
सागर कारंडे, डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. वनिता साळुंखे
Dragon Fruit Stem Canker Disease : ड्रॅगन फ्रूट पहिल्यांदा भारतात १९९० च्या दशकात आले. भारत सरकारने त्यास ‘कमलम’ हे नाव दिले आहे. महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, पुणे, नाशिक यांसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये त्याची लागवड झपाट्याने वाढत आहे. हे फळझाड कॅक्ट्सवर्गीय आणि काटक असले तरी अन्य फळपिकांप्रमाणे त्यामध्येही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.
ड्रॅगन फ्रूटवर फळे आणि फुलांवर विविध बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोग आढळून येतात. अलीकडे ड्रॅगन फ्रूटवर स्टेम कॅन्कर या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ४० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.
रोगाचे इंग्रजी नाव : स्टेम कॅन्कर
रोगाचे मराठी नाव ः खैऱ्या
रोगाचा प्रकार : बुरशीजन्य
बुरशीचे नाव : Neoscytalidium dimidiatum
ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅन्कर (खैऱ्या) या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची सुरुवात फांदीच्या (क्लॅडोड) किंवा फळाच्या पृष्ठभागावर होते. त्यानंतर त्या बुरशीचा पृष्ठभागावरील पेशींमध्ये थेट प्रवेश होतो. सुरवातीस फांदी (क्लॅडोड्स) किंवा फळावर लहान आकाराचे पिवळसर, केशरी ते तपकिरी ठिपके दिसून येतात. या ठिपक्याच्या मध्यभागी लहान केशरी रंग असतो. तो कालांतराने मोठ्या, बहिर्वक्र, केशरी ते लालसर - तपकिरी डागांमध्ये बदलत गोलाकार बनतो.
या ठिपक्याच्या बाहेरील कडा कधीकधी पिवळ्या रंगाने वेढलेल्या असतात. त्यानंतर बुरशीच्या लहान काळ्या पिक्निडिया तयार होतात. त्याचे रूपांतर फिकट पिवळ्या राखाडी मृत उतींमध्ये होते, पुढे ते अधिक कोरडे होतात. फांदीला (क्लॅडोड्ला) छिद्र पडते. यालाच ‘शॉट-होल’ म्हणून ओळखले जाते. अशा रोगग्रस्त फांद्यापासून पुढे मोठ्या प्रमाणात बीजाणू (कोनिडिया) पसरतात. त्यामुळे रोगाचा दुय्यम प्रसार होतो.
ही बुरशी विस्तृत प्रादुर्भावाची क्षमता प्रदर्शित करते. तिचा सुमारे १२६ विभिन्न वनस्पतींवर प्रादुर्भाव होत असल्याचे आढळले आहे. उदा. आंबा, ओक, बदाम, टोमॅटो इ.
आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सरासरी ६१.२३ टक्के आढळून आला. रोगाची तीव्रता सरासरी ३३. ६४ टक्के दिसून आली. ८० टक्क्यांपेक्षा अधिक तीव्रतेचा कॅन्कर दर्शविणारी झाडे पुनर्जीवित होणे शक्य नसते. कारण कॅन्करमध्ये विकसित होणाऱ्या डागांमुळे स्टेम कुजतच जातात.
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळेही कुजतात. अशा फळांचा गर खाण्यायोग्य राहत नाही. पर्यायाने असे फळ विक्रीसाठी अयोग्य मानले जाते. या रोगामुळे फळ उत्पादनात ४० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, तर फळाचे बाजार मूल्य ६० टक्क्यांपर्यंत कमी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाचे आयुष्य कमी होते.
या रोगास कारणीभूत असणारी बुरशीची प्रजाती ही उच्च-तापमानात तग धरून राहणारी आहे. रोग चक्र आणि बुरशीच्या अस्तित्वासाठी पाण्याची कमतरता, दुष्काळ आणि ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान हे अनुकूल असते. अशा विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीत हा रोग अत्यंत विनाशकारी ठरू शकतो.
स्टेम कॅन्करचा तीव्र प्रादुर्भाव सहसा उन्हाळ्यात होतो. कारण त्याच वेळी जास्त तापमानासोबतच पाण्याच्या ताणालाही पिकांना सामोरे जावे लागते. हवामान बदलामुळे या रोगाचा धोका वेगाने वाढत आहे. ड्रॅगन फ्रूटचा वाण, झाडाचे वय, वर्षाचा हंगाम, जैविक आणि अजैविक ताण यासारख्या घटकांवर रोगाच्या लक्षणांची तीव्रता आणि विविधता अवलंबून असते.
स्टेम कॅन्करची बुरशी जखमा आणि नैसर्गिक छिद्रांसह विविध माध्यमांद्वारे संक्रमित करू शकते. विशेषत: ड्रॅगन फळांमध्ये ॲप्रेसोरियाच्या निर्मितीद्वारे थेट प्रवेश करते. स्टेम कॅन्करचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाणे, लागवडीसाठी वापरले जाणारे रोगग्रस्त बेणे (क्लाडोड्स), माती, वारा, पाऊस आणि विविध कीटकांमुळे होऊ शकतो.
शिफारशीत अंतरावरच ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी.
लागवडीसाठी रोगविरहित बेणे (क्लॅडोड्स) वापरावे.
लागवड करण्यापूर्वी क्लेडोड्सवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
कॅन्कर रोगाच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी बागेची स्वच्छता हे मूलभूत तत्त्व आहे.
फळ काढणी हंगामानंतर बागेची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या (क्लॅडोड्स) काढून बीजाणूंचे स्रोत नष्ट करावेत.
या रोगासाठी लेबल क्लेम किंवा ॲग्रस्को शिफारस अद्याप उपलब्ध नसल्याचे आढळते. तथापि, संशोधकाच्या आचार्य पदवी संशोधनात पुढील बुरशीनाशके उपयुक्त आढळली आहेत. मात्र त्यांना अधिकृत शिफारस म्हणता येणार नाही.
प्रतिबंधात्मक फवारणी प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम किंवा
टेब्युकोनॅझोल (५० टक्के) अधिक ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन (२५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम.
- सागर कारंडे, ९५४५६७२२७५
(सागर कारंडे हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागात आचार्य पदवीचे विद्यार्थी असून, डॉ. आण्णासाहेब नवले हे विभागप्रमुख आहेत. डॉ. वनिता साळुंखे या बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (ICAR-NIASM) वरिष्ठ वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.