Desi Cow
Desi Cow Agrowon
यशोगाथा

Desi Cow Conservation : निष्णात वैद्यकाचे वनशेती आणि देशी गोवंश संवर्धनाचे प्रयोग

 गोपाल हागे

अकोला येथील डॉ. जयंत देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे काम केले. त्यांनी शेतीच्या आवडीतून ३० एकर माळरान खरेदी करून वनशेती वसविली. आज विविध ७० प्रकारच्या सुमारे सहा हजार झाडांची लागवड करून माळरानाचे नंदनवन केले आहे.

जयंत यांच्या पत्नी या देखील प्रसूतिशास्त्र शाखेतील डॉक्टर आहेत. दांपत्याला डॉ. अजित व डॉ. अभय ही दोन मुले असून, ती अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना डॉ. जयंत यांचा शेतीकडेही ओढा होता. मात्र रोजच्या व्यस्त जीवनातून त्याकडे पुरेसा वेळ देता येत नव्हता.

डॉक्टर झाले शेतकरी

अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर वयोमानानुसार डॉ. जयंत यांनी शेतीची (Agriculture) आवड पूर्ण करण्याचे ठरविले. आज ते पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत. शहरापासून शेती जवळ असावी या हेतूने दूरदृष्टीने १४ किलोमीटरवर वाशींबा शिवारात ३० एकर जमीन खरेदी केली.

हे सगळे माळरान होते. तेथे नंदनवन फुलवण्याच्या इराद्याने वनशेती (Forestry) विकसित करण्यास सुरुवात केली. सन १९९४ ते १९९८ दरम्यान साग, अंजन, मोह, चिंच, जांभूळ, खिरणी, वड, पिंपळ, आंबा (Mango), चंदन, हनुमान फळ अशा वृक्षांची लागवड (Tree Plantation) केली.

आज सुमारे ७० प्रकारच्या वनस्पती व सहा हजारांपर्यंत झाडांची संपदा तयार केली आहे. काही झाडे उत्पादन देऊ लागली आहेत. डॉक्टरांचे आजोबा कृष्णराव देशमुख मूंडगावचे मूळ रहिवासी होते. तेथे पाचशेपर्यंत गावरान जातींची आमराई (Mango Orchard) होती.

गुलाब, दरबार, रसराज, केळ्या अशा गोड, स्वादिष्ट जाती होत्या. त्या नामशेष होत आहेत. डॉक्टरांनी त्यातील काहींची वाशिंबा येथील शेतात लागवड व संवर्धन सुरू केले आहे.

देशी गोवंश संवर्धन

वनशेतीबरोबर देशमुख यांनी देशी गोवंश संवर्धनही तितक्याच आवडीने सुरू केले आहे. स्थानिक वातावरणाशी समरस होणाऱ्या, दूध उत्पादन, शेती व पैदाशीसाठी उपयुक्त गोऱ्हे अशा प्रजातींची निवड केली.

यासाठी गीर आणि प्रामुख्याने देवणी गायीला प्राधान्य दिले. उत्तम वंशावळ असणाऱ्या देवणी गायी उदगीर, आंध्र प्रदेश, देवणी गाव, कर्नाटक आदी भागातून आणल्या. प्रत्येक गायीसाठी सुमारे ३५ हजार रुपये खर्च केला.

आहार, पाणी, लसीकरण, औषधे या बाबी सांभाळताना शास्त्रीय पद्धतीने संगोपन सुरू केले. गोठ्यात जातिवंत गोवंश तयार व्हावा असा प्रयत्न असतो. त्यासाठी कसदार वळू आहे. पुणे येथील बायफ संस्थेतून सिद्ध देवणी वळूच्या वीर्यकांड्या आणल्या आहेत.

गोठ्यात २५ पर्यंत या प्रजातींची पैदास झाली. पशुधन विक्रीतून साडेचार लाखांपर्यंत उत्पन्न मिळवले. पारड्यांचे संगोपन करून पुढील वंशावळ निर्माण केली जाते. सध्या १७ गीर व जवळपास तेवढ्याच देवणी गायी आहेत.

दूध उपलब्धता व बायोगॅस

वर्षाला एक वासरू ही संकल्पना रुजविली. त्यामुळे प्रति वर्षी एक वेत मिळाले. गायीच्या दोन आचळांमधूनच दूध घ्यायचे, उर्वरित आचळातील दुधाचा लाभ वासरांना द्यायचा हा शिरस्ता ठेवला.

देवणीचे दिवसाला सहा लिटरपर्यंत तर गीरचे नऊ लिटरपर्यंत दूध मिळते. अकोला येथील ग्राहकांना दुधाचा पुरवठा काही काळ करण्यात आला. सध्या घरी वापर होतो.

उर्वरित दुधापासून तूप तयार करून त्याची काही मंदिरांना १८०० ते दोन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होते. गायींच्या शेणावर आधारित बायोगॅस यंत्रणा उभारली आहे. दोन मजूर कुटुंबांकडे घरी स्वयंपाकासाठी या इंधनाचा वापर होतो. स्लरीचा वापर शेतीसाठी होतो.

अंजन, मोहफुलांचे खाद्य

जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा मिळणे कठीण असते. हे ओळखून अंजन झाडांची लागवड केली आहे. त्याची दोन हजारांपर्यंत झाडे आहेत. त्याचा पाला उन्हाळ्यात हिरवा चारा म्हणून उपयोगास येतो.

अडीच हेक्टरवर मोहाची झाडे आहेत. त्याची फुले जमिनीवर पडतात. अशावेळी गायींना या झाडांच्या बनात सोडले जाते. मोहफुलांमध्ये पौष्टिक गुणधर्म असून गायी ती चवीने खातात. काही क्षेत्रावर डीएचएन- ६ या गवताचे ठोंब लावले आहेत.

मुक्त संचार पद्धतीने जनावरे वावरतात. दिवसभर चरतात. शेताला तारेचे कुंपण लावले आहे. पूर्वी पशुपालनाचीही आवड जपल्याने शेळ्या- मेंढ्यांचे पालन करून आर्थिक उत्पन्नही मिळवले.

बऱ्याच प्रक्षेत्रांना भेटी देऊन डॉक्टर मार्गदर्शन घेत असतात. त्यांना ‘माफसू’ विद्यापीठ अंतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील सहायक प्राध्यापक डॉ. एम. व्ही. इंगवले यांचे मार्गदर्शन मिळते. विठ्ठल मुळे हे येथे व्यवस्‍थापक आहेत.

डॉ. जयंत देशमुख- ९८९००१२३३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT