकवणक्षमता (कीपिंग क्वालिटी) चांगली अशी वैशिष्ट्ये असलेल्या वाणाची चे निवड करतात.
लागवडीपूर्वी ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे जमिनीची चांगली मशागत केली जाते. ट्रॅक्टरच्या साह्यानेच प्रत्येकी सहा फुटांवर एक याप्रमाणे गादीवाफे (बेड) तयार केले जातात. त्यानंतर मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डोस दिले जातात. बेड भरून घेतल्यानंतर त्यावर मल्चिंग पेपर अंथरण्यात येतो. दोन ओळींत सहा फूट आणि दोन रोपांत सव्वा फूट अंतर ठेवून लागवड होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसात ‘हार्वेस्टिंग’ सुरू होऊन सुमारे ७० दिवसांमध्ये प्लॉट संपतो.
उत्पादन व अर्थकारण
नागेश सांगतात, की फळाची गुणवत्ता चांगली असतेच. शिवाय वजन ६०० ग्रॅमपासून ते सव्वा किलोपर्यंत मिळते. टिकवणक्षमताही अधिक असल्याने दिल्ली मार्केटपर्यंत या फळाला मागणी राहते. दरवर्षी एकरी १३ ते १४ टनांपर्यंत उत्पादन मिळते. व्यापारी थेट जागेवर येऊन फळ खरेदी करतात. त्यामुळे वाहतुकीसह अन्य खर्चांमध्ये मोठी बचत होते.
वाशी- मुंबई मार्केटला बहुतांश माल जातो. पुणे, हैदराबाद, तेलंगण या बाजारातही नागेश यांच्या खरबुजाची विक्री होते. मागील तीन-चार वर्षांची सरासरी पाहायची तर किलोला ३५ रुपये दर मिळाला आहे. अर्थात हा दर सुरवातीच्या काळात असतो. त्यानंतर २५, २० रुपये व अगदी अखेरीस तो १३ रुपयांपर्यंत मिळतो. २०२३ मध्ये एकरी १७ टन उत्पादन व १७ रुपये मिळाल्याचे नागेश सांगतात.
एकत्र असणे हीच आमची ताकद
जाधव यांचे एकत्रित कुटुंब आहे. शेतात नागेश, पत्नी स्वाती, लहान बंधू संतोष व त्यांची पत्नी सुलभा असे चौघेही राबतात. वडील आता शरीराने थकले असून ते विश्रांती घेतात. त्यांचे मार्गदर्शन या सर्व सदस्यांना मिळते. नागेश म्हणाले, की मजुरी व शेतीतूनच आम्ही सर्व प्रगती केली आहे. सर्वजण एकत्र असणे हीच आमची खरी ताकद आहे.
शेतीमुळेच पंधरा लाखांचे शेडनेट उभारता आले. टप्प्याटप्प्याने शेती खरेदी करता आली. पाइपलाइन केली. सर्व क्षेत्र ठिबकखाली आणता आले. घरातील आमच्या पिढीच्या लग्नांबरोबर नव्या पिढीच्या म्हणजे माझ्या व बंधूच्या मुलीचे लग्नही चांगल्या प्रकारे पार पाडता आले याचे समाधान असल्याचे नागेश यांनी सांगितले.
आज ट्रॅक्टर, त्यासंबंधित सर्व यंत्रे- अवजारे आहेत. जोडव्यवसाय म्हणून मळणी यंत्रही घेतले आहे. एकेकाळी क्रेन घेऊन विहीर खोदाईची कामे केली होती. आता हे काम थांबवले असले तरी ती क्रेन म्हणजे लक्ष्मी असल्याने आजही शेतात ती उभी असल्याचे नागेश सांगतात.
नागेश जाधव ९८२२९०१२१४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.