Horticulture Development : रत्नागिरी शहरापासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर खाडी किनारी वसलेल्या डोर्ले गावाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. येथील लोकांचा भातशेती आणि मजुरी हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्याचबरोबर या परिसरात आंबा बागाही मोठ्या प्रमाणात आहेत. याच गावात राहणारे अजय तेंडुलकर यांचे वडील रवींद्रनाथ हे मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला होते.
त्यांचा केटरिंगचा व्यवसायही होता. नोकरी सुटल्यानंतर तेंडुलकर कुटुंबीय गावाकडे परतले. त्यानंतर अजय यांनी काही महिने केटरिंगचा व्यवसाय सांभाळला, पण गावाकडची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती. २००५ मध्ये अजय मुंबई सोडून कायमचे गावात आले. त्यानंतर जिद्द, मेहनतीच्या जोरावर यशस्वी आणि प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली.
...अशी झाली बागायतीची सुरुवात
सुरुवातीपासूनच शेती करण्याची उमेद अजय यांची होती. त्यातून त्यांनी २००५ मध्ये गावातील पाच एकर ओसाड पडीक जागा बागायतीसाठी विकत घेतली. ही जागा विकसित करण्यासाठी जनता सहकारी बँकेमधून २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्या जागेत २५० हापूसची आणि २५० नारळाची झाडे लावली. कोकण कृषी विद्यापीठाच्या निकषानुसार एक गुंठ्यात एक या प्रमाणे लागवड केली.
पुढे राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतील अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला. त्यामधून एक लाख रुपयांचे अनुदान मिळाले. मिळालेल्या कर्जाची सात वर्षांत परतफेड करावयाची होती. हापूस, नारळाची लागवड केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्यासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार होती. या बागेला पाण्याचे नियोजन करण्यासाठी कातळावरील जागेत विहिरी खोदून घेतली.
नारळामध्ये केळीचे आंतरपीक
कर्जाचे हप्ते सात वर्षांनी सुरू होणार असले तरीही व्याज कमी करण्यासाठी अजय यांनी शक्कल लढवली. नारळाच्या बागेमध्ये केळीचे आंतरपीक घेतले.
लागवडीनंतर ११ व्या महिन्यात केळीचे उत्पादन सुरू झाले. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपसूकच कर्जावर येणारे वर्षाचे व्याजही फेडले जाऊ लागले. त्यामुळे सात वर्षांनंतरचे हप्तेही कमी झाले. केळीमुळे नारळाची वाढ चांगली झाली. जमीन भुसभुशीत होण्यासाठी केळीची मुळे उपयुक्त ठरत असल्याचा अजय यांचा अनुभव आहे.
उत्पादित केळीची ४० रुपये प्रति डझन या दराने रत्नागिरी शहरातील स्टॉल धारकांना विक्री केली. त्या माध्यमातून वर्षाला सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. अशाप्रकारे वर्षभराचे सुमारे ५० हजार रुपये व्याजापोटी बँकेत भरण्यास त्यांनी सुरुवात केली.
बागेत सिंचनाच्या पाण्याची सुविधा असल्यामुळे दोन एकरांवर वांगी, भेंडी, मिरची आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीला सुरुवात केली. तीन महिन्यांत वांग्याचे उत्पादन सुरू झाले. दिवसाला ५ किलोप्रमाणे वांगी बाजारात विक्रीसाठी जाऊ लागली. त्यास किमान ६० रुपये प्रति किलो इतका दर मिळत होता.
भेंडीचे उत्पादन तुलनेने कमी होते. पण मिरचीचे दिवसाला तीन ते चार किलोपर्यंत उत्पादन मिळत होते. भाजीपाला विक्रीमधून वर्षाला सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न हाती येऊ लागले. केळीचे उत्पादन सुरुवातीचे तीन वर्षे घेतले, पण भाजीपाला उत्पादन अजूनही सुरू असल्याचे तेंडुलकर सांगतात.
आंबा, नारळ, सुपारीतून मोठी उलाढाल
सुरुवातीला लावलेल्या २५० हापूसच्या कलमांपासून पाच वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. साधारणपणे वर्षाला ७०० पेटी आंबा उत्पादन मिळते. उत्पादित हापूसची मुंबई, पुण्यासह कोल्हापूर येथे विक्री केली जाते. हंगामात सरासरी १२०० रुपये दर मिळतो.
याच बागेतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मदतीने अन्य ठिकाणी जागा खरेदी करत त्यांनी हापूस लागवड केली आहे. २०१० मध्ये कातळावर सुमारे १ हजार हापूस कलमांची घन पद्धतीने लागवड केली. सध्या त्यांच्याकडे हापूसची सुमारे २२०० कलमे आहेत. त्यातून दरवर्षी सुमारे २ हजार पेटी हापूस आंबा उत्पादन मिळते. याशिवाय नारळाची देखील सुमारे ८०० झाडे असून त्यातील ४०० झाडांपासून उत्पादन मिळते आहे.
उत्पादित नारळांची विक्री करण्यापेक्षा शहाळे विक्रीवर त्यांचा भर असतो. एका शहाळ्याला २५ रुपये दर मिळतो. तसेच त्यांनी सुपारीची ४५० झाडे लावली आहेत. त्यातून १५० किलो सुपारी उत्पादन मिळते. प्रतिकिलो ४०० रुपये दराने सुपारी विक्री होते. बागेतील विविध कामांसाठी त्यांनी कायमस्वरूपी ७ मजूर ठेवले आहेत. मजुरांना सुरुवातीला १५० रुपये रोज होता. आता ३५० रुपये दिले जातात. तर आंबा हंगामात २५ कामगार लागतात.
