
Sangli News : ‘‘क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नसता, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते व आमच्यासारखे लोक आज मंत्रिमंडळात बसले नसते,’’ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार (ता. १६) वाळवा येथे पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती सभेत केले.
हुतात्मा उद्योगसमूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविकात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा जीवनपट उलगडला. हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी नागनाथअण्णांचे कार्य असेच पुढे सुरू ठेवू, असे सांगितले.
मंत्री आठवले म्हणाले, ‘‘क्रांतिवीर नागनाथअण्णा नेहमीच दीन-दलित, सामान्य लोकांच्या पाठीशी राहिले. त्यांनी पॅंथर चळवळीकरिता उल्लेखनीय योगदान दिले. मला अण्णांचा सहवास वारंवार मिळाला. त्यांच्या विरुद्ध विचारसरणीच्या पक्षात असताना सुद्धा निवडणूक काळात ते माझा प्रचार करण्यासाठी येत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अण्णा थांबले नाहीत. गोरगरीब जनता, शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या नावे शाळा, साखर कारखान्याची स्थापना केली. कोणतेही पद न घेता ते काम करत राहिले. अण्णांनी दलित नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
’’ राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ग्रामीण शैलीत नागनाथअण्णांचा इतिहास समोर आणला. ‘‘नागनाथअण्णांचे सांगली जिल्ह्यासह मराठवाड्यातील, देशातील दीन-दलित जनतेवर प्रेम होते. त्यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करावेत. उसाऐवजी बांबू शेती करा,’’ असा सल्लाही त्यांनी दिला.
चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी म्हणाले, ‘‘क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे व्यासपीठ म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. अण्णांचे कुटुंबीय त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत.
स्वातंत्र्य काळातील अण्णांचे किस्से, प्रसंग ऐकल्यावर अंगावर शहारे येतात.’’ बी. के. नायकवडी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, आर. एस. चोपडे, शिवाजीराव काळुंगे, संदेश कांबळे, केदार नायकवडी, वीरधवल नायकवडी उपस्थित होते.
स्मारकासाठी पन्नास लाख
डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकासाठी रामदास आठवले यांनी खासदार निधीतून पन्नास लाख रुपये जाहीर केले. आणखी आवश्यक पाच कोटी रुपये निधीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.