Success Story : पुरंदर तालुक्यातील मनीषा कामथे यांनी तयार केला दर्जेदार मसाल्यांचा ब्रॅण्ड

Process Industries : कुटुंबाचा वाढता खर्च लक्षात घेऊन आपला हातभार लागावा यासाठी ग्रामीण भागातील महिला प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहेत. शिवरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील मनीषा संतोष कामथे यांनी तीन वर्षांपूर्वी मसाला निर्मिती उद्योगाला सुरुवात केली.
Success Story
Success StoryAgrowon

Spice brand : इच्छाशक्ती आणि संघर्षाच्या बळावर शून्यातून भरारी घेता येते हे शिवरी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील मनीषा संतोष कामथे यांनी दाखवून दिले आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या मनीषाताईंना शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण जात होते.

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी मावसबहिणीच्या सल्ल्याने २०१९ मध्ये एक मसाला कांडप यंत्र घेऊन परिसरातील ग्राहकांना मसाले कुटून देण्याचा व्यवसाय सुरू केला. घरगुती स्तरावर मसाला उत्पादनाला ग्राहकांच्याकडून मागणी वाढू लागल्याने मनीषाताईंनी पती संतोष यांच्या मदतीने बाजारातून मोठ्या प्रमाणात कच्या मालाची खरेदी करून मसाला उत्पादनवाढीचा निर्णय घेतला.

याचबरोबरीने शेवई यंत्र खरेदी करून ग्राहकांना शेवई तयार करून देण्यास सुरुवात केली. उत्पादनांना वेगळी चव राखल्याने ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला.

मसाला निर्मिती उद्योगाची सुरुवात

शिवरीतील ग्रामविकास स्वयंसहाय्यता समुहाने मनीषाताईंना सासूच्या जागी सदस्य करून घेतले. २०२१ मध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत बचत गटांसाठी आयोजित दहा दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात चाळीस प्रकारचे मसाले, लोणचे, शेवया, पापड आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांना प्रेरणा मिळाली.

त्यांनी बँकेच्या कर्जासह पंचायत समितीकडून ४० हजार रुपये बीजभांडवल घेतले. यातून नवीन यंत्रे घेऊन व्यवसायाचा विस्तार केला. या माध्यमातून लोणच्याचे चार प्रकार, शेवई, सांडगे, पापड, कुरडई, पापडी, बटाटा वेफर्स, खारवडे आदी पदार्थही बनविण्यास सुरुवात केली.

Success Story
Spices Industry : घरगुती मसाले उद्योगाने दाखवली यशाची वाट

मनीषाताई प्रामुख्याने मटण मसाला, बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, दूध मसाला, सांबर मसाला, पाणीपुरी- कच्ची दाबेली मसाला, चिवडा मसाला, लोणचे मसाला अशा जवळपास चाळीस प्रकारच्या मसाल्याची निर्मिती करत आहेत.

ग्राहकांच्या मागणीचा विचार करून ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि एक किलो या प्रमाणात मसाल्याचे पॅकिंग केले जाते. दीर्घकाळ मसाले टिकण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांना विक्री करणे अधिक सोपे जाते.

मसाल्याचे दर

मसाला -- वजन (ग्रॅम) --- दर (रुपये)

मटण मसाला -- १०० -- ७५

बिर्याणी मसाला --- १०० -- ७५

पावभाजी मसाला --- १०० -- ६५

कांदा लसूण मसाला --- १०० -- ६०

काळा मसाला --- १०० --- १००

सांबर मसाला --- १०० --- ५०

लोणचे मसाला -- १०० -- ७०

कोल्हापुरी मसाला -- १०० -- १२०

महालक्ष्मी ब्रॅण्ड :

ऑगस्ट २०२२ मध्ये बारामती अॅग्री गटाच्या माध्यमातून मनीषाताईंची ‘फार्म दीदी’ कंपनीशी ओळख झाली. दर्जेदार उत्पादनांमुळे कंपनीने त्यांना प्रशिक्षणासह नवीन पदार्थ बनवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली.

त्यानुसार त्यांनी लसूण लोणचे, लसूण चटणी, लिंबू-मिरची लोणचे आदी पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ५० किलोच्या ऑर्डर मिळाली. उत्पादनांची गुणवत्ता पसंत पडल्याने कंपनीतर्फे आता दर पंधरा दिवसाला ८०० किलोपर्यंत ऑर्डर मिळत आहे.

बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण उत्पादनाची ओळख तयार होण्यासाठी मनीषाताईंनी ‘महालक्ष्मी’ हा मसाल्याचा ब्रँड केला. मसाला निर्मितीसाठी केरळमधून लवंग, मिरी, दालचिनीची खरेदी केली जाते. त्यामुळे अस्सल सुगंध आणि चव येते. गुणवत्तेमुळे मसाले तयार करून घेण्यासाठी दूरवरून ग्राहक येतात.

वाजवी दरात विक्री करण्याचे तंत्र अवलंबल्याने ग्राहकांकडून मसाल्यास मागणी वाढत आहे. घरी येऊन मसाला खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बारामती, जेजुरी, इंदापूर, सासवड, पुणे, पारगाव, माळशिरस आदी भागांत मसाल्याचे ग्राहक आहेत.

त्यांना ठरवून दिलेल्या वेळेत मसाले पोहोचविण्यासाठी स्वतः आणि कुटुंबातील सदस्य तत्पर असतात. दर महिन्याला १०० ते १५० किलो मसाल्यांची विक्री होते. सरासरी खर्च वजा जाता चाळीस हजार रुपयांची उलाढाल होते.

प्रक्रिया उद्योगाच्या बरोबरीने मनीषाताई साडेतीन एकर शेतीमध्ये हंगामानुसार विविध प्रकारचा भाजीपाला, फुले तसेच चारा पिकांची लागवड करतात. तसेच शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. शेतीमध्येही त्यांनी प्रगतीची दिशा पकडली आहे.

Success Story
VNMKV, Parbhani : ‘वनामकृवि’त फळे, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

विविध प्रदर्शनातून विक्री

ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूह कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेशी जोडला असल्याने बारामती येथील ‘कृषिक-२०२३’ प्रदर्शन, उमेद अभियानाद्वारे पुणे विभागीय सरस विक्री प्रदर्शन, दख्खन जत्रा याठिकाणी मनिषाताई मसाल्याची विक्री करतात.

येत्या काळात श्रीनगर येथील लष्कराच्या कॅम्पमध्ये विविध प्रकारचे मसाले पाठविणार आहेत. ‘फार्म दीदी’ कंपनीला पुरविलेल्या पदार्थांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या यूएनडीपीकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. युनडीपीच्या प्रतिनिधींनी त्यांच्या युनिटची पाहणी करून संघर्षाची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचविली आहे.

संपर्क : मनीषा कामथे, ८७९६४१२८९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com