Sachin Thube and Family Agrowon
यशोगाथा

Agriculture Success Story : जगण्याचे जणू बळ मिळाले....

Team Agrowon

सचिन ठुबे

कुटुंबाची शेती जेमतेम, त्यामुळे आयुष्यातील अपेक्षाही जेमतेमच. पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षणानंतर पत्रकारिता सुरू केली. नऊ वर्षांनंतर पत्रकारिता सोडून शेतीत रमलो. याचे मुख्य कारण म्हणजे नियमित शेतीविषयक वाचन. यातील यशकथा मला शेतीतील प्रयोग करण्यासाठी खुणावत होत्या. २०२० मध्ये ग्रीनअप शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. मात्र आजारपणामुळे आर्थिक अडचणीत आलो होतो; पण शेतीमधील प्रयोगांनी माझ्या जगण्याला बळ मिळाले.

राहुरी- शनिशिंगणापूर रस्त्यावरील ब्राह्मणी (ता. राहुरी, जि. नगर) हे माझे गाव. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात असल्याने इतरांच्या तुलनेत आमच्या भागात पाणी उपलब्धता बऱ्यापैकी. वडिलोपार्जित साडेतीन एकर शेतीमध्ये सोयाबीन, मका, गहू, ऊस लागवड असायची. दहावीपर्यंत गावातच शिकल्यानंतर अकरावीला एमसीव्हीसीअंतर्गत उद्यानशास्र विषयाला प्रवेश घेतला.

बारावीनंतर नगरला पदवीचे शिक्षण घेतले. पोरांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि शहरात नोकरी करावी ही वाडवडिलांची अपेक्षा असते. माझ्याबाबतीच तसेच झाले. पण २००३ मध्ये दुष्काळ पडला. शेती क्षेत्र प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे भविष्याचा विचार करून एवढ्यावरच थांबवून चालणार नाही, पुढे शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवावी, असा निर्णय घेऊन मी नगर येथे मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. ‘ग्रामीण व कृषी पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर लघुप्रबंध लिहिला.

२००६-०७ मध्ये माझी पत्रकारिता सुरू झाली, माझ्यावर कृषिविषयक लेखनाची जबाबदारी होती. अन्य दैनिकात काम करत असलो, तरी मी ‘ॲग्रोवन’चा नियमित वाचक असल्याने मला वैयक्तिक लेखन आणि पुढच्या नियोजनासाठी दिशा मिळाली. मुंबईत बातमीदारी करत असतानाचा एक प्रसंग मी अनुभवला,

की राज्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याने ‘ॲग्रोवन’मधून सरकारवर ताशेरे ओढण्यात आले होते. बातमी आल्यानंतर कृषी व पशुसंवर्धन विभागात त्या दिवशी दिवसभर प्रचंड धावपळ सुरू होती. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी चारा छावणी सुरू करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले.

शेती प्रयोगांना सुरुवात...

पत्रकारिता करत असताना मी शेतीबाबत अस्वस्थ होतो. शेती करत असलो तरी पुरेसा वेळ मिळत नव्हता, त्यामुळे मी नोव्हेंबर २०१४ मध्ये पत्रकारिता सोडून पूर्णपणे शेतीला वाहून घेतले. केवळ साडेतीन एकर शेती असली, तरी त्यामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून शेती यशस्वी करायची असा निर्णय घेतला. त्यासाठी शेतकऱ्यांच्या यशकथा मार्गदर्शक ठरल्या.

भविष्यातील गरज म्हणून पहिल्यापासूनच मी अनेक यशकथांचे अंक जपून ठेवले होते. जानेवारी २०१५ मध्ये शंभर टक्के सेंद्रिय टरबुजाचे पीक घेण्याचे ठरवले. पाणीटंचाई, पीक संरक्षण आणि नवखा प्रयोग, अशी अनेक संकटे होती.

पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तो प्रयोग माझ्या शाश्‍वत विकासाचा मार्ग ठरला. माझ्या शंभर टक्के सेंद्रिय कलिंगडाच्या प्रयोगाची नगर जिल्ह्यात चर्चा झाली. तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडून गौरव झाला.

पण त्याच वेळी कलिंगडाचे भाव कोसळले. अशावेळी काढणीला आलेली फळे एक तर विकणे किंवा साठवणे हाच पर्याय होता. दर पडल्याने मी काढणीनंतर फळे साठविण्यासाठी राहत्या घरात घरगुती शीतगृह तयार केले.

खोलीत प्रकाश येऊ नये यासाठी थर्माकोल आणि ब्लँक पेपर वापरून दरवाजा, खिडक्या बंद केल्या. खोलीतील आर्द्रता टिकून राहावी, म्हणून कुलरच्या माध्यमातून १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान नियंत्रित ठेवले. परिणामी, कलिंगडे २५ दिवस साठवणे शक्य झाले.

दर वाढल्यावर फळांची विक्री करत आर्थिक नुकसान टाळले. माझ्या या प्रयोगाचे कृषी विभागाने कौतुक केले. २२ मे २०१५ रोजी माझ्या ‘ॲग्रोवन’मध्ये प्रयोगाची यशकथा प्रकाशित झाली. नगर जिल्ह्यातील प्रयोगशील तरुण शेतकरी म्हणून माझी ओळख झाली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्रज्ञांचा तिहेरी आंतरपिकाबद्दल लेख आला होता. मी सोयाबीन, तूर आणि मका असा तिहेरी आंतरपिकाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला.

२०१६ मध्ये उसाला फवारणीद्वारे खते देण्याचा परिसरात पहिला प्रयोग मी यशस्वी केला. त्याचा परिणाम म्हणून उसाच्या तिसऱ्या खोडव्याचे (चौथे पीक) एकरी तब्बल ५१ टन उत्पादन मिळाले. उसात आंतरपीक करत जोडओळ आणि पट्टा पद्धतीने कांदा बीजोत्पादन केले. त्यातून उसाच्या उत्पन्नापेक्षा जास्त कांदा बियाण्याचा नफा अधिक मिळाला. उसामध्ये ३० गुंठे क्षेत्रांवर आंतरपीक पद्धतीने भाजीपाला लागवड केली.

या भाजीपाल्याची आई नलिनी हिने हात विक्री करत अधिक नफा मिळविण्यास मदत केली. २०१७ मध्ये एक एकरात हरभऱ्याची सरी पद्धतीने लागवड केली. त्या संपूर्ण क्षेत्रात कोथिंबिरीचे आंतरपीक घेतले. कोथिंबिरीच्या एका जुडीस २२ ते ३५ रुपये दर मिळाला.

ऐन उन्हाळ्यात ४४ हजार रुपयांची कोथिंबीर विक्री झाली. सात क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न मिळाले. २०१९ मध्ये दीड एकरात मूग, तूर आणि ऊस असा तिहेरी आंतरपिकाचा यशस्वी प्रयोग केला. एकूणच सुधारित तंत्राने शेती केल्याने आत्मविश्‍वास वाढला.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT