
Desi Poultry Breed Farming : मूळगाव अंबड (जि. जालना) असलेले प्रल्हादराव रामराव जाधव पोलिस खात्यात सेवेत रुजू झाल्यानंतर परभणी येथे स्थायिक झाले. सेवाकाळात परभणी, हिंगोली जिल्ह्यांत विविध ठिकाणी त्यांनी ३० वर्षे सेवा केली. सन २०१६ मध्ये फौजदार पदावरून ते सेवानिवृत्त झाले.
दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील असोला पाटीजवळ दोन एकर जमीन खरेदी केली. तेथे सिंचनासाठी बोअर, सौर कृषी पंप, जनरेटर अशा सुविधा तयार केल्या. सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ शेतीतच झोकून द्यायचे ठरविले. चिरंजीव रमेश कृषी पर्यवेक्षक असल्याने त्यांचेही मार्गदर्शन मिळू लागले.
पूरक व्यवसायाची जोड
एकतर क्षेत्र दोनच एकर व त्यात पारंपरिक शेती, यामुळे नफ्याचे गणित काही मनासारखे जुळून येत नव्हते. त्यामुळे २०१७ मध्ये शेतीपूरक व्यवसायाची जोड देण्याचे ठरविले. शेतामध्ये ८० बाय १५ फूट आकाराचा निवारा उभारून दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले.
लाल कंधारी आणि गीर अशा दोन गोवंशांचे पालन सुरू केले. कोंबडीपालन हे गावरान जातीचेच करायचे असे ठरवले. त्यानुसार अधिक माहिती घेऊन बंगळूर येथील सरकारी संस्थेतून कावेरी या देशी जातीच्या कोंबडीची ५०० पिले आणली. शेडच्या वरच्या मजल्यावर शेळीपालन तर त्याखाली कोंबडीपालन अशी व्यवस्था केली.
कावेरी जातीच्या कोंबडीची अंडी आणि पक्षी यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. त्या अनुषंगाने २०१९ मध्ये परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात सात दिवसांचे शास्त्रीय प्रशिक्षण प्रल्हादरावांनी घेतले. त्यांना डॉ. म्हाळसाकांत निकम व काकासाहेब खोसे यांचे मार्गदर्शन मिळाले.
व्यवसायास आली गती
सात वर्षांपूर्वी पाचशे पिलांपासून सुरू केलेला व्यवसाय आज लहान- मोठ्या मिळून अडीच हजार कोंबड्यांपर्यंत पोहोचला आहे. आता उत्पादनासह विक्री व्यवस्थेलाही चांगली गती आली आहे. दर महिन्याला सुमारे एक हजार पक्ष्यांची बॅच घेण्यात येते. परभणी शहर गावापासून पाच किलोमीटरवर आहे.
येथील ग्राहकांना थेट ‘होम डिलिव्हरी’ करण्याचे ठरवले. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप, यू-ट्यूब अशा विविध सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्या व्यवसायाचा प्रचार केला. आज ग्राहकांची चांगली बाजारपेठ तयार झाली आहे. प्रति दिन दोनशेपर्यंत अंडी मिळतात. प्रति नग १५ रुपये असा अंड्याचा दर आहे.
मात्र आरूष फार्म केज फ्री अंडी असे लेबल वा ब्रॅण्ड तयार केला आहे. त्याद्वारे ६ नगांचा बॉक्स ९० रुपये, १२ अंड्यांचा बॉक्स १८० रुपये व ३० अंड्यांचा बॉक्स ४२० रुपये अशा पद्धतीने विक्री होते. विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमध्येही स्टॉल उभारण्यात येतो. अंड्यांव्यतिरिक्त फार्मवरूनच प्रति किलो २२० रुपये दराने महिन्याकाठी १०० ते १५० पक्ष्यांची विक्री होते. महिन्याला २० टक्क्यांपर्यंत नफा होतो.
हॅचरी व पिलांची विक्री
कुटुंबाने अंडी उबवण केंद्रही (हॅचरी) सुरू केले आहे. पाच हजार अंडी उबवणी अशी त्याची क्षमता आहे. परभणी, लातूर, बीड आदी जिल्ह्यांमध्ये सात, १५ व ३० दिवस वयाच्या पिलांचा कागदी बॉक्समधून महिन्याला सुमारे एक हजार या प्रमाणात पुरवठा होतो.
तीन महिन्यांच्या नर पिलांचीही विक्री होते. वयानुसार पिलांना प्रति नग ४० रुपये, ७० रुपये व १०० रुपये दर आहेत. परभणी तसेच शेजारील जिल्ह्यातील शेतकरी कुक्कुटपालनाकडे वळले आहेत. त्या दृष्टीने खाद्य- पाणी पिण्याची भांडी, इलेक्ट्रिक व गॅस ब्रूडर, खाद्य आदींची विक्रीही सुरू केली आहे.
व्यवस्थापनातील बाबी
व्यवसायात स्वच्छतेला असलेले महत्त्व ओळखून आदर्श पद्धतीने फार्मची उभारणी.
पाय धुऊनच प्रवेश करावा लागतो. फिल्टर केलेले शुद्ध पाणी व संतुलित खाद्याचा वापर. त्यामुळे आजारांचे प्रमाण अतिशय कमी. आजारी तसेच जखमी कोंबड्यांचे पिंजऱ्यामध्ये संगोपन. त्यामुळे आजारास प्रतिबंध होण्यास मदत.
पिल्ले, वाढीची अवस्था, प्रौढ, नर, मादी असे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये संगोपन.
खाद्य व साहित्य साठवण्यासाठी स्वतंत्र जागा.
अहिल्यानगर जिल्ह्यातून खाद्य मागवण्यासह घरगुती खाद्यनिर्मिती करतात.
एक एकर मेथी घास, पालक चाऱ्याची लागवड.
कुटुंबातील सर्वांचे व्यवसायात योगदान. प्रल्हादराव, त्यांची पत्नी सागरबाई व सून वैशाली सर्व व्यवस्थापन सांभाळतात. रमेश सुट्टीच्या दिवशी मदत करतात. एका सालगडी तैनात.
आगामी काळात पशुखाद्य निर्मितीचा मानस.
शेतकरी कंपनीची स्थापना
सन २०१९ मध्ये जाधव यांनी कृषी विश्व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीचे ७२३ सभासद आहेत. प्रल्हाद जाधव अध्यक्ष तर वैशाली जाधव कंपनीच्या सचिव आहेत. सात सदस्यांचे संचालक मंडळ आहे. कंपनी मार्फत ‘स्मार्ट’ प्रकल्पाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.
त्याअंतर्गत दोन कोटी रुपये निधी व ६० टक्के अनुदान मंजूर झाले आहे. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, नोडल अधिकारी आबासाहेब देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. केशव सांगळे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
त्यातून १६० बाय ३० फूट व ११० बाय ३० फूट अशा आकाराचे दोन कोंबडीपालन शेड्स उभारले आहेत. दोन्ही मिळून आठ हजार कोंबडीपालनाची क्षमता आहे. या अंतर्गत आधुनिक हॅचरीजची उभारणी सुरू आहे. त्याची प्रति महिना अंडी उबवणूक क्षमता ६० हजार अशी असेल. कंपनीचे संकेतस्थळ असून त्याद्वारे विपणन केले जाते.
प्रल्हादराव जाधव ८६२३०२५९५५,
रमेश जाधव ८८०५०८०००१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.