Dairy Business Agrowon
यशोगाथा

Dairy Business : चिकाटी, प्रतिकूलतेतून विस्तारलेला दुग्ध व्यवसाय

नगर जिल्ह्यात निंबोडी (ता. पाथर्डी) येथील भापसे कुटुंबाने दुष्काळी भागात चिकाटी व प्रतिकूलतेत समस्यांचा सामना करून दुग्ध व्यवसाय (Dairy Business) टिकवला. एकोप्यातून ३० गायी व दररोज १७० लिटरपर्यंत दूध संकलनापर्यंत व्यवसाय (Milk Collection Business) विस्तार केला. मुरघास निर्मिती (Silage Production) व शेततळ्याद्वारे चारा-पाणीटंचाईवर (Water Shortage) मात केली. या व्यवसायातून एकूण शेती व कौटुंबिक प्रगती साधून हा परिवार सुखी समाधानी झाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर जिल्ह्यात निंबोडी येथील बाजीराव भापसे यांना गणेश व दादासाहेब ही दोन मुले. बाजीराव यांनी पैठण (जि. औरंगाबाद) येथे काही वर्षे सुरक्षारक्षक म्हणून काम केले. सन २००५ मध्ये दोघे बंधू सैन्य दलात भरती झाले. गणेश यांनी २०११ पर्यंत जम्मू-काश्मीर भागात नोकरी केली. मात्र घरगुती कारण व शेतीसाठी त्यांना गावी परतणे भाग पडले. दादासाहेब सध्या सैन्यदलात बडोदा येथे कार्यरत आहेत. गणेश पूर्णवेळ शेती व दुग्ध व्यवसाय (Dairy Business) समर्थपणे सांभाळत आहेत. एका गायीपासून सुरू केलेला आता चांगलाच विस्तारला आहे. त्यांना वडील बाजीराव व कुटुंबातील सर्व सदस्यांची मोठी मदत होते.

पशुपालