Foreign Vegetables Agrowon
यशोगाथा

Exotic Vegetable Production : परदेशी भाजीपाला विक्रीचा ‘फ्रेश बास्केट’ ब्रॅण्ड

सुनीता कारभारी चौधरी या सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील प्रयोगशील महिला शेतकरी. बाजारपेठेचा अभ्यासकरून त्यांनी आठ वर्षांपासून पारंपरिक भाजीपाल्या सोबत परदेशी भाजीपाला लागवडीस सुरुवात केली.

गणेश कोरे

Pune Women Story : सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील सुनीता कारभारी चौधरी या प्रयोगशील महिला शेतकरी. चौधरी कुटुंबाची तीन एकर पारंपरिक शेती (Traditional Agriculture). गेल्या काही वर्षांत परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे विविध मॉल्स आणि पंचतारांकित हॉटेल्सला सुरुवात झाली.

यांच्याकडून परदेशी भाजीपाल्याची मागणी (Exotic Vegetable Demand) होऊ लागली. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सुनीताताईंनी गेल्या आठ वर्षांपासून पारंपरिक शेतीला परदेशी भाजीपाला लागवडीची (Exotic Vegetable Cultivation) जोड दिली आहे.

सुनीताताईंचे माहेर फुरसुंगी. त्यांचे वडील कै. यशवंत चोरघडे हे देखील प्रयोगशील शेतकरी होते. सुनीताताईंचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात झाले. खेळाची आवड असल्याने त्यांचा कल क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाकडे होता.

स्पर्धा परीक्षा देत त्या पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण देखील झाल्या. मात्र घरातील पारंपरिक संस्कारामुळे वडिलांनी पोलिस प्रशिक्षणासाठी पाठविले नाही. पुढे त्यांचे लग्न सोरतापवाडी येथील प्राध्यापक कारभारी चौधरी यांच्याशी झाले.

पदवीपर्यंतचे शिक्षण, स्पर्धा परीक्षेतील यश आणि वडिलांकडून मिळालेले शेतीचे संस्कार यामुळे लग्नानंतर शेतीची आवड सुनीताताईंना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचे पती प्राध्यापक असल्यामुळे ते वाघापूर येथे नोकरीसाठी जायचे.

त्यामुळे कुटुंबाच्या तीन एकर शेतीची जबाबदारी सुनीताताईंकडे आली. १९९७ पासून त्यांनी घरच्या शेतीमध्ये पूर्णवेळ लक्ष देण्यास सुरुवात केली. या शेतीमध्ये शेवगा, केळी, गुलाब या पिकांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतले जायचे.

मात्र २००० पासून पीक पद्धतीमध्ये बदल करत त्यांनी पुदिन्याची लागवड सुरू केली. या काळात गाव परिसरात मॉल आणि पंचतारांकित हॉटेल्स सुरू झाली होती. त्यांच्याकडून परदेशी भाजीपाल्याची मागणी होऊ लागली.

काही व्यापारी आणि त्यांचे प्रतिनिधींनी परिसरातील शेतकऱ्यांना परदेशी भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देऊन खरेदीची तयार दर्शविली. ही नवीन संधी लक्षात घेऊन सुनीताताईंनी २००३ पासून टप्प्याटप्प्याने परदेशी भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. या पिकातील चढ-उतार अभ्यासले.

परदेशी भाजीपाला लागवडीचे नियोजन ः

सुनीताताईंना पहिल्यांदा परदेशी भाजीपाल्यांची नावे देखील माहिती नव्हती. या वेळी व्यापारी प्रतिनिधींकडून त्यांची नावे समजून घेतली. पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासदेखील केला. परिसरातील कृषी तज्ज्ञ, बाजार समितीमधील कृषी सेवा केंद्रचालकांशी चर्चा करून विविध भाजीपाल्याची प्रायोगिक तत्त्वावर पाच गुंठे क्षेत्रावर लागवड सुरू केली.

सुनीताताईंना पुदिना लागवडीचा अनुभव होता. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सेलरी, बेसील, रेड कॅबेज, लिक, आइसबर्ग, ब्रोकोली, रोमन, पॉकचॉय लागवडीस त्यांनी सुरुवात केली.

सोलापूर रस्त्यावर वाढणारे शहरीकरण आणि टाउनशिपमुळे या परिसरात मोठे मॉल आणि मोठी हॉटेल्स सुरू झाली होती. त्यांच्याकडून परदेशी भाजीपाल्यास मागणी वाढल्याने विक्रीचा आत्मविश्‍वास आला.

त्यामुळे सुनीताताईंनी प्रत्येक भाजीपाल्याची लागवड टप्प्याटप्प्याने २० गुंठ्यांपर्यंत नेली. सर्व भाजीपाला पिकांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन केले आहे. सध्या पुण्यातील विविध मॉलमध्ये ताजा भाजीपाला विक्रीस जातो.

त्यांनी भाजीपाला विक्रीसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता येथील बाजारपेठेत जाऊन भाजीपाला मागणीचा अभ्यास केला. काही प्रमाणात या शहरांमध्ये देखील परदेशी भाजीपाला विक्रीचे नियोजन केले.

निर्यातीसाठी प्रयत्न ः

सुनीताताईंचा मुलगा रोहन याने उच्च शिक्षणानंतर शेतीमध्ये काम करण्याचा रस दाखविला. मित्रांच्या मदतीने त्याने कांदा, बटाटा, आणि डाळिंबाबरोबरच परदेशी भाजीपाला निर्यातीला सुरुवात केली. यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि ॲग्रिकल्चरमध्ये निर्यातीचे प्रशिक्षण घेतले.

निर्यातीसाठी दुबई, सिंगापूर आणि मलेशिया येथे प्रत्यक्ष जाऊन बाजारपेठेचा अभ्यास केला आणि निर्यात सुरू केली. मात्र कोरोना काळात भाजीपाला निर्यात बंद झाल्याने व्यवसायाची घडी विस्कटली.

यातून सावरत सध्या रोहन स्थानिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतील भाजीपाला विक्रीचे व्यवस्थापन आणि कोकोपीट विक्री व्यवसाय करत आहे.

प्रक्रिया उद्योगाचे नियोजन ः

गेल्या दहा वर्षांत सुनीताताईंना परदेशी भाजीपाला लागवड आणि विक्री तंत्रामध्ये आत्मविश्‍वास आला, यानंतर निर्यातीसाठी देखील प्रयत्न केले. आता परदेशी भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचे त्यांचे नियोजन आहे. तसेच परदेशी फळांच्या लागवडीबाबतही त्यांचा अभ्यास सुरू आहे.

‘फ्रेश बास्केट‘ ब्रॅण्डची निर्मिती

परदेशी भाजीपाल्याच्या पुरवठ्यानंतर सुनीताताईंनी मुलगा रोहन, रोहित यांच्या मदतीने सुनीता ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून ‘फ्रेश बास्केट’ ब्रॅण्ड विकसित केला आहे. या नावाने आता भाजीपाला विक्री केली जात आहे.

बाजारपेठेत विविध भाजीपाल्यांचा वर्षभर पुरवठा होण्यासाठी त्यांनी तीन एकरांवर वीस गुंठे चक्राकार पद्धतीने विविध परदेशी भाजीपाल्याची लागवड सुरू केली. एक एकर क्षेत्रावरील शेडनेटमध्ये भाजीपाला उत्पादन घेतले जाते.

मागणी वाढल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा गट तयार करून परदेशी भाजीपाला पिकांची लागवड वाढविली. सध्या २५ शेतकरी त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत. यामुळे बाजारपेठेत वर्षभर भाजीपाल्याचा पुरवठा होत आहे.

स्वतःच्या शेतीमध्ये उत्पादित झालेल्या परदेशी भाजीपाल्याच्या विक्रीतून दररोजचा खर्च वजा जाता सरासरी पाच हजार रुपयांची मिळकत होते.

सध्या दररोज साधारणपणे २०० ते २५० किलो परदेशी भाजीपाल्याचा पुरवठा पुणे परिसरातील मॉल तसेच देशांतर्गत बाजारपेठेत केला जातो. वर्षभर साधारणपणे सर्वच भाजीपाल्यास प्रति किलोस ५० ते ७० रुपये सरासरी दर मिळतो.

भावाला दिली साथ...

सुनीता चौधरी यांनी परदेशी भाजीपाला उत्पादनात आत्मविश्‍वास आल्यानंतर फुरसुंगी येथे असलेला भाऊ सतीश चोरघडे यांना देखील प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले.

या मार्गदर्शनातून सतीश यांनी दोन एकर क्षेत्रावर विविध परदेशी भाजीपाल्यांची लागवड सुरू केली आहे. त्यांनी देखील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. उत्पादित भाजीपाल्याची विक्री पुणे बाजार समितीमध्ये केली जाते.

संपर्क ः सुनीता चौधरी, ९०११६८६७४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT