Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Survival of the Fittest: उत्क्रांती आणि डार्विनने ‘फिट असण्या’बाबत प्रत्यक्षात काय म्हटले आहे, हे मुळातून समजून घेतल्यावर कदाचित याचा अर्थ स्पष्ट होईल.
Darwin Theory
Darwin TheoryAgrowon
Published on
Updated on

Evolution Truth: ‘डार्विनने आपल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतातून प्राण्यांमध्ये सुद्धा शरीराने निरोगी, बलवान असलेलेच दीर्घकाळ टिकतात, हेच मांडले आहे...’

...आयुर्वेदाच्या अनुषंगाने ‘आरोग्य’ या विषयावर लिहलेल्या एका पुस्तकावर नजर टाकत होतो. त्यात हे एक वाक्य वाचायला मिळाले. या पुस्तकात आरोग्य विषयक व्यापक मांडणी केलेली आहे. त्या अर्थाने हे पुस्तक उत्तम आहे. म्हणूनच त्यातील हे वाक्य वाचून आश्‍चर्य वाटले. हे असे घडण्याचे कारण उत्क्रांतिबद्दल आणि एकूणच विज्ञानाच्या विविध तत्त्वांबद्दल असलेल्या आपल्या चुकीच्या धारणांमध्ये दडलेले आहे.

चुकीच्या धारणांच्या जोडीनेच या तत्त्वांचे सुलभीकरण करणे हे सुद्धा त्यामागचे एक कारण आहे. त्याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत! म्हणून तर डार्विनच्या ‘द सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या सिद्धांताबद्दल बोलताना, ‘बळी तो कान पिळी’ अर्थात ताकदवर व्यक्ती जगात टिकून राहण्यासाठी सक्षम असते... अशी उदाहरणे सहजपणे दिली जातात. ‘फिट असण्या’चा अर्थ लावताना बलदंड प्राणी किंवा पिळदार शरीर असलेल्या व्यक्ती असा लावला जातो.

उत्क्रांती आणि डार्विनने ‘फिट असण्या’बाबत प्रत्यक्षात काय म्हटले आहे, हे मुळातून समजून घेतल्यावर कदाचित याचा अर्थ स्पष्ट होईल. उत्क्रांतीचा आणि प्राण्यांच्या प्रजाती विलुप्त होण्याचा मागोवा घेताना, सर्वांनाच ज्ञात असलेली एक बाब लक्षात येते. ती म्हणजे- पृथ्वीवरून महाकाय डायनासोरसारखे विलुप्त झाले आहेत, तर झुरळासारखे जीव कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर टिकून आहेत. डायनोसॉरने एकेकाळी पृथ्वीवर राज्य केले.

Darwin Theory
Inspirational Rural Story: एक स्वप्न... गणेश आणि सपनाचं!

त्यांच्या कितीतरी प्रजाती होत्या आणि त्यांनी पृथ्वीवरचा बराचसा भाग व्यापला होता. पण ते नामशेष झाले. याचे कारण पृथ्वीवर झालेल्या बदलांशी ते जुळवून घेऊ शकले नाहीत. पण यामध्ये दोष कोणाचा? आणि डायनोसॉरनी ठरवले असले, तरी ते बदलांशी जुळवून घेऊ शकले असते का, असेही प्रश्‍न उपस्थित होतात. येथे ‘नॅचरल सिलेक्शन’ ही बाब लक्षात घ्यावी लागते. खरे तर ही बाब आणि त्याच्या संबंधित इतरही गोष्टी खूप तांत्रिक आहेत, पण त्यांचा सार समजून घेतला तर याचा उलगडा होऊ शकेल.

