Anjum Sheikh Journey  Agrowon
यशोगाथा

Success Story : ‘परिवर्तना’तून झालो सक्षम

Journey of Self Help Group : पळसप (ता. जि. धाराशिव) येथील अंजूम शेख त्यांचा तेरा वर्षांचा बचत गट चळवळीचा प्रवास महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

विकास गाढवे

Women Empowerment : अंजूम मन्सूरअली शेख यांचे माहेर तावरजा (ता. लातूर) येथील. आई नजराणा आणि वडील ताहिर उस्मान पठाण यांना दोन मुली आणि दोन मुले. धाराशिव येथील मोठी मावशी नूरजहाँ यासीन खान यांनी अंजूम यांना दत्तक घेतले. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजूम यांचे पळसप (ता. धाराशिव) येथील मन्सूरअली खय्यूम शेख यांच्यासोबत विवाह झाला. सासू नूरबानू शेख या पळसप गावच्या सरपंच होत्या.

त्यांच्याकडूनच अंजूम यांना महिला सक्षमीकरणाचे बाळकडू मिळाले. घरच्या स्वस्त धान्य दुकान व पाच एकर जमिनीच्या उत्पन्नातून रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. मोठा खर्च आला की जमीन खंडाने द्यावी लागे. भागातील बहुतांश कुटुंबांची अशीच परिस्थिती होती. सातत्याने उसनवारी व कर्ज घेऊन तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यावर सर्वांचा भर होता. आजचा दिवस भागला की उद्याचा दिवस कसा जाईल, याचीच चिंता सर्वांना होती.

महिला गटाला सुरुवात

संसारात स्थिरस्थावर झाल्यानंतर घराबाहेर पडून स्वयंरोजगार करावा असे अंजूम यांना वाटू लागले. दरम्यान, २०११ मध्ये त्यांना सासू नूरबानू यांनी घराची चौकट ओलांडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी बचत गटासाठी अंजूम यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर अंजूम यांनी गल्लीतील महिलांना एकत्र करून ‘पिरानीअम्मा’ नावाने पहिला बचत गट स्थापन केला. या गटाचे व्यवहार काही दिवसानंतर विसर्जित झाले.

घरात मन लागेना. दरम्यानच्या काळात धाराशिवला आरसीटी संस्थेच्या ब्यूटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षणास उपस्थित राहिल्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक माधव शेळके यांच्यासमोर अंजूम यांनी मनोगत व्यक्त केले. त्या वेळी शेळके यांनी उमेद अभियानातून बचत गटांच्या स्थापनेसाठी समूह संसाधन व्यक्ती (सीआरपी) म्हणून काम करण्याविषयी विचारणा केली. हीच संधी ओळखून अंजूम यांनीही त्वरित तयार दर्शविली.

साडेपाचशे महिलांचे संघटन

उमेद अभियानात केवळ बचत गट स्थापनेचा विषय नव्हता. गटातील प्रत्येक महिलेला बचतीची सवय लावणे तसेच गट व बँक व्यवहाराचे ज्ञान देऊन स्वयंरोजगारासाठी उभे करेपर्यंत दशसूत्रीनुसार पाठपुरावा करावा लागतो. वीस बचत गटांमागे तीन हजार रुपये दरमहा मानधन मिळते. महिलांंच्या सोयीच्या वेळेनुसार सायंकाळी घराजवळच बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

गटाच्या माध्यमातून कुटुंबांच्या आर्थिक गरजा भागविणे, संसाराला हातभार लावणे कसे शक्य आहे हे पटवून दिले. आठवड्याला २५ रुपयांप्रमाणे बचत करायला लावली. बचतीची रक्कम कर्जाऊ दिल्यानंतर त्यातून आलेले व्याजही महिलांना समान मिळू लागले. गटाच्या व्यवहारात व्याजातही हिस्सा मिळतो. हे पटल्यानंतर महिला गटासाठी पुढे आल्या. स्वतःच्या मदिना गटासह वर्षभरात ३९ गट स्थापन केले, असे अंजूम शेख सांगतात.

परिवर्तन ग्रामसंघातून काम

सर्व बचत गटांचा मिळून ‘परिवर्तन महिला ग्रामसंघ’ स्थापन केला. गटाच्या व्यवहारासोबत सामाजिक कामही केले. दारूबंदीसह नागरी समस्या सोडविण्यासाठी महिलांना ग्रामसभा तसेच संबंधित यंत्रणेसमोर प्रश्‍न मांडायला शिकवले. महिलांना ‘तुझी तू सक्षम हो’ म्हणून प्रोत्साहित केले.

भांडवलाची जुळवणी करून व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. सध्या सर्व बचत गटांत मिळून ५६० महिला आहेत. त्यापैकी दीडशे महिला किराणा, कापड दुकान, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला विक्री, कुक्कुटपालन, पापड, शेंगदाणे लाडू, मसाले पदार्थ निर्मिती आदी व्यवसाय करत आहेत. सर्व गटांतून मिळून महिन्याला वीस लाख रुपयांचे व्यवहार होतात.

रेशीम शेती आणि कुक्कुटपालन

सुरुवातीला सीआरपी म्हणून काम करताना मीटिंग संपवून घरी यायला उशीर होणार असेल तर गटाच्या महिला घरापर्यंत सोडायला यायच्या. काम व महिलांचा प्रतिसाद पाहून हळूहळू पतीची साथ मिळत गेली. असे आत्मविश्‍वासाने अंजूम सांगतात.

सुरुवातीला शेळीपालनात नुकसान झाल्यानंतर खचून न जाता रेशीम शेती सुरू केली. त्याला दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाची जोड दिली. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने उभारी मिळाली. त्यातूनच कुटुंबासाठी मोठे घर बांधले. पूर्वी पैशासाठी सावकाराच्या दारात जाणारे हात आता गटाकडे आले. गटातून कर्ज घेऊन वेळेत परतफेड महिलांमार्फत होते. बँकांसह खासगी संस्थांकडून गटांना कर्ज मिळवून देण्यात येते. तुमच्यामुळेच माझा मुलगा इंजिनिअर झाला, कुटुंबांची प्रगती झाली असे एखादी महिला सांगते, त्या वेळी स्वतःचा अभिमान वाटतो, असे अंजूम शेख सांगतात.

शंभर महिला संघटनातून व्यापक काम

बचत गटाच्या व्यवहारात भांडवलाची मोठी कमतरता असते. बँकेच्या कर्जासाठी जास्त व्याज जाते. महिलांना घरबसल्या काम हवे आहे. येत्या काळात दैनंदिन उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगाराची व्याप्ती वाढवण्याचे नियोजित आहे. त्यासाठी जालना येथील यशस्वी महिला उद्योजक संस्थेला भेट दिली आहे. संस्थेमार्फत महिलांना कच्चा माल देऊन पक्कामाल खरेदी केला जातो. या संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात अधिकतम महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असे अंजूम शेख यांनी सांगितले.

सर्वांची मिळाली साथ...

तेरा वर्षांच्या कामातून खूप शिकायला मिळाले. विविध सरकारी योजना, त्यासाठीची कागदपत्रे तसेच सर्व व्यवहारांची महिलांना माहिती देऊन त्यांचा फायदा करून देताना मोठे समाधान मिळू लागले. मुस्लिम समाजातील १६ महिलांनी रोजगार सुरू केला आहे. महिलांच्या अडचणी सोडवल्याचे समाधान मिळते. ‘उमेद’चे माधव शेळके व अमर सूर्यवंशी यांनी कायमच मार्गदर्शन करत पाठबळ दिल्याने आत्मविश्‍वास वाढला आहे, असे अंजूम शेख आवर्जून सांगतात.

कामाचा गौरव

कोरोना काळात बचतीसाठी महिलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे गटाच्या शिल्लक भांडवलातून सोलापूरच्या व्यापाऱ्याकडून केवळ साडेबारा हजार रूपयांत दहा बंडल परकरच्या कापडाची खरेदी केली. परकरच्या शिलाईतून महिलांनी कुटुंबाला हातभारही लावला. बचत गटाच्या कामामुळे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते अंजूम शेख यांचा गौरव करण्यात आला. पळसप ग्रामपंचायतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

- अंजूम शेख ९१४६४६७२८६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT