Dragon Fruit Farming Agrowon
यशोगाथा

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट ठरले आश्‍वासक

Fruit Crop Success Story : कायम प्रयोगांची धडपड करण्याची वृत्ती असलेल्या नितीन यांनी कमी देखभाल, कमी खर्चात शाश्‍वत उत्पन्न देऊ शकणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची निवड केली.

गणेश कोरे

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यातील शिवरी (ता. पुरंदर) येथील नितीन इंगळे यांची पाच एकर शेती आहे. त्यात ते भुईमूग, बाजरी, गाजर या हंगामी पिकांसह ऊस हे नगदी आणि शाश्‍वत ठरू शकणारे पीक घेतात. कायम प्रयोगशील राहणे, पीकपद्धतीत सुधारणा करून उत्पन्नाचे स्रोत वाढवत राहणे अशी त्यांची कायम धडपड असते. त्यातूनच त्यांनी फळप्रक्रिया उद्योगही उभारला आहे. शेतकऱ्यांकडून आंबा, पेरू खरेदी करून ते पल्प तसेच अन्य उत्पादने तयार करतात.

याच प्रयोगशील वृत्तीतून कमी पाणी, कमी देखभाल असलेल्या मात्र शाश्‍वत उत्पन्न देऊ शकणाऱ्या पिकाच्या शोधात ते होते. सोशल मीडिया, मित्रपरिवारातील चर्चा, बारामती कृषी विज्ञान केंद्र आदींच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट पिकाचा पर्याय पुढे आला. मग लागवड तंत्रज्ञानासह बाजारपेठेचा अभ्यास सुरू झाला. कोरोना काळात पिलीव (जि. सोलापूर) येथील अनुभवी ड्रॅगन फ्रूट उत्पादकांकडे भेट देऊन शेती समजून घेतली. पुणे बाजार समिती जवळ असल्याने तेथेही आवक, दर व आवकेविषयी माहिती घेतली.

लागवड व्यवस्थापन

सन २०२१ च्या सुमारास दीड एकरात लागवडीचे नियोजन झाले. जमिनीची मशागत करून १२ बाय आठ फूट अंतरावर खांब (पोल) रोवून घेतले. त्याभोवती गादीवाफे (बेड) तयार केले. त्यामुळे पावसाचे पाणी साठून न राहाता अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची सोय झाली. ठिबक सिंचन यंत्रणा बसवली. दीड एकरात सातशे पोल्स तर प्रति पोल चार रोपे यानुसार एकूण अठ्ठावीसशेपर्यंत रोपांची लागवड झाली. पोलच्या खड्ड्यांच्या भोवताली प्रत्येकी एक घमेले शेणखत आणि लेंडीखत यांचा वापर केला. आतून व बाहेरूनही आकर्षक लाल रंग असलेल्या वाणाची निवड केली.

फळाचा आकार मोठा, झाडांची वाढ चांगली व प्रतिकारक्षमता चांगली अशी या वाणाची वैशिष्ट्ये असल्याचे नितीन सांगतात. लागवडीनंतर ठिबकद्वारे नियमित पाणी देण्यात आले. तीन ते चार महिन्यांनी वेल वाढू लागल्यानंतर ते खांबावर व्यवस्थित चढविण्यात आले. त्यांची योग्य रीतीने बांधणी केली.

सहा महिन्यांमध्ये कोवळ्या फुटी सुरू झाल्यानंतर किडी-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांची फवारणी केली. उन्हाळ्यातील पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असून, १५ मार्चनंतर पाणी कमी कमी केले जाते. जास्त पाणी झाल्यास सनबर्नचा फटका झाडांना आणि नव्याने येणाऱ्या फुटव्यांना बसतो. परिणामी फुटवे, पाने पिवळी पडणे, सडणे असे प्रकार होतात. यासाठी संतुलित पाणी देण्याची गरज असते.

फळधारणा व उत्पादन

लागवडीच्या पहिल्या वर्षांनंतर फळांचे उत्पादन जेमतेम मिळाले. त्यानंतर झाडांची वाढ व वय वाढल्यानंतर २०२३ मध्ये दीड एकरात तीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळाले. त्या वेळी किलोला ८० रुपयांपासून १८२ रुपयांपर्यंत दर मिळाला. ए ग्रेडच्या फळांची संख्या चांगली असल्याने सरासरी दर १०० रुपयांच्या दरम्यान किंवा त्यापुढेच राहिला.

मागील वर्षी एकूण क्षेत्रातील उत्पादनात अजून वाढ होऊन १५ टनांच्या आसपास फळे मिळाली. त्यास ७० रुपयांपासून ते १४० रुपयांपर्यंत दर मिळाला. बहुतांश विक्री पुणे बाजार समितीत केली. तर बांधावर येऊनही काही व्यापाऱ्यांनी खरेदी केली. साधारण १५० ते २०० ग्रॅम तर कमाल ५०० ग्रॅमपर्यंत फळांचे वजन होते. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता दीड एकरांत काही लाखांचे समाधानकारक उत्पन्न मिळाल्याचे नितीन सांगतात. त्यांना ड्रॅगन फ्रूट शेतीतील सुरुवातीचा भांडवल खर्च सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत आला आहे.

मूल्यवर्धन ठरले यशस्वी

फळप्रक्रिया उद्योगात कार्यरत असल्याने नितीन यांनी मागीलवर्षी ड्रॅगन फ्रूटच्या फोडी अर्थात स्लाइस ‘फ्रोझन’ करण्याचा प्रयोग केला. प्रक्रिया उद्योगातील व्यावसायिकांकडून त्यास पसंती राहिली. किलोला १५० ते १८० रुपयांपर्यंत त्याला दर देऊ केल्याचे ते म्हणाले. यंदा ड्रॅगन फ्रूटला दर तुलनेने कमी होते. अशावेळी जॅम, जेली आदी प्रक्रिया तसेच निर्यात या पर्यायांचा प्रयत्न करणार आहे असेही नितीन म्हणाले. यंदा नव्याने एक एकरावर लागवड वाढवली आहे.

नितीन इंगळे ९६२३२८१०२१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT