Mango Business
Mango Business Agrowon
यशोगाथा

Mango Business : आंबा व्यवसायातून मिळविली आर्थिक स्थिरता

एकनाथ पवार

Devgad News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे (ता. देवगड) येथील विनय रमेश पाडावे यांनी आंबा उत्पादनातून शून्यातून आर्थिक स्थिरतेपर्यंतचा प्रवास पार केला आहे. वडिलोपार्जित एक कलम नसताना आज २५०० पेक्षा अधिक आंबा झाडांचे व्यवस्थापन ते करत आहेत. वार्षिक सव्वा कोटीपर्यंतची उलाढाल ते आंबा व्यवसायातून करतात.

देवगड-निपाणी मुख्य मार्गापासून दोन अडीच किलोमीटरवर किंजवडे हे गाव आहे. तिथून घाडीपाडावेवाडीकडे जाताना विनय पाडावे यांचे घर आहे.

देवगड हा संपूर्ण तालुकाच हापूसकरिता प्रसिद्ध आहे. कुठेही नजर फिरवली तरी आंब्याची हिरवीगार झाडे अन् हंगामात फळे लगडलेली झाडे दिसतात.

सध्या हापूसचा हंगाम तेजीत असून बागांमध्ये आंबा काढणी सुरू आहे. येथील अन्य गावांप्रमाणेच किंजवडे हे गावही दर्जेदार आंब्यासाठी ओळखले जाते. याच गावात विनय यांचे वडील मजुरी करायचे.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही विनय यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. कोकणातील अन्य तरुणांप्रमाणे नोकरी, व्यवसाय काय करायचा हा प्रश्न सतावू लागला. त्या वेळी मनातून गावाबाहेर जाण्याची इच्छा नव्हती.

गावातच शेती करायची तर वडिलोपार्जित शेतजमीनही नव्हती. त्यावर मार्ग काढताना विनय यांनी सुरुवातीला करार पद्धतीने २० ते २५ आंब्याची झाडे व्यवस्थापनाकरिता घेतली.

त्या वेळी फवारणीला चांगला पंप नाही; खते, किटकनाशकांकरिता पुंजी नाही अशी बिकट अवस्था तरिही हार न मानता त्यांनी झाडांपासून कष्टातून चांगले उत्पादन घेतले.

पहिल्या वर्षी मिळालेल्या उत्पन्नातून बागेसाठी आवश्यक साहित्य (फवारणी पंप इ.) खरेदी केले. दुसऱ्या वर्षी कराराने अधिक झाडे घेतली. अशी वर्षागणिक कराराच्या झाडांच्या संख्येत वाढ करत नेली. आताही ते दरवर्षी ३ हजार झाडे करारशेतीने घेतात.

स्वतःची बाग असली पाहिजे...

आपल्याकडे वडिलोपार्जित आंबा बाग नसली तरी स्वतःच्या मालकीची बाग असलीच पाहिजे, असा ध्यास विनय यांनी घेतला. प्रत्येक वर्षी मिळणारा नफा साठवत त्यांनी हळूहळू साडे सात एकर जमीन खरेदी केली. त्यातील बहुतांश या आंबा बागा होत्या. एका अडीच एकर क्षेत्रामध्ये स्वतः नवीन हापूसची लागवड केली. आता स्वमालकीची अशी ५०० आंबा झाडे आहेत.

कोरोना काळात डगमगले नाहीत...

२००४ पासून आंबा व्यवसायात उतरलेल्या विनय यांनी २०२० पर्यंतच्या १६ वर्षामध्ये प्रचंड मेहनत, झाडांचे योग्य व्यवस्थापन, काटेकोर नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास यातून चांगला जम बसवला होता. अगदी सन २०१९-२० च्या हंगामाचेही सूक्ष्म नियोजन केले होते.

मात्र मार्चमध्ये आंबा हंगाम सुरू होऊन आठवडाही उलटला नाही तोवर सर्वत्र कोविड १९ चे सावट घोंघावू लागले. प्रसार आणि जीवितहानी कमी ठेवण्यासाठी शासनाने टाळेबंदी केली. आंबा काढणी सुरू असतानाच हे घडल्यामुळे काढलेला आंबा तसाच पडून राहिला. त्यानंतर महिनाभर बागेत आंबा असूनही काढणीला माणसे घेता येत नव्हती की बाजारात पाठवता येत नव्हता.

