Dairy Products Agrowon
यशोगाथा

Dairy Products : दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतून प्रगतीची दिशा

Dairy Business : कोंढणपूर (ता.हवेली,जि.पुणे) येथील युवा शेतकरी संदीप काशिनाथ मुजुमले यांनी दोन म्हशींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय २०० म्हशी,५० गाईंपर्यंत वाढविला आहे. दूध प्रक्रिया करून पुणे शहरात स्वतःची डेअरीदेखील सुरू केली आहे.

गणेश कोरे

गणेश कोरे

Dairy Products Manufacturing : कोंढणपूर (ता.हवेली,जि.पुणे) येथील युवा शेतकरी संदीप काशिनाथ मुजुमले यांनी दोन म्हशींपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय २०० म्हशी,५० गाईंपर्यंत वाढविला आहे. दूध प्रक्रिया करून पुणे शहरात स्वतःची डेअरीदेखील सुरू केली आहे. येत्या काळात स्वतःचा आइस्क्रीम ब्रॅण्ड विकसित करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

संदीप काशिनाथ मुजुमले यांची कोंढणपूर (ता.हवेली,जि.पुणे) परिसरात ३५ एकर शेती आहे. कोंढणपूर शिवार डोंगराळ असल्याने शेती देखील एकसलग नव्हती. पूर्वी पारंपरिक पद्धतीनेच भात,ज्वारी लागवड केली जायची. त्यामुळे शेतीला दूध व्यवसायाची जोड देण्यासाठी संदीप यांनी नियोजन सुरू केले होते. पशूपालनासाठी त्यांना हिंदकेसरी योगेश दोडके आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी मार्गदर्शन केले.

त्यानुसार संदीप मुजुमले यांनी २०१३ मध्ये घरच्या दोन म्हशी, तसेच सहा म्हशी आणि दहा जर्सी गाई विकत घेतल्या. दरवर्षी टप्याटप्याने जातिवंत दुधाळ म्हशी, गाईंची खरेदी केली. याचबरोबरीने शेती बागायती करण्यास सुरवात केली. त्यासाठी विहीर खोदून शेतीमध्ये पाइपलाइन केली. सध्या १५ एकरात घास, मका,ज्वारी, विविध चारा पिके आणि १५ एकरात भात,बटाटा,ऊस, वांगी,टोमॅटो या पिकांची लागवड असते.

गाई,म्हशींचे व्यवस्थापन
सध्या मुजुमले यांच्याकडे १९३ मुऱ्हा म्हशी आणि ५० जर्सी गाई, १० गीर आणि दोन खिलार गाई आहेत. गाई,म्हशींसाठी मुजुमले यांनी २०० फूट बाय ४० फूट आकारमानाचे चार गोठे बांधले आहेत. गोठ्यामध्ये हेड टू हेड पद्धतीने गाई,म्हशी बांधल्या जातात. या प्रत्येक गव्हाणीला पाण्याची पाइपलाइन केली आहे. गव्हाणीत चारा, पशूखाद्य खाऊन झाल्यानंतर म्हशींना पिण्यासाठी पाइपद्वारे पाणी सोडले जाते.
१) आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर सरकी पेंड आणि पशुखाद्याचा वापर. आंबोणामध्ये मका चुणी, हरभरा, गव्हाचा भरडा, तुरीचा भुसा, गूळ आणि डाळीचे मिश्रण केले जाते. एका गाई, म्हशीला साधारण ५ किलो सकाळी आणि ५ किलो संध्याकाळी दूध काढण्यापूर्वी आंबोण दिले जाते. याच बरोबरीने शिफारशीनुसार खनिज मिश्रण दिले जाते.
२) नियमितपणे पशूतज्ज्ञ गाई,म्हशींची तपासणी. याचबरोबरीने गोठ्यातील कामगारांना पशू औषधोपचाराबाबत मार्गदर्शन.
३) गाई,म्हशींच्या व्यवस्थापनासाठी बारा कामगार.
४) पहाटे अडीच ते साडेतीन पर्यंत गोठ्याची स्वच्छता. त्यानंतर सर्व म्हशी,गाईंचे सड निर्जंतुकीकरण, चार वाजता कडबा कुट्टी, आंबोण दिले जाते.
५) चार ते सात वाजेपर्यंत धारा काढल्या जातात. सात वाजता गोठ्याची स्वच्छता.
६) दुपारी अडीच वाजता गोठ्याची स्वच्छता. चार वाजता पशुखाद्य, चारा दिल्यानंतर धारा काढल्या जातात.
७) सायंकाळी सात पर्यंत दूध काढून गोठा स्वच्छता.

दरवर्षी ५०० ट्रक शेणखत ः
मुजुमले यांच्या गोठ्यामध्ये दरवर्षी सुमारे ५०० ट्रक शेणखत निर्मिती होते. यापैकी ५० ट्रक शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरतात. उर्वरित शेणखत हे सातारा येथील खत उद्योजकांना दिले जाते. तीन ब्रास ट्रकमधील शेणखताची १० हजार रुपये दराने विक्री होते. यातून दरवर्षी साधारण १२ ते १५ लाखांचे उत्पन्न मिळते.

दुधाची विक्री व्यवस्था ः
- सध्या १५० म्हशी आणि ३० गायी दुधात आहेत. सकाळ, संध्याकाळ मिळून १,१०० लिटर दूध संकलन.
- घरीच ६०० लिटर दुधाचे एक लिटर पॅकिंग. उर्वरित ५०० लिटर दूध कोथरूड येथील डेअरीमध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी पाठविले जाते.
-पुणे शहरात प्रति लिटर ७० रुपये म्हशीचे दूध आणि, ५५ रुपये गाईच्या दुधाची विक्री.

श्री तुकाईमाता डेअरीची सुरूवात
साधारणपणे २०१८ पासून म्हशींची संख्या टप्याटप्याने वाढल्याने दूध उत्पादनात देखील चांगली वाढ झाली. केवळ किरकोळ दूध विक्रीपेक्षा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीचा विचार करून संदीप यांनी २०१८ मध्ये पुणे शहरातील कोथरूड परिसरात श्री तुकाईमाता डेअरी सुरू केली. डेअरीच्या माध्यमातून दुधाबरोबरच दही, तूप,लोणी, खवा, चक्का, पनीर निर्मिती करून विक्री केली जाते. यासाठी स्वतंत्र यंत्रणा खरेदी केली आहे. या डेअरीमधून दररोज १०० किलो दही, २५ किलो पनीर,५० किलो तूप,२५ किलो लोणी विक्री होते. सणाच्या काळाच चक्का विक्री केली जाते.
दुग्धजन्य उत्पादनांसाठी डेअरीवर चार कामगार आहेत. डेअरीचे व्यवस्थापन संदीप तसेच बंधू सागर आणि अतुल हे पाहतात. संदीप यांनी येत्या काळात प्रक्रिया उद्योगवाढीसाठी ५०० म्हशींचे नियोजन केले आहे. याचबरोबरीने स्वतःच्या आइस्क्रीम ब्रॅण्ड विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२१ जणांचे एकत्र कुटुंब
संदीप यांचे एकत्र कुटुंब आहे. कुटुंबात २१ सदस्य आहेत. संदीप यांचे वडील काशिनाथ आणि चुलते ज्ञानेश्वर तसेच आई सौ. लक्ष्मी, काकू सौ. पार्वती यांच्याकडे शेती आणि जनावरांच्या गोठ्याच्या नियोजनाची जबाबदारी आहे. संदीप यांच्या पत्नी सौ.अश्विनी आणि वहिनी सौ.स्वाती,सौ. कोमल यांच्याकडे दूध पॅकिंगची जबाबदारी आहे. स्वतः संदीप आणि त्यांचे बंधू अतुल, सागर हे दूध विक्री, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि डेअरीचे व्यवस्थापन पाहतात. एकत्र कुटुंबामुळे शेती आणि दूग्ध व्यवसायामध्ये चांगली प्रगती करता आली,असे संदीप आवर्जून सांगतात.

संपर्क ः संदीप मुजुमले, ९८९०१४६३३३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT