Poultry Business Success Story : सोलापूर- मंगळवेढा मार्गावर कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे गावाअलीकडे रस्त्यालगत अरुण शिंदे कुटुंबीयांची चार एकर शेती आहे. ऊस हे प्रमुख पीक. हंगामात तूर, उडीद यासह चारापिके ते पूर्वी घेत.
अरुण यांचे वडील औदुंबर शेती पाहात गावात पिठाची गिरणी चालवतात. अरुण हे इलेक्ट्रॅानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विषयाचे पदवीधर असून बंगळूर येथील नामांकित कंपनीत नोकरी करतात.मात्र जाऊन-येऊन ते घर व शेतीची जबाबदारीही सांभाळतात.
धाकटे बंधू विक्रम ‘आयटीआय’ उत्तीर्ण झाले असून ते वडिलांना शेतीत पूर्णवेळ मदत करतात. केवळ शेतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी कुटुंबाने पूरक उद्योगांकडे वळण्याचा निर्णय घेतला. बघता बघता आठ वर्षांत भरारी घेतलेल्या त्यांच्या नावीन्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण बदक व कोंबडीपालन उद्योगाकडे आज सर्वांचे लक्ष वेधले आहे.
...अशी मिळाली उद्योगाची वाट
अरुण शिक्षणानंतर २०१७ मध्ये हैदराबाद येथे कंपनीत नोकरीस होते. तेथे सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ ही केंद्र सरकारची संस्था कार्यरत आहे. त्याद्वारे राष्ट्रीय प्रदर्शनात विविध जातीचीं बदके, भरपूर अंडी देणाऱ्या, जास्त मांसाच्या कोंबड्या त्यांच्या पाहण्यात आल्या. त्यात भारतभरातील पक्षी होते.
हा उद्योग आपल्यासाठीही उत्तम ठरू शकतो हे अरुण यांच्या लक्षात आले. पण अडचण अशी होती की घर पूर्णतः वारकरी सांप्रदायाचे होते. त्यामुळे आई-वडिलांना हा उद्योग चालेल का असा प्रश्न होता. अपेक्षेप्रमाणे विरोधही झाला. पण अरुण यांनी पक्षिपालन आणि विक्री एवढाच उद्देश ठेवून उत्पन्नस्रोत वाढविण्याविषयी पटवून दिले आणि उद्योगाचा श्रीगणेशा झाला. पुढे २०२० मध्ये पुणे तर आता बंगळूरला अरुण नोकरीला गेले. मात्र नोकरी करतच हा उद्योग त्यांनी हळूहळू वाढवत नेला.
हजारांच्या संख्येने बदके, कोंबड्या
आज शिंदे यांच्या फार्ममध्ये इंडियन गिझ, व्हाइट पेकिंग, मस्कोवी, इंडियन रनर आदी विविध जातीची देखणी ३०० बदके, ७०० पिल्ले आहेत. ब्लॅक ऑस्ट्रोलॅार्प (संकरित देशी) व कावेरी जातीच्या प्रत्येकी २५० कोंबड्या, ७५० पिले, टर्की वाणाच्या २०० तर झुंजीच्या सहा कोंबड्या आहेत. चार शेळ्या, सात जर्सी गाई आणि एक म्हैस आहे.
सुमारे २५ ते ५० पक्ष्यांपासून सुरू झालेला उद्योग आज हजाराहून अधिक पक्ष्यांच्या घरात पोहोचला आहे. बारा गुंठ्यांत प्रत्येकी अडीच हजार चौरस फुटांची तीन शेड्स आहेत. त्यात स्वतंत्रपणे बदके, कोंबड्या व पिलांची व्यवस्था आहे. बाजूला मुक्त गोठा आहे. त्यात पाण्याचा हौद आहे. कधी पाण्यात, कधी जमिनीवर बदके मुक्तसंचार करतात.
...असे केले उद्योगाचे प्रमोशन
बदके व कोंबड्यांच्या नव्या जातींचे मार्केटिंग- विक्री हे आव्हान होते. मात्र अभियंते अरुण यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करीत सोशल मीडियाद्वारे प्रमोशन सुरू केले. प्रो-शक्ती ॲग्रो फार्म हा ब्रॅण्ड तयार केला.
स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू करून बदके व कोंबड्यांच्या विविध जातीं, वैशिष्ट्ये, त्यांचे व्यावसायिक महत्त्व आदी माहिती देण्यास सुरुवात केली. आज सोलापूरच नव्हे तर लातूर, धाराशिव, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारासह तेलंगण, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातपर्यंतचे ग्राहक त्यांनी मिळवले आहे. त्यासाठी साखळी मार्केटिंगही सुरू केले आहे.
बाजारपेठ, विक्री व्यवस्था
बदके, कोंबड्यांच्या पिलांची जन्मल्यापासून एक दिवस ते तीन महिने अशी वयानुसार विक्री.
बदकाच्या व्हाइट पेकिंग आणि मस्कोवीच्या तीन महिने वयाच्या प्रति जोडीची विक्री बाराशे रुपयांच्या दरम्यान. हे बदक मांस आणि अंडी उत्पादनासाठी उपयुक्त.
घरगुती व शेतीच्या राखणीसाठी सर्वाधिक उपयुक्त बदक म्हणून इंडियन गिझची ओळख.
त्याच्या पिलाची एक हजार रुपये, तर प्रौढ प्रति जोडीची पाच हजार रुपये दराने विक्री.
इंडियन आणि चायनीज गिझ या दीड वर्षे वयाच्या बदकाच्या नर-मादी जोडीला मिळतो पाच हजार रुपये दर.
ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्पचे एकदिवसीय पिलू प्रति ४० रुपये, एक महिन्याचे पिलू १३५ रुपये, तर तीन महिन्याची कोंबडी ७०० रुपये अशी होते विक्री. कोंबडीचे वजन सर्वाधिक २ ते ४ किलोपर्यंत.
एकत्रित कुटुंबाची ताकद
उद्योगात अरुण शिंदे यांना वडील औदुंबर, आई शशिकला यांच्यासह आज्जी सुंदरबाई, अरुण यांची पत्नी विनया, विक्रम यांची पत्नी मुक्ता अशा सर्वांचे पाठबळ मिळते. सर्व जण हिरिरीने काम करतात. एकत्रित कुटुंबाची ताकद हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
शेतीसाठी उपयुक्त पक्षी
कर्कश आवाज हा बदक व टर्की कोंबड्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यामुळे शेतात. घरात नेहमी जाग ठेवण्याचे काम ते करतात. सापाला आवाज ऐकू येत नसला तरी कर्कश ओरडण्याने त्या लहरींची कंपने सापांना जाणवतात. त्यामुळे ते शेत, गोठ्याकडे फिरकत नाहीत. या गुणांमुळे हे पक्षी शेतासाठी उपयुक्त असल्याचे अरुण सांगतात.
अरुण शिंदे ९६७३७१६७२२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.