Success Story Agrowon
यशोगाथा

Success Story : वसमत तालुक्यातील अडकिणे कुटुंबाची एकीमुळे शेती झाली यशस्वी

Agriculture labor shortage : हिंगोली जिल्ह्यातील इंजनगाव (ता. वसमत) येथीली सदाशिव अडकिणे यांनी मजूरटंचाई व दुष्काळी स्थिती या समस्या लक्षात घेतल्या. त्यावर उत्तर शोधताना व समस्येवर मात करताना अनुकूल फळपिकांची निवड व व्यावसायिक शेती पद्धती विकसित केली. एकत्रित कुटुंब पध्दतीच्या जोरावर या शेतीत यश मिळवण्यासह आर्थिक स्थैर्यही त्यांनी गाठले आहे.

माणिक रासवे

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात इंजनगाव हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. येलदरी कालव्याचा लाभ मिळत असल्याने गावशिवारात मुबलक पाणी आहे. गावातील ७० टक्के क्षेत्र बागायती आहे. ऊस, हळद, भाजीपाला आदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर असतो.

वसमत आणि नांदेड ही शहरे जवळ असल्याने मजूर वर्ग वीट भट्ट्या, बांधकामे आदी कामांना प्राधान्य देतो. त्याचे कारण मजुरीचे दर त्याठिकाणी थोडे अधिक आहेत. त्यामुळे शेतीकामासाठी मजुरांची मोठी समस्या भासते. वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.

गावात सदाशिव वामनराव अडकिणे आणि बंधू बालाजी यांचे संयुक्त कुटुंब आहे. गावशिवारात तीन एकर व आसना नदीकाठी चार एकर अशी मिळून सात एकर जमीन आहे. चार बोअर आहेत. दोन ठिकाणच्या शेतादरम्यान पाइपलाइन आहे. कुटुंबाची पूर्वीची शेती पारंपरिक होती. त्यात हंगामी व भाजीपाला पिके घेतली जायची. रानडुक्कर, हरिण, वानरे आदी प्राण्यांचा त्रास व्हायचा.

अडकिणे यांच्या शेतीचा विकास

कुटुंबातील सदाशिव यांनी २००३ ते २०१४ या ११ वर्षांच्या कालावधीत कृषी रसायने क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विपणन प्रतिनिधी म्हणून विविध ठिकाणी काम केले. त्या वेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहण्यात आले. आपली शेतीही त्याच पद्धतीने विकसित करायची असे त्यांनी ठरविले.

सन २०१५ नंतर सदाशिव नोकरी सोडून पूर्णवेळ शेती करू लागले. कुटुंबाने २०१० ते २०१९ या काळात दुष्काळी परिस्थितीचा दाहक अनुभव घेतला. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या, दुष्काळ काहीसा सहन करू शकणाऱ्या पिकांची निवड करण्याचे ठरविले. सदाशिव यांनी नवी पीक पद्धती अभ्यासण्यासाठी सहकाऱ्यांसमवेत राज्यभर दौरा केला. अजून दोन समस्या बाकी होत्या,

यात आसना नदीला पूर यायचा. खरीप पिकांचे अतोनात नुकसान व्हायचे. मजूरटंचाई होती. सर्व समस्यांतून मार्ग काढण्यासाठी कुटुंबाने पूर्ण विचारांती आपल्या भागाला अनुकूल व्यावसायिक पीक पद्धती तयार केली. यात हळद, ऊस, केळी आदी पाणी व मजुरांची जास्त गरज असलेल्या पिकांना वगळले. पेरू, करवंद व सीताफळ या कमी पाण्यात येणाऱ्या बहुवार्षिक फळांची लागवड केली.

करवंद लागवड

यात पांढऱ्या गुलाबी वाणांची निवड केली. त्याचे चार एकर क्षेत्र असून, दोन एकरांत पेरू व करवंद अशी मिश्र पीकपद्धती आहे. या पिकाला किडी- रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. वन्य प्राण्यांचा त्रास नाही. त्यामुळे करंवदाचे कुंपणही फायदेशीर ठरते. ऑगस्टमध्ये फळ हंगाम असतो. त्यावेळी १५ ते २० मजुरांची गरज असते.

२०२१ मध्ये करवंदाचे एकूण क्षेत्रातून ४.५ टन उत्पादन, सन २०२२ मध्ये साडे सात टन उत्पादन मिळाले. यंदा १४ टन उत्पादन अपेक्षित आहे. दोन वर्षांत किलोस ३० ते ३८ रुपये दर मिळाला. सन २०२१ मध्ये करवंदाची रोपवाटिका सुरू केली आहे.

प्रक्रिया उत्पादने

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अन्न तंत्र महाविद्यालयातून अडकिणे यांनी करवंदापासून सिरप, जेली, लोणचे, मुरब्बा आदी पदार्थ तयार करून घेतले आहेत. पुढील काळात स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार आहे.

पेरू, सीताफळ लागवड

सन २०२० मध्ये लखनौ येथून एल ४९ (सरदार) वाणांची गुटी कलम केलेली रोपे आणली. त्याचे सलग दोन एकर क्षेत्र व करवंदासह मिश्र पीक आहे. जुलैमध्ये शेंडे खुडतात. त्यामुळे अधिक फुटवे फुटतात. मृग बहराचे उत्पादन नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत तर हस्त बहराचे फेब्रुवारी ते मार्च काळात उत्पादन मिळते.

सन २०२१ मध्ये एकूण क्षेत्रातून अडीच टन, २०२२ मध्ये ४ टन व २०२३ मध्ये ७ टन उत्पादन मिळाले. सीताफळ दोन एकरांत असून, बाळानगर व गोल्डन अशा दोन जाती आहेत. करवंदासमवेत मिश्र पद्धती आहे.

भाजीपाला

सुमारे सव्वा एकर क्षेत्र भाजीपाल्यासाठी दिले असून त्यात कांदा, काशीफळ, दोडका, दुधी भोपळा, देवडांगर आदी पिके घेण्यात येतात.

शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी

-सौर कृषिपंपाची व्यवस्था.

-विविध फळझाडांवर कलम करण्याचे कौशल्य अवगत.

-२०१६ पासून रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्ण बंद. शेणखत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, वेस्ट डी कंपोजर आदींचा वापर.

-देशी गायींसह नऊ जनावरे. गरज भासल्यास शेणखत विकत घेण्यात येते.

-वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या (परभणी) बायोमिक्स तसेच अन्य जैविक खतांचा वापर.

-नाबार्ड अंतर्गत आसना शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना. (२०१९) सदाशिव कंपनीचे संचालक. मागील वर्षी कंपनीने सेंद्रिय गूळविक्रीतून दीड कोटींची उलाढाल केली. आठवडे बाजार, कृषी प्रदर्शने, शेतकरी मेळावे आदींमधून स्टॉल.

सारे कुटुंब राबते शेतीत

कुटुंबाची एकी हीच अडकिणे यांची सर्वांत मोठी ताकद व जमेची बाजू आहे. आई इंदूबाई, सदाशिव, पत्नी ज्योती, बंधू बालाजी, त्यांची पत्नी मनीषा हे सदस्य शेतीत राबतात. महिला सदस्य सकाळी स्वयंपाक, घरकामे आटोपून शेतीकामांसाठी सज्ज होतात.

पेरणीपूर्वी मशागत, लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व कामे घरचे सदस्यच करीत असल्याने मजुरीवर अवलंबित्व व खर्च बराच कमी झाला आहे. कुटुंबाने वसमत, नांदेड, श्री छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड आदी शहरांत स्वतःची विक्री व्यवस्था उभी केली आहे. यात दोघे बंधू सक्रिय आहेतच.

शिवाय आदित्य कदम, सूरज अडकिणे, आदिनाथ चव्हाण, अजित अडकीणे या चार नातेवाइकांची ‘टीम’ तयार केली आहे. हैदराबाद, पुणे, मुंबई मार्केटमध्ये देखील विक्रीचे नियोजन होते. माल पोहोचविण्यासाठी वाहन घेतले आहे.

अशा सुनियोजित व्यवस्थापनातून कुटुंबाने आर्थिक सक्षमता मिळवली आहे. सदाशिव यांना दोन मुली, तर बालाजी यांना एक मुलगा व मुलगी आहे. ते देखील शेतीत मदत करतात. घराचे पक्के बांधकाम सुरू केले आहे. येत्या काळात फळप्रक्रियेचा मानस आहे.

संपर्क - सदाशिव अडकिणे, ९८३४०१२०३६, ९५५२४५९११४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT