Agriculture Success Story : जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे शेवगाव तालुक्यातील भावी निमगाव, शहरटाकळी, दहिगावने, सुलतानपूर आदी परिसरांत बऱ्यापैकी पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा भर उसासह नगदी पिके घेण्यावर असतो. भावीनिमगाव येथील अंबादास, शंकर व त्रिंबक या जाधव भावंडांच्या एकत्रित कुटुंबाच्या वाट्याला केवळ एक एकर वडिलोपार्जित शेती आली होती.
त्यातील शंकर हे आरोग्य विभागात नोकरी करत होते. ३२ वर्षांच्या सेवेनंतर २०१६ मध्ये म्हणजे आठ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. पूर्वी एकत्रित कुटुंबात असतानाच सर्व कुटुंबाच्या कष्टातून, शेती आणि नोकरीमधून मिळणाऱ्या पैशाच्या मदतीने ३६ एकर शेती घेतली. त्यातील त्यांच्या हिश्शाला १२ एकर शेती आली. नोकरीत असतानाही शंकर जाधव शेतीत वेगवेगळे पीक घेत प्रयोग करत होते.
जाधव कुटुंबाकडे १९८५ पासून ऊसपीक असले तरी विविध नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांमुळे त्यातून अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे उसासोबतच आले, तूर, कांदा अशा अन्य पिके घेत जोखीम कमी केली. गेल्या पाच वर्षांपासून कांदा बीजोत्पादन, कांदा रोपवाटिकाही करतात. यंदाही अर्ध्या एकरावर बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे. शंकर जाधव यांना पत्नी शिलाबाई, आरोग्य सहायक असलेला मुलगा अरुण, सून आश्विनी यांचीही शेतीत मदत होते. शिक्षण घेत असलेल्या नातू अनिकेत व अनुजा या नातवंडानाही शेतीची आवड आहे.
उसाचा निडवाही केला यशस्वी
पूर्वी नोकरीमध्ये असताना शेताकडे पूर्ण वेळ लक्ष देणे शक्य नव्हते. पण सेवानिवृत्तीनंतर शंकर जाधव यांनी पूर्णतः शेतीत झोकून दिले आहे. ऊस शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगातून आणि व्यवस्थापनातून उत्पादनात वाढ मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अलीकडच्या काळात त्यांनी ऊस लागवड पद्धतीत बदल केला आहे. पूर्वीच्या अडीच फुट सरीवरील लागवडीमध्ये बदल केले. तीन वर्षांपूर्वी साडेचार फुटी दोन सरीवर व दोन ऊस रोपातील दीड फुटांचे अंतर ठेवून लागवड केली होती. यंदा दोन एकर ऊस आहे.
लागवडीआधी एकरी डीएपी व युरिया प्रत्येकी शंभर किलोची मात्रा दिली. लागवडीनंतर ऊसपीक एक महिन्याचे झाल्यावर खोडकिडीचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधारण पंधरा दिवसाच्या अंतराने शिफारशीनुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी, तसेच वसंतदादा इन्स्टिट्यूटद्वारे विकसित ‘वसंत ऊर्जा’ या जैविक खताचा वापर ऊस पिकाच्या दोन ते चार महिन्यांच्या काळात फवारणीद्वारे केला.
पंधरा दिवसांतून एकदा ठिबकमधून २०० लिटर जिवामृत, स्लरी देतात. याशिवाय गरजेनुसार जैविक विद्राव्य खतांचा वापर करत असल्यामुळे रासायनिक खतांचा वापर केवळ २० टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे.
ऊस तोडणीनंतर बुडख्याची छाटणी करून त्यावर कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी केली.
दहा वर्षांपासून उसातील पाचट न जाळता शेतातच कुट्टी करून पसरतात. त्यामुळे सेंद्रिय खत तयार होते. ऊस चार महिन्यांचा झाल्यानंतर सरकी पेंड, शेंगदाणा पेंड यापासून तयार केलेली स्लरीही पंधरा एकदा दिवसात आलटून पालटून दिली. शेंगदाणा पेंडीमुळे एनपीके व सरकी पेंडीच्या स्लरीमुळे पोटॅश मिळते. सातत्याने स्लरी व जैविक खताच्या वापरामुळे मातीचा सेंद्रिय कर्ब ०.५ टक्क्यावरून वाढून १.५ टक्क्यावर पोहोचल्याचे माती तपासणीत आढळले आहे.
त्यांच्या बारा महिन्यांच्या उसाची वाढ ३६ कांड्यांपर्यत होते. पहिल्या वर्षी ६५ टन, खोडव्याचे ६० टन ऊस उत्पादन घेतले आहे. यंदा निडव्याचा (तिसरे पीक) ऊस १० महिन्यांचा व २८ कांड्यांवर असल्याने त्याचे ६० टनांपर्यंत उत्पादन मिळण्याचा विश्वास जाधव यांना आहे.
पाणी उपलब्धता भरपूर असली तरी अडचणीच्या काळात टंचाई होऊन नुकसान होऊ नये म्हणून शेततलाव केला आहे.
तीन वर्षांपूर्वी अडीच एकरावर डाळिंबाची लागवड केली असून यंदा बहर धरला आहे.
कांदा रोपवाटिका, बीजोत्पादनावर भर
शंकर जाधव पाच वर्षापासून कांदा बीजोत्पादन घेतात. या वर्षी त्यांनी सव्वा एकरावर कांद्याची लागवड केली आहे. वाफे लागवड पद्धत, वापर, स्लरी, जैविक खताच्या वापरातून ते कांद्याची ते एकरी १४ ते १५ टनांपर्यंत उत्पादन घेतात. कांदा बीजोत्पादनासाठी चाळीतील उत्तम प्रतीचा, आकर्षक रंगाचा, गोलाई चांगली असलेल्या कांद्याची निवडून लागवड करतात.
यंदा अर्ध्या एकरावर कांदा बीजोत्पादनासाठी गोटाची लागवड केली आहे. एकरी चारशे किलोपर्यंत बियाणे निघते.
एक हजार ते बाराशे प्रति किलो प्रमाणे शेतकऱ्यांना विकले जाते. जाधव कुटुंबीय साधारण दीड ते दोन एकरावर कांदा रोपवाटिका करून दरवर्षी रोप विक्री करतात. सहा हजार रुपये वाफ्याप्रमाणे रोपांची विक्री होते. लागवडीसाठी एकरी साधारण तीन वाफे रोप पुरेसे होते.
यंदा पहिल्यांदा दोन एकरांवर तूर लागवड केली आहे. या भागातील शेतकरी साधारणपणे दोन ओळीत चार फूट आंतर ठेवून तूर लागवड करतात. जाधव यांनी पहिल्यांदा लागवड करतानाच इतर शेतकऱ्यांपेक्षा स्वतः तूर लागवडीत बदल केला आहे. बेडवर सहा फुटांचे दोन ओळींत अंतर ठेवून दीड फुटावर ‘१३४१ गोदावरी’ या सुधारित वाणाची लागवड केली. त्यांच्याकडील तेरा एकर क्षेत्रात केवळ एकच प्रकारचे पीक न घेता विविध प्रकारची पिके, रोपवाटिका यातून जोखीम कमी करण्यात जाधव यांना यश आले आहे.
आले लागवड
भावी निमगाव परिसरात मोजकेच शेतकरी अद्रक (आले) पीक घेत. त्यातही जाधव कुटुंबीय तीस वर्षांपासून आले पीक घेत आहेत. पूर्वी अडीच फुटांवर सरीत आले लागवडीतून एकरी ७ ते आठ टन उत्पादन मिळते. मात्र अलीकडे त्यांनी लागवड पद्धतीत बदल करत साडेचार फुटी बेडवर दोन ठोंबांत ९ इंचांचे अंतर ठेवून फेब्रुवारी महिन्यात लागवड सुरू केली आहे. गेल्या वर्षी स्लरी, जैविक खतांच्या वापरातून एका एकरात १८ टन आले उत्पादन मिळवले. त्याला प्रति किलो १३८ रुपये दर मिळाला. श्रीरामपूर, अहिल्यानगरला विक्री करतात. गरजेनुसार व्यापारीही बांधावर येऊन खरेदी करतात. यंदा २ एकरांवर आले लागवड आहे. त्याची फेब्रुवारीत काढणी होईल.
- शंकर बिहारी जाधव, ९०२१००००९०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.