विविध नैसर्गिक कारणांमुळे वातावरण किंवा परिस्थितीत बदल झाल्यावर किंवा इतर जिवांशी असलेल्या स्पर्धेमध्ये जिवांच्या काही प्रजाती नष्ट होतात, पण काही प्रजाती टिकून राहतात. हे टिकून राहणे किंवा नष्ट होणे कोणताही जीव स्वत: ठरवत नाही, तर त्यांना निसर्गत: मिळालेले गुणधर्म ठरवतात. त्या अर्थाने, टिकून राहण्यासाठी कोणाची निवड करायची आणि कोणाला नामशेष करायचे हे संपूर्णत: निसर्गाकडून मिळालेल्या गुणधर्मांवर अवलंबून असते. हे गुणधर्म निसर्गाकडून मिळणे आणि त्यांच्या बळावर बदललेल्या परिस्थितीत टिकून राहणे हेच ‘नॅचरल सिलेक्शन’.

आता मुद्दा उरतो, की बदललेल्या वातावरणात किंवा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी किंवा इतर जिवांशी स्पर्धा करण्यासाठी बलदंड असणे, पिळदार शरीराचे असणे फायदेशीर ठरते का?... हे फायदेशीर आहे का तोट्याचे हे नेमकेपणाने सांगता येत नाही. काही परिस्थितीत बलदंड असणे निश्‍चितच तोट्याचे ठरू शकते. पृथ्वीच्या इतिहासात अनेकदा ज्वालामुखीचे प्रचंड उद्रेक झाले आहेत. त्यातून प्रचंड प्रमाणात राख बाहेर येऊन ती वातावरणात पसरली आहे.

याचा परिणाम म्हणून सूर्याची किरणे पुरेशा प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचू शकली नाही. परिणामी, वनस्पती आवरण कमालीचे घटले. त्याचा परिणाम म्हणून सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न (वनस्पती) निर्माण झाले नाही. अशा परिस्थितीत बलदंड शरीराचे (अर्थात, जास्त अन्नाची आवश्यकता असणारे) प्राणी जगतील की बलदंड नसलेले जगतील?... अशा प्रकारे बलदंड असणे नामशेष होण्यास कारणीभूत ठरू शकते.

Darwin Theory
Women Empowerment : आत्मविश्वास, जिद्द असल्यास सर्व काही शक्य

हे अगदीच ढोबळ उदाहरण झाले. पण विविध प्रजातींना असंख्य लहान-मोठे गुणधर्म निसर्गत: प्राप्त होत असतात. त्यात त्या प्रजातींचे काहीच कौशल्य किंवा कर्तृत्व नसते. तर हे गुणधर्म प्राप्त होणे अपघाताने घडत असते. त्यासाठी ‘म्युटेशन’ (उत्परिवर्तन), अर्थात जनुकांमध्ये होणारे बदल कारणीभूत ठरतात. असे अपघाताने होणारे बदल त्या जिवांना पृथ्वीवर टिकण्यासाठी उपयुक्त ठरतात किंवा नामशेष होण्यास भाग पाडू शकतात. यांचा आणखी एक पैलू म्हणजे, पृथ्वीवर तग धरून राहण्यासाठी जिवांच्या विविध प्रजातींची कायमच स्पर्धा असते. या स्पर्धेत असे अपघाताने आणि निसर्गत: प्राप्त झालेले गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात किंवा मारक सुद्धा.

याबाबतचा आणखी एक प्रमुख गैरसमज किंवा सुलभीकरण म्हणजे- जिराफाचे दिले जाणारे उदाहरण. शाळेत शिकताना, आमच्या पिढीमध्ये उत्क्रांतीबद्दल असाच गैरसमज होता (किंवा तो करून दिला जात होता), तो म्हणजे जिराफाची मान उंच का झाली याबाबत. त्याचे दिले जाणारे स्पष्टीकरण असे असायचे- जिराफाच्या पूर्वजांची मान घोड्यासारखीच आखूड होती. त्याने झाडाच्या उंचावरचा पाला खाण्यासाठी मान उंचावण्याचे सतत प्रयत्न केले. त्यामुळे त्याची मान उंच होत गेली. त्या वयात हे स्पष्टीकरण तर्कशुद्ध वाटत असे.

