Success Story : दुष्काळाशी लढत साधली प्रगती

Article by Suryakant Netke : दगडवाडी, भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धती बदलून प्रमुख डाळिंब व अन्य बागांचे ‘कल्चर’ विकसित केले.
Orchard
OrchardAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके

नगर जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी दरडवाडी, भोसे ही गावे आहेत. दगडवाडीची अडीच हजारांपर्यंत, तर भोसेची लोकसंख्या तीन हजारांपर्यंत आहे.

देशभरात समाजप्रबोधन करणारे राष्ट्रसंत तनपुरे महाराज यांचे दगडवाडी हे जन्मगाव. गावशिवारात तलाव, नदीवरील जुने बंधारे वगळता पाणीसाठवण सुविधा नाही. कोणत्याही धरणाच्या पाण्याचा लाभ नाही.

फळबाग लागवडीचा प्रारंभ

पावसावर येणारी ज्वारी, बाजरी, हुलगे, मटकी यांसारखी भुसार पिके पूर्वी इथले शेतकरी घेत. पाण्याची कायम टंचाई असलेल्या या परिसरात फळपिकांमधून बदल घडवण्यासाठी तीस वर्षांपूर्वी दगडवाडी येथील बापूराव काळे गुरुजी, महादेव शिंदे, आसाराम शिंदे आदी अभ्यासू शेतकरी पुढे आले. त्यांनी डाळिंबातून गावात फळबाग लागवडीचे ‘कल्चर’ तयार केले.

हळूहळू यश मिळू लागले. मग अन्य शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेत अनुकरण करण्यास सुरुवात केली. आज दगडवाडीचे पेरणीलायक क्षेत्र ६४० हेक्टर असून, शिवारात २५० हेक्टर फळबागा आहेत. भोसे गावचे पेरणीलायक क्षेत्र ५४० हेक्टर असून पैकी २३० हेक्टरवर फळबागा आहे. दोन्ही गावांचा मिळून विचार केल्यास फळबांगाखालील क्षेत्र साडेचारशे हेक्टरवर पोहोचले आहे.

यात अडीचशे हेक्टर डाळिंब, दीडशे हेक्टर संत्रा व ५० हेक्टर अन्य सीताफळ, मोसंबी आदी बागा आहेत. वन्यजीवांचा सातत्याने उपद्रव असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात राखणीसाठी मचाण उभारले आहे.

Orchard
Mango Orchard Management : निर्यातयोग्य केसर आंबा उत्पादनासाठी करावयाची कामे

शेततळ्यांची उभारणी

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभागाने शेततळे योजना आणली. वीस वर्षांपूर्वी बापूराव काळे गुरुजी यांच्याकडे गावातील पहिले शेततळे उभे राहिले. आजमितीला दगडवाडीत ६०, भोसे येथे ४६, शेजारील वैजू बाभूळगाव, करंजी आदी भागांत पन्नासच्या वर शेततळी झाली आहेत. तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, मंडळ कृषी अधिकारी संकेत कराळे, कृषी सहायक सचिन आव्हाड यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभते.

संघर्षातून जगविल्या बागा

उन्हाळ्यात चार- पाच महिने मात्र फळबागा टिकविण्याचा संघर्ष सुरू असतो. अर्थात, दगडवाडी, भोसे येथील शेतकरी वर्षानुवर्षे संघर्ष करीत संकटांवर मात करीत आहेत. दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या वर्षी टॅंकरच्या पाण्यावर फळबागा जगवण्याची कसरत इथले ग्रामस्थ करतात.

काळानुसार लागवड तंत्रज्ञानात बदल करत आहेत. पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून मृग व आंबे बहराचे नियोजन केले जाते. रासायनिक खतांपेक्षा शेणखत, जिवामृत, सेंद्रिय स्लरी आदींचा वापर वाढवला आहे. त्यातून फळांचा दर्जा वाढून दर चांगला मिळत असल्याचा अनुभव प्रगतिशील शेतकरी डॉ. शशिकांत शिंदे सांगतात.

Orchard
Orchard Plantation : मोहोळमध्ये शेततळ्यामुळे फळबाग क्षेत्रात वाढ

जुन्या- जाणत्या शेतकऱ्यांचे अनुभव दगडवाडीचे तुकाराम शिंदे गावातील सुरुवातीच्या डाळिंब उत्पादकांपैकी एक जाणते, अनुभवी शेतकरी आहेत. वीस वर्षांपासून त्यांनी डाळिंब बागेची प्रयत्नपूर्वक जोपासना केली आहे. टॅंकरचे पाणी घेऊन बाग जगवावी लागली आहे. आम्हाला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळाल्याचे ते सांगतात. जुन्या बागांमधून एकरी १० टनांच्या पुढे त्यांना उत्पादन मिळते.

किलोला ६० ते ७० रुपये दर मिळतो, पुणे बाजारपेठेत ते भगवा वाणाचे डाळिंब पाठवतात. यापूर्वी त्यांनी दोन ते अडीच एकरांतून २० लाखांच्या पुढे उत्पादन घेत आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे.

तुकाराम यांचे चिरंजीव बाळासाहेब सांगतात, की याच डाळिंब शेतीतील उत्पन्नातून शेततळे घेतले. विहीर घेतली. नगर येथे घर घेता आले. तीनही मुलांना उच्च शिक्षण देता आले. मुलगी व मुलगा इंजिनिअर असून, ते नोकरीस लागले आहेत. तिसरा मुलगा बी फार्मच्या अंतिम वर्षाला आहे.

वाहतुकीसाठी एक ट्रक घेतला आहे. शिंदे यांच्या प्रमाणेच गावातील अन्य डाळिंब बागायतदारांनी आर्थिक प्रगती साधली आहे. स्थानिक पातळीवरील तसेच बाहेरील व्यापारी गावात येऊन डाळिंबाची खरेदी करतात. मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणीही ‘मार्केट’ आहे. दोन्ही गावांत मिळून फळपिकांच्या माध्यमातून दरवर्षी काही कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होते.

तुकाराम शिंदे ९४०३८८७४५० (डाळिंब उत्पादक, दगडवाडी)

फळबागांच्या माध्यमातून गावाचे नाव झाले आहे. गावशिवारात जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, करंजी घाट परिसरात जलसंधारणाची कामे झाली. वन विभाग तसेच ग्रामपंचायतीच्या जागांवर वृक्ष लागवड झाली. गावांतर्गत रस्ते, ग्रामदैवतांच्या मंदिराचा विकास अशी कामे लोकसहभागातून झाली. सन १९७२ च्या दुष्काळात खोदलेल्या विहिरीतून दगडवाडी गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.
उषा सुभाष शिंदे ९५४५७२२१२१ (सरपंच, दगडवाडी) विलास टेमकर ९४२०२१७७९९ (सरपंच, भोसे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com