सर्व फळबागेतील देखभाल खर्च, खत व्यवस्थापन, फवारणी, मजूर व्यवस्थापन यावरील एकूण खर्च वजा जाता साधारणपणे दरवर्षी १० लाखांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे अजय यांनी सांगितले.
शासकीय योजनांचा पुरेपूर वापर
बागेला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. सुमारे २३ एकरांसाठी साडेतीन लाख रुपये खर्च करत ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या योजनेतून साडेबत्तीस हजारांचे अनुदान मिळाले. प्रत्येक झाडाला किमान अर्धा तास पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय अनुदानावर पॉवर स्प्रे, ग्रासकटर, वूडकटर हे शेतीपयोगी साहित्य देखील त्यांनी घेतले आहे. बाळासाहेब फुंडकर योजनेतून १०० टक्के अनुदानावर तर मनरेगामधून २ हेक्टरवर आंबा लागवड केली. तसेच एका योजनेमधून २ लाखांचे अनुदान घेत पॅकहाउसची उभारणी केली आहे. शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेतल्यामुळे खर्चात मोठी बचत झाली असल्याचे अजय तेंडुलकर सांगतात.
वीजबिल बचतीसाठी सौरपंप
कातळावरील जमिनीत बागायती विकसित करताना पाण्याचा प्रश्न आ वासून होता. शिवाय भारनियमनाची समस्याही होतीच. त्यावर मार्ग काढण्यासाठी २०१६ मध्ये महावितरणचे अधिकारी प्रभाकर पेटकर आणि कृषी अधिकारी श्री. नडगिर यांच्या मार्गदर्शनाखाली सौरपंप तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये गुंतवणूक आवश्यक होती.
अटल सौर पंप योजनेच्या मदतीमुळे साडेबावीस हजार रुपयांत बागेत सौर पॅनेल बसवून घेतले. बागेत सौरपंप बसविणारे अजय हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले शेतकरी ठरले. त्यांनी एकूण ४ युनिट्स बसविली असून, दिवसाला ३ किलोवॉट विजेची निर्मिती होते. सिंचनासाठी ३ एचपी क्षमतेचे दोन कृषिपंप विहिरीवर बसविण्यात आले आहेत.
महावितरणची वीज घेतली असती तर महिन्याला ४० हजार रुपये वीजबिल आले असते. मात्र गेली आठ वर्षे सौरपंपाच्या माध्यमातून बागेला सिंचन केल्यामुळे वीजबिलावर होणारी सुमारे तीस लाखांहून अधिक रुपयांची बचत झाली आहे.
तेंडुलकर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
आंबा, काजू, नारळ ही प्रमुख पिके.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून माहिती घेत इस्राईल पद्धतीने सुमारे १ हजार हापूस कलमांची लागवड.
एकात्मिक पीक संरक्षणावर भर.
फळमाशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर. बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्माचा वापर.
सौरपंप योजनेच्या माध्यमातून शेतीमध्ये सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे बारमाही नियोजन.
आंबा पुनरुज्जीवन योजनेचा लाभ व तांत्रिक माहिती घेऊन स्वतः अवलंब करीत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
आंबा फळांची मुंबई, पुण्यासह विविध राज्यातील ग्राहकांना घरपोच विक्री.
शेतीशाळा तसेच विद्यापीठ प्रशिक्षणामध्ये सहभाग.
चारसूत्री पद्धतीने भातशेती.
दैनिक ‘ॲग्रोवन’, ‘सकाळ’ या वृत्तपत्रांमधील माहितीचा शेतीमध्ये पुरेपूर वापर.
गांडूळ खत, सेंद्रिय खत, जिवामृत, निंबोळी अर्क, बायोकम्पोस्ट इत्यादी सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती आणि वापरावर भर.
दर्जेदार हापूस उत्पादनावर भर
हापूसचा दर्जा टिकवण्यासाठी झाडे सशक्त ठेवण्यावर अजय यांचा विशेष भर असतो. त्यासाठी लेंडीखत, शेणखत यांचा वापर अधिक केला जातो. साधारण १५ किलो खत प्रत्येक झाडाला दिले जाते. तसेच झाडाचे आकारमान आणि वय यांचा अंदाज घेऊन रासायनिक खतांच्या मात्रादेखील दिल्या जातात. त्यामुळे झाडे सशक्त होण्यास मदत झाली. आंबा तयार झाल्यावर काढणी करतानाही विशेष काळजी घेतली जाते.
आंबा काढणी करताना मोठा देठ, फळाला चीक लागणार नाही, काढणी केलेल्या आंब्याला उन्हाचा कडाका लागणार नाही इत्यादी काळजी घेतली जाते. आंबा काढणीसाठी झेल्याचा वापर केला जातो. झेल्यामधून एका वेळी दोनच आंबे काढले जातात. आंबा काढणी पूर्ण झाल्यावर प्रतवारी करून पेटीमध्ये आंबे भरले जातात. उत्पादित दर्जेदार आंब्याची मुंबई, पुणे, कोल्हापूर बाजारपेठेमध्ये विक्री होते. शिवाय ग्राहकांना मागणीनुसार घरपोच विक्रीदेखील केली जाते.
शेती, बागायतीमधून उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन निर्माण होऊ शकते. परंतु त्यासाठी जिद्द, मेहनत अत्यंत आवश्यक आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेतला तर निश्चितच शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. मी गेल्या दोन दशकांमध्ये बागायतीमधून उत्पन्न घेत लागवडीखालील क्षेत्र वाढविले आहे. शेतीमध्ये सातत्याने विविध प्रयोग करत आहे.अजय तेंडुलकर, ९७६७५६८६९३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.