पण प्रत्यक्षात तसे काही घडत नाही, हे उशिराने म्हणजे उत्क्रांती समजून घेत असताना लक्षात आले. असे घडण्यासाठी म्हणजे एखाद्या प्राण्याच्या मानेची लांबी वाढण्यासाठी जनुकांमध्ये म्हणजेच जीन्समध्ये बदल घडून यावे लागतात. असे बदल घडणे हा अपघात असतो किंवा योगायोग असतो. इच्छाशक्ती असली म्हणून किंवा मुद्दाम प्रयत्न करून असे जनुकीय बदल घडवून आणता येत नाहीत. त्याचबरोबर, असा अपघात घडला तरी एखाद्या प्रजातीमध्ये असा बदल स्थिरावण्यासाठी कित्येक पिढ्यांचा काळ जावा लागतो.

म्हणूनच, ‘म्युटेशन’ अर्थात जनुकांमध्ये बदल होणे आणि असा बदल दिसून येणे ही बाब माणूस, कुत्रा, वाघ-सिंह, हरिण यांसारखे सस्तन प्राणी किंवा पक्ष्यांच्या प्रजाती यांच्यामध्ये खूपच दीर्घकालीन आणि वेळखाऊ असते. कारण या प्रजाती उत्क्रांतीच्या टप्प्यात उशिराने उत्क्रांत झालेल्या आहेत. शिवाय, त्यांच्या शरीराची रचना गुंतागुंतीची असते. याउलट जिवाणू, विषाणू यांसारख्या सूक्ष्म जिवांमध्ये ‘म्युटेशन’ खूपच जलद गतीने होतात. म्हणून तर ‘कोविड-१९’ यासारख्या महामारीला कारणीभूत ठरलेल्या विषाणूंचे विविध प्रकार (व्हेरिएंट) झटपट निर्माण झालेले पाहायला मिळतात.

एका प्रकारावर उपाय सापडला, तरी दुसरा नवा प्रकार नवे आव्हान निर्माण करण्यास सज्ज असतो. म्हणून तर त्यांच्याशी माणसाचा सतत झगडा सुरू असतो. हेच जिवाणूंमध्येही पाहायला मिळते. याचा संबंध त्यांच्या अतिशय जलद गतीने होणाऱ्या म्युटेशनशी आहे. जिवाणू हे सूक्ष्मजीव तसेच, केवळ एकपेशीय असल्यामुळे आणि विषाणू हे तर त्यांच्यापेक्षाही सूक्ष्म किंवा पूर्ण पेशी सुद्धा नसल्यामुळे त्यांची रचना गुंतागुंतीची नसते. परिणामी, हे जीव म्युटेशन घडून येण्याच्या दृष्टीने अगदीच पूरक असतात. म्हणूनच त्यांची उत्क्रांती झटपट घडून येते. याउलट, इतर मोठ्या जिवांना इतक्या लवकर रूप बदलण्याची संधी नसते.

उत्क्रांतिबद्दलची ही सर्वच तथ्यं समजून घेणे ही रंजक आणि रोमांचक बाब आहे. इतकेच नव्हे, तर हे सारे समजून घेणे म्हणजे निसर्गाचा खऱ्या अर्थाने शोध घेण्याजोगे ठरते. आतापर्यंत अनेकांनी कदाचित त्याची चुकीची किंवा अर्धी-कच्ची मांडणी ऐकली असेल. पण ती मुळातून आणि नेमकेपणाने उलगडणे हे नितांत आनंद देणारे ठरते. हीच बाब उत्क्रांतीप्रमाणेच विज्ञानाच्या इतर तत्त्वांनाही लागू होते. अनेकदा शाळेच्या पातळीवर असताना ही तत्त्वं आपल्यासमोर येतात. पण त्या वयात त्यांची व्याप्ती लक्षात घेण्याची किंवा त्यांचे आकलन करून घेण्याची क्षमता आपल्यात असतेच असे नाही. म्हणून आता या तत्त्वांचा पुन्हा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. त्यातून काय नवे गवसेल हे कदाचित आधी सांगताही येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com