Itar Goshti Book
Itar Goshti BookAgrowon

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Marathi literature: ‘…इत्तर गोष्टी’ हा कथासंग्रह निवांतपणे अनुभवलेले, समजून घेतलेले आणि शोषून घेतलेले जगणं प्रगल्भतेने उलगडतो. नव्वदोत्तर काळातील सामाजिक, आर्थिक उलथापालथ, ग्रामीण-शहरी जीवनाचं एकमेकांत मिसळणं, भावनिक विसंगती, आणि भाषेचा लोभस ठेहराव या कथांमधून प्रत्ययास येतो.
Published on

श्रीराम कुंटे

अर्थवेचक गोष्टगुंफण

पुस्तकाचे नाव : ...इत्तर गोष्टी

लेखक : प्रसाद कुमठेकर

प्रकाशक : पपायरस प्रकाशन

पाने : १८८

किंमत : ३४० रुपये

उत्तम कलाकृती प्रत्यक्षानुभव घेऊन झाल्यावरही दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहते, पिच्छा सोडत नाही. महत्त्वाचं म्हणजे त्या कलाकृतीचा अनुभव घेतल्यावर नेमकं काय आणि किती गवसलं हे सांगणं कठीण होऊन बसतं. ‘इत्तर गोष्टी'' हा कथासंग्रह याच जातकुळीतला. या घाईघाईत पाडलेल्या कथा नसून, तब्येतीत येणारे अनुभव मुरवत लिहिल्या आहेत हे जाणवतं. या निवांतपणामुळे त्यांच्या कथांना हेमंतकुमारच्या गाण्यांसारखा लोभस ठेहराव आहे.

नव्वदोत्तर काळात आर्थिक उदारीकरणामुळे आपल्या एकांगी, स्थिर आयुष्यात कल्पनातीत बदल झाले. वेगाने बदलणारे आर्थिक, सामाजिक संदर्भ, निरर्थक कर्मकांडं, भाऊबंदकी, तरुणांची बेकारी, चंगळवाद, फिल्मी जगाचा आभासी चकचकीतपणा, जुन्या पिढीशी होणाऱ्या संघर्षातून तरुणांच्या भावविश्वाची होणारी कुतरओढ हे सगळं त्यावेळेस अर्धवट वयात असलेल्या आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं (खरंतर स्वानुभवाचं).

Itar Goshti Book
Book Review: पर्यावरणाचे अर्थपूर्ण स्त्रीवादी विश्‍लेषण

अवघड असलं तरीही आपण आपापल्या वकुबाप्रमाणे या सगळ्या बदलांची सरधोपट संगती लावली. पण या सगळ्यांची लेखकाने अनपेक्षित आणि विस्मयकारक मांडणी केलीये. ती बघून, ‘अरेच्चा! हे तर आपल्याला माहीत होतं, पण शब्दांमध्ये मांडताच आलं नाही कधी,’ अशी भावना होते. हेच ‘इत्तर कथा’चं यश आहे. या कथासंग्रहाचं आवर्जून सांगण्यासारखं एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने वापरलेली मराठवाडा-उदगीरची बोली भाषा.

या संग्रहातल्या प्रत्येक कथेवर आवर्जून लिहिण्यासारखं आहे. गँग्ज ऑफ वासेपूर मधून अनुराग कश्यप यांनी अर्धवट गाव अर्धवट शहरी लोकवस्तीतल्या नव्वदोत्तर विसंगत जीवनमानाला ज्या पद्धतीने पुढे आणलं, ते पाहता ‘इत्तर कथा’ मधल्या ‘जमवाजमव’, ‘जुते दो पैसे लो’, ‘पैलं... जे आसन ते’, ‘फळशोधन’, ‘माचो ये तो बडा टॉइंग है’ यांसारख्या काही कथांवर या सांधेबदलाचं उत्तम डॉक्युमेंटेशन होऊ शकतं.

ग्रामीण आणि शहरी जीवनाच्या सीमारेषा धूसर झाल्यावर जास्तीत जास्त शहरी होण्याच्या (किंवा वरच्या स्तरात जाण्याच्या) नादात जीवनाचा आनंद ओरबाडण्याला महत्त्व आलं. आणि हे कसं ओरबाडायचं हे वरच्या स्तराकडे बघून ठरवलं जाऊ लागलं. त्यामुळे ‘जुते दो पैसे लो’मध्ये कथेचा नायक म्हणतो, ‘मॅरेजची शिडी पाहणाऱ्याला दिसलं पाहिजे मराठवाडा के लोग पुणेमुंबईके बाप होते है.’ लग्नाआधी होणाऱ्या बायकोशी बोलायला मिळणार म्हणल्यावर नायकाच्या कानात ‘वाह वाह रामजी’ वाजलं.

Itar Goshti Book
Book Review: गावाच्या विकासाचा मूलमंत्र देणारे ‘ग्राम मंत्रालय’

आभासी आणि वास्तविक जगात किती ही एकरूपता असं आपल्याला वाटत असतानाच लेखक कथेचा शेवट असा करतो, की या सगळ्यातली निरर्थकता आपल्याला जाणवून निस्ता हॅपीनेस भरभरून वाहू लागतो. ‘पैलं.... जे आसन ते’ वाचताना मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ची आणि आपल्या पौगंडावस्थेची फार आठवण येते. ‘माचो ये तो बडा टॉइंग है’ वाचताना असाच आपल्या काळातला निव्वळ वेडेपणा, सामाजिक दडपण आठवून हसायला येतं. या कथेतली ‘ लिमिटेड डेटाच्या कालखंडात शिक्षण झालं.

त्यामुळे पेपर रीडिंगच जास्त व्हायचं.’ किंवा ‘आता मी मोठा झालोय. सख्त लौंडा या इमेजचा फोलपणा माझ्या लक्षात आलाय'' यांसारखी वाक्यं म्हणजे कमाल आहेत. ‘आडगावचे पांडे’ या कथेत काप गेले आणि भोके राहिली या म्हणीची आठवण करून देणारं कुटुंब, त्यांच्यातली विशिष्ट मर्यादेपलीकडे न जाणारी भाऊबंदकी आणि परंपरावाद यांना छेद देऊ पाहणारा तरुण यांबद्दल वाचताना गावोगावच्या अशा कुटुंबांची चित्रं डोळ्यांसमोर येतात.

‘क्ष’ची गोष्ट खरंतर कस्पटासमान गणल्या जाणाऱ्या सामान्य माणसाची. आपल्या आसपासच्या निमशहरी किंवा शहरी भागात घडणारी. कथेचं बीज असणारी घटना इतकी सामान्य, की पेपरला बातमी आली तर आपण त्या बातमीचा मथळाही पूर्णपणे वाचत नाही. अशा वेळेस या घटनेतून पार मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा इतिहास धुंडाळायचा आणि महत्त्वाचं म्हणजे कथानायकाचं सामान्यत्व मिरवायचं.

उच्च दर्जाची ताकद लागते यासाठी. या कथेतलं आणखी एक थोरपण म्हणजे ‘क्ष’ची गोष्ट सांगणारी आणि साक्ष देणारी स्त्री आहे. ‘आस्मानी, सुल्तानी हौर गाढवलाला’मधली गाढव निवेदक असण्याची कल्पकता, नायक आणि गाढव यांच्यातले अप्रतिम संवाद आणि नक्की कोणी कोणाला गोष्ट सांगितली याविषयी असणारी धूसरता या कथेला वेगळी उंची देते. ‘ह्यॅमरशिया’ या कथेतही निवेदक आहे. पण तो आत्मकथनाच्या बाजाने ही कथा मांडतो.

एका घटनेमागे असणारं कॅलिडोस्कोपिक वास्तव, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि त्यातून सत्तेच्या मागे-पुढे लोंबकळणारे तरुण, कोणत्याही दुर्दैवी घटनेचा काटशहासाठी होणारा वापर, तरुण पत्रकाराचे आदर्श आणि करकरीत वास्तव यांच्यातला संघर्ष, जागृत देवस्थानात कथेतला वाईट प्रसंग घडण्यातली विसंगती अशा अनेक गोष्टींवर ही कथा नेमकेपणाने भाष्य करते. ‘इत्तर कथा’च्या निमित्ताने प्रसाद कुमठेकर यांच्या रूपाने मराठीला एक सशक्त, ताज्या दमाचा लेखक लाभलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com