Women Empowerment : नारळ करंवटीच्या कलाकुसरीतून महिलांना मिळाला रोजगार

Employment Of Women : टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या टिकाऊ वस्तूंच्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा उपक्रम जयगड पंचक्रोशीतील महिलांनी अवलंबला आहे. कोकोनट शेलक्राफ्टच्या माध्यमातून करंवटीपासून ७० हून अधिक वस्तूंची निर्मिती केली जाते. याद्वारे खंडाळा, पेठवाडी येथील सहा महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून, दरवर्षी एक लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल होते.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Agribusiness : कोकणातील ग्रामीण भागातील महिला गृहिणीच्या भूमिकेत, तर पुरुष मंडळी मोलमजुरी करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायला. मात्र गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलताना दिसते आहे. बचत गटांची चळवळ आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनसारख्या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून महिला आता स्वतःच्या पायांवर उभ्या राहत आहेत.

जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून जयगड पंचक्रोशीतील लोकांना शेतीपूरक व्यवसाय आधारित प्रशिक्षण दिले जाते. फाउंडेशनद्वारे खंडाळा आणि पेठवाडी (ता.जि. रत्नागिरी) येथील महिलांना नारळाच्या करवंटीपासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या शोभेच्या वस्तूंच्या विक्रीतून महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. यासाठी महिलांना जेएसडब्ल्यू फाउंडेशनची साथ मिळते आहे.

...अशी झाली सुरुवात

फाउंडेशनच्या सीएसआर विभागाचे प्रमुख अनिल दधीच यांनी धुळे येथे करवंटीपासून बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन पाहिले होते. त्या प्रदर्शनात आकर्षक फ्लॉवरपॉट, कासवाच्या प्रतिकृती तसेच शोभेच्या अनेक वस्तू होत्या. याच धर्तीवर जयगड पंचक्रोशीतील महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

फाउंडेशनद्वारे २०१८ मध्ये खंडाळा आणि पेठवाडी (ता.जि. रत्नागिरी) येथील बचत गटातील १० महिलांना एकत्र घेऊन कोकोनट शेलक्राफ्टचे प्रशिक्षण देण्यात आले. वस्तूंच्या विक्रीसाठी फाउंडेशनद्वारे खंडाळ्यापासून जवळच जेएसडब्ल्यूच्या जयविनायक मंदिरात कलाधामच्या माध्यमातून केंद्र उभारण्यात आले.

या कलाधामचे प्रमुख किशोर गुरव यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व महिला या शेतकरी कुटुंबातील आहेत. घरातील कामे करून रिकाम्या वेळेत करवंटीपासून वस्तू बनवण्याचे उद्योग महिला करू शकतात, मुख्य हाच उद्देश त्यामागे होता.

Women Empowerment
Coconut Cultivation : चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळ लागवडीकडे दुर्लक्ष

विविध शोभिवंत वस्तूंची निर्मिती

प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांनी वस्तू बनवण्यास सुरुवात केली. सामान्यपणे नारळ फोडून त्याच्या करवंट्या या टाकाऊ वस्तू म्हणून फेकून दिल्या जातात. या करवंट्या बचत गटाच्या महिलांनी संकलित करून त्याचे मूल्यवर्धन करण्यास सुरुवात केली. वर्षाला सुमारे एक टन करंवटीवर या महिला प्रक्रिया करतात.

त्यासाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडून केला जातो. यामाध्यमातून करवंटी कापणे, मागणीनुसार वस्तूंना आकार देणे, पॉलिशिंग करणे इत्यादी कामे केली जातात.

करवंटी घासून चकचकीत केली जाते. त्यापासून फ्लॉवरपॉट, अरगबत्तीचे स्टॅण्ड, स्टोअरेज कंटेनर, चमचे, बाउल, कलश, मंदिराच्या प्रतिकृती यांसह सुमारे ७० प्रकारच्या विविध वस्तूंची मागणीनुसार निर्मिती सुरू केली. सुरुवातीच्या काळात करवंटी घासून चकचकीत करण्याच्या कामासाठी अधिक वेळ लागत होता. कालांतराने वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी ग्राइंडरचा वापर करण्यास सुरुवात केली.

विक्री व्यवस्था केली भक्क्म

जयविनायक मंदिरात विक्रीसाठी कलाधाम केंद्र सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देण्यास येतात. त्या वेळी वस्तूंची खरेदीदेखील करतात. याशिवाय शासनाच्या विविध प्रदर्शनामध्ये देखील कलाधामतर्फे स्टॉल लावला जातो. रत्नागिरीत गतवर्षी झालेल्या कृषी प्रदर्शनात शोभेच्या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदापासून ‘अ‍ॅमेझॉन’च्या माध्यमातून करवंटीच्या वस्तू ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सुरुवातीच्या २०१८ ते १९ या आर्थिक वर्षात महिलांना वस्तूंच्या विक्रीतून चांगला आर्थिक फायदा झाला. मात्र कोरोना कालावधीत हे केंद्र ठप्प झाले. परंतु गतवर्षीपासून पुन्हा या कुटीर उद्योगाला चालना मिळाली आहे. २०२२ ते २३ या आर्थिक वर्षात महिलांनी सुमारे १ लाख रुपयांच्या वस्तूंची निर्मिती केल्याचे कलाधामचे प्रमुख किशोर गुरव यांनी सांगितले.

महिलांनी बनविलेल्या विक्रीसाठी कलाधाम

कोकणातील महिलांमध्ये अनेक कलागुण उपजत आहेत. त्यांना व्यावसायिक स्वरूप दिले जर उदरनिर्वाहाचे चांगले साधन निर्माण होईल या उद्देशाने कलाधामची निर्मिती करण्यात आली. आतापर्यंत कलाधामच्या माध्यमातून बचत गटातील सुमारे १५० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी जयविनायक मंदिरातील कलाधाममध्ये वस्तू विक्रीची सोय करण्यात आली. तेथे विविध प्रकारची १०० हून अधिक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येतात. त्यात करवंटीपासून बनवलेल्या वस्तूंसह पेटींग, इमिटेशन ज्वेलरी, विविध प्रकारचे मसाले, आंबा लोणचे, आमरस इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

सुरुवातीच्या काळात उत्पादनांच्या विक्रीतून महिन्याला पाच हजार रुपये मिळत होते. आता महिन्याची विक्री १ लाखापर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी ७० ते ७५ टक्के रक्कम ही महिलांना मिळते, असे जेएसडब्ल्यूचे सीएसआर प्रमुख अनिल दधीच यांनी सांगितले.

महिलांना मिळतोय रोजगार

सध्या गटाच्या माध्यमातून श्रद्धा आढाव, शीतल पारकर, प्राजक्ता गमरे, दिव्या हळदणकर, अमृता होरंबे, अंजली गुरव या महिला वस्तू तयार करून त्यांची विक्री करत आहेत.

याशिवाय खंडाळा येथील जीवनज्योती बचत गटातील १० महिलांना नव्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांनाही येत्या काळात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हा उद्योग पूरक ठरणार आहे.

Women Empowerment
Banana Damage : हत्तींचा धुमाकूळ; नारळ, सुपारी, केळीचे नुकसान
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. करवंटीसारख्या टाकाऊ वस्तूपासून रोजगार निर्मिती होऊ शकते, हे रुजवण्यात आम्हाला यश मिळत आहे.
किशोर गुरव, अध्यक्ष, कलाधाम , ७२६३८५४७०८
मी गेली तीन वर्षे करवंटीपासून विविध वस्तू तयार करत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू तयार केल्या जातात. या माध्यमातून मोकळ्या वेळेत घरबसल्या आम्हाला रोजगार मिळाला आहे.
श्रद्धा आढाव, खंडाळा, ता.जि. रत्नागिरी, ७२१८९१३३२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com