
विजयसिंह काकडे, अमृत मोरडे, संग्राम चव्हाण
Agriculture Tips: ड्रॅगन फ्रूट लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि वातावरण इत्यादी घटकांचा योग्य अभ्यास करून अंतर निश्चित करावे. साधारणपणे ३ x २.५ मीटर, ३ x ३ मीटर अंतरावर लागवड करावी.
ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग कुळातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ पीक आहे. साल आणि गर यांच्या रंगांनुसार फळाचे विविध प्रकार पडतात. भारतामध्ये पांढरा गर आणि लाल साल असणाऱ्या प्रजातीची जास्त प्रमाणात लागवड आहे. त्याचबरोबर लाल गर व लाल साल आणि पांढरा गर व पिवळी साल या प्रकारांकडे सुद्धा शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
लागवड काळ्या, मुरमाड जमिनीत करता येते. पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून रोपांच्या खोडाभोवती जास्त प्रमाणात पाणी साठून राहणार नाही. जास्त पाणी साठल्याने खोड सडण्याचे प्रमाण वाढते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मातीचा सामू ५.५ ते ६.५ योग्य मानला जातो. काही प्रमाणात आम्लयुक्त जमिनीसुद्धा या फळपिकासाठी योग्य असतात.
जर जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी साठून राहिले तर फूल आणि फळांची गळ होते. या पिकासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. परंतु जास्तीत जास्त ४० अंश सेल्सिअस तापमानातही (थोड्या दिवसांकरिता) हे पीक तग धरू शकते. अति तापमान व सूर्यप्रकाश या पिकांस काही प्रमाणात हानिकारक ठरते, अशा परिस्थितीमध्ये सनबर्न आणि रोगाचे वाढते प्रमाण दिसून येते. यासाठी बागेमध्ये काही प्रमाणात सावली (२० ते ३० टक्के) ठेवल्याने फळझाडांचे संरक्षण करता येऊ शकते.
रोपवाटिका
रोपे बियांद्वारे किंवा कटींग द्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार केली जातात. यासाठी गडद हिरव्या रंगाची एक वर्ष जुनी फांदी निवडावी. हलक्या हिरव्या रंगाच्या फांद्यांना फूटवे थोडेसे उशिरा लागतात.
२० ते २५ सेंमी लांब आणि ५ ते ६ सेंमी जाडीची फांदी रोपे तयार करण्यासाठी वापरावी. यापेक्षा लहान फांद्या सुद्धा वापरल्या जाऊ शकतात परंतु जर रोपवाटिकेमध्ये खोड कूज रोगाचा प्रादुर्भाव झाला तर, लहान फांद्या पूर्णपणे काढून फेकून द्याव्या लागतात. योग्य लांबीच्या फांद्या वापरल्याने अधिक फुटवा व मुळांची वाढ चांगली होऊन उत्तम गुणवत्तेची रोपे मिळतात.
फांदीवर कोणत्याही प्रकारच्या रोगाची लक्षणे नसावीत. जेणेकरून नवीन बागेमध्ये रोगांचे संक्रमण होणार नाही याची खबरदारी घेता येते.
निवडलेल्या फांद्या ४ ते ५ दिवसांकरिता सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवल्याने कॅलसिंक व्यवस्थित होऊन रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. फांदी लावण्यापूर्वी बुरशीनाशकाच्या (कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ टक्के) द्रावणात बुडवून घ्यावे. रोपवाटिकेमध्ये पॉलीथिनच्या पिशवीमध्ये (१०x२५ सेंमी) तसेच गादी वाफा तयार करून रोपे तयार करता येतात.
रोपे बनवण्यासाठी ३ फूट रुंद आणि ०.५ ते १ फूट उंच असा गादी वाफा शेणखत मिसळून बनवून घ्यावा. त्यामध्ये एक ठिबक लॅटरल टाकावी. या गादी वाफ्यावर १५ ते २० सेंमी अंतरावर कटिंग लावावे. नियमित अंतराने पाणी द्यावे. गादी वाफ्यावर कटिंग लावल्याने मेहनत कमी होते, त्याबरोबर खर्च ही वाचतो. तयार रोपांचे १.५ ते २ महिन्यानंतर मुख्य जागी पुनर्रोपण करता येते.
रोपे तयार करण्याची जागा निवडताना जमिनीवर पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जिथे थोडीफार सावली असेल (२० ते ३० टक्के) अशी जागा निवडली तर फायदेशीर ठरते.
लावलेल्या फांद्यांना १५ ते २० दिवसामध्ये मुळे येतात. २० ते ३० दिवसांपासून फूटवे निघायला सुरुवात होते.
लागवडीचे तंत्र
लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व वातावरण इत्यादी घटकाचा योग्य अभ्यास करून अंतर निश्चित करावे. साधारणपणे ३ x २.५ मीटर, ३ x ३ मीटर अंतराची शिफारस केली आहे. योग्य अंतर निश्चित केल्याने झाडांची छाटणी, फळ तोडणी व अंतर मशागतीची कामे करणे सुलभ होते.
पिकाची पाण्याची आवश्यकता ही खूप कमी प्रमाणात आहे. पावसाळ्यामध्ये लागवड केल्यानंतर सहसा पाण्याची आवश्यकता लागत नाही. परंतु हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूमध्ये नियमित अंतराने गरजेनुसार पाणी द्यावे. परंतु पाण्याची मात्रा एका वेळेस खूप जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी. १००० ते १५०० लिटर्स प्रती चार रोपे पाण्याची आवश्यकता पहिल्या व दुसऱ्या वर्षी लागते.
योग्य वाढ झालेल्या बागेमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याचा ताण दिल्याने अधिक प्रमाणात फूलधारणा होण्यास मदत होते. फूल आणि फळ धारणा ही पावसांच्या महिन्यात होत असल्याने येथेही पाण्याची बचत होते आणि एकूण पाणी कमी प्रमाणात लागते. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बागेत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
सूक्ष्म सिंचन प्रणाली अतिशय फायदेशीर ठरते, कारण याची मुळे खूप जास्त खोलवर जात नाहीत. त्यामुळे या प्रणालीद्वारे पाण्याच्या पुरेपूर उपयोग होतो. पाण्याचा अपव्यय टाळला जातो.
खत व्यवस्थापन
पिकाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे या पिकास अधिक प्रमाणात खते एका वेळी देण्याचे टाळावे. लागवडीपूर्वी वाफे तयार करताना १० ते १५ किलो शेणखत प्रती चार रोपे आणि ५० ते १०० ग्रॅम डीएपी रोपांच्या चारही बाजूला एकसारखे जमिनीत मिसळावे. जमिनीच्या प्रकारानुसार खतांचे प्रमाण निश्चित करावे.
राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये खडकाळ जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी ५०० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश या प्रमाणात खतमात्रा चार भागांमध्ये वितरित करून पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी आणि ८०० ग्रॅम नत्र, ९०० ग्रॅम स्फुरद, ५५० ग्रॅम पालाश ही मात्रा सहा भागांमध्ये वितरित करून तिसऱ्या वर्षांपासून फळांची तोडणी झाल्या नंतर, फूल धारणेपूर्वी, फूल धारणेनंतर, फळ धारणेच्यावेळी व फळांच्या वाढीच्या वेळी द्यावी. योग्य वाढ झालेल्या झाडांना दरवर्षी १५-२० किलो शेणखत द्यावे.याचबरोबर मिश्र विद्राव्य खते सूक्ष्म प्रणाली मार्फत तसेच आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.
फळधारणा
साधारणतः १८ ते २४ महिन्यांच्या लागवडी नंतर फूल आणि फळ धारणा होण्यास सुरवात होते. याची फुले आकाराने मोठी, पांढऱ्या रंगाची, आणि संध्याकाळी-रात्री उमलणारी असतात. या पिकामध्ये विविध अंतराने फुले आढळून येतात. फुले येण्याची वेळ पावसावर अवलंबून असते, जसा पाऊस सुरू होईल तशी फुले उमलण्यास सुरवात होते.
जून पासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत फुले आढळून येतात. परागीकरणापासून साधारणपणे एक ते सव्वा महिन्यात फळ तोडण्यास तयार होते. या पिकामध्ये फळ धारणा होण्याकरिता प्रभावी परागीकरण होणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी रोपण करताना मिश्र प्रजाती एकत्रितपणे लागवड केल्याने फायदेशीर ठरू शकते. संध्याकाळी-रात्री फुले उमलत असल्याने वटवाघूळ, हॉक पतंग, आणि मधमाशी इत्यादी पासून मुख्यतः परागीकरण होते.
जातींची निवड
सद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध प्रकार हे सर्व बाहेरील देशांमधून आलेले आहेत. भारतामध्ये, पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल व पांढरा गर व पिवळी साल इत्यादी प्रकार लागवडीस उपयुक्त आहेत. या पिकाबाबत विविध कृषी संशोधन संस्थांमार्फत संशोधन चालू आहे. तसेच सध्या तरी, या फळपिकाच्या नोंदणीकृत तसेच स्थानिक जाती उपलब्ध नाहीत.
लागवडीची वेळ आणि पद्धत
मॉन्सूनपूर्व वेळ लागवडीसाठी योग्य मानली जाते परंतु पाण्याची सोय असल्यास ,अति उष्ण महिने वगळता वर्षभरात कोणत्याही महिन्यात लागवड करता येऊ शकते.
हे एक वेलवर्गीय फळ पीक असून पिकाच्या वाढीसाठी लागवडीपूर्वी आधार प्रणाली उभारावी लागते. यामध्ये आरसीसी सिमेंट किंवा लाकडी खांबांचा उपयोग केला जातो. परंतु या पिकाची उत्पादन क्षमता जवळपास २० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्यामुळे आरसीसी सिमेंटचे खांब वापरणे योग्य ठरते.
सिमेंट खांबाचे आकारमान
५ ते ६ फूट उंच
३.५-४ × ३.५-४ इंच (रुंद/जाड)
वजन ४०-४५ किलो
खांबाच्या टोकावर ८ ते १० एमएम जाडीचा नट असावा, जो प्लेट बसवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
प्लेटचे आकारमान
५०-६० × ५०-६० × ३-४ सेंमी (लांबी, रुंदी व जाडी)
गोलाचा व्यास १२-१५ सेंमी
प्लेटचे वजन २०-२५ किलो
रोप लागवडीपूर्वी सिमेंटचे खांब उभे करून घ्यावेत (३ ते ४ फूट जमिनीवर ठेवावेत) त्यानंतर शेणखत मिसळून (१०-१५ किलो प्रती रोप) वाफे बनवून घ्यावेत. नंतर एखादा किंवा दुसरा पाऊस पडल्यावर रोपांची लागवड करावी. रोपांची लागवड करताना, रोपे खांबाच्या जेवढ्या जवळ लावता येतील तेवढे जवळ लावावे. जेणेकरून नवीन फुटवा खांबाला योग्य रीतीने बांधता येईल. खांबाच्या चारही बाजूंना एक एक रोप लावावे, म्हणजेच ४ रोपे एका खांबालगत लावावीत.
विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६
(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.