काही काळाने शेतीमालासाठी नियम थोडे शिथिल झाले तरी लोकांच्या मनात भीतीमुळे बाजारात लोक येत नव्हते. बाजारात आंब्याला उठावच नसल्याने कवडीमोल दराने आंबा विक्री करावी लागली. यामध्ये ७० ते ८० लाखांचे नुकसान होऊन आर्थिक कंबरडे मोडले. कारण करारशेती असल्यामुळे मालकांना तर ठरलेली रक्कम द्यावीच लागते. परंतु ते डगमगले नाहीत. पुढील वर्षी त्यांनी अधिक जोमाने काम सुरू केले.

विनय पाडावे यांची वैशिष्ट्ये

१) आंबा पिकातील १९ वर्षाचा अनुभव

२) सन २००९ मध्ये बँकेकडून ७ लाख रुपये कर्ज आणि स्वभांडवलातून २.५ एकर जमीन खरेदी केली. पुढे २०१३ मध्ये स्वगुंतवणुकीतून ५ एकर जमिनीची खरेदी केली. अशा प्रकारे आज त्यांची स्वतःची १५ एकर शेती आणि ५०० झाडे आहेत.

३) करारशेतीने सुमारे २५०० झाडांची जोपासना.

४) एकात्मिक सेंद्रिय रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन.

५) सुरुवातीला साधा पायपंपही नव्हता. पहिल्या वर्षाच्या उत्पन्नातून घेतलेल्या पायपंपाने फवारणी करत. अगदी कळशीने पाणी घालत एकेक झाड वाढवले. आज अत्याधुनिक फवारणी पंपासह सर्व साधने खरेदी केलेली आहेत. आंबा वाहतुकीसाठी एक ट्रकही घेतला आहे.

वर्ष आणि उत्पादन

दरवर्षी पाच ते सात हजार आंबा पेटी माल वाशी मार्केटमध्ये पाठवितात. त्यातील दहा टक्क्यांचे थेट ग्राहकांना विक्री केली जाते.

मार्चमधील आंब्याला प्रतिपेटी ३.५ ते ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. १५ एप्रिलनंतर दरात घसरण होऊन प्रतिपेटी १२०० ते १५०० असा दर मिळतो. मे महिन्यात प्रतिपेटी ८०० रुपयांपर्यंत दर खाली येतो.

वर्ष आंबा पेट्यांची संख्या

२०२० ५ हजार पेटी

२०२१ ६ हजार पेटी

२०२२ ६ हजार ५०० पेटी,

एकूण उलाढाल १ कोटी २५ लाखांपर्यंत

आंब्यांची प्रतवारी

पुढीलप्रकारे केली जाते

दर्जा फळाचे वजन (ग्रॅम)

ग्रेड ए १ ३००

ग्रेड १ २७५ ते ३००

ग्रेड २ २५० ते २७५

ग्रेड ३ २२५ ते २५०

ग्रेड ४ २०० ते २२५

ग्रेड ५ १७५ ते २२५

ग्रेड ६ १७५ पर्यंत.

असे असते साधारण आर्थिक नियोजन

करारापोटी द्यावी लागणारी वार्षिक रक्कम - २० लाख रु.

सेंद्रिय व रासायनिक खते - १५ लाख रु.

कीडनाशके -२५ लाख रु.

मजुरी* - १५ लाख रु.

पॅकिंग मटेरिअल - २ लाख रु.

(* पाडावे यांच्या आंबा बागेत कायमस्वरूपी १८, तर हंगामात आणखी १५ असे ३३ लोक काम करतात. अगदी पावसाळ्यात खते घालणे, फवारणी करणे इ. कामासाठी मनुष्यबळ लागते. मात्र आंबा काढणी, ग्रेडिंग, पॅकिंग अशा कामांसाठी अधिक मनुष्यबळाची गरज भासते.)

सामाजिक बांधिलकी...

नुकत्याच झालेल्या किंजवडे ग्रामपंचायत निवडणुकीत विनय पाडावे निवडून आले आहेत. सध्या त्यांच्याकडे उपसरपंच पदाचा कार्यभार आहे. नेहमी सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

स्वतःचे शिक्षण अपुरे राहिले तरी गावातील कुठल्याही मुलाचे शिक्षण अडू नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो.

विनय रमेश पाडावे, ९६५७५५५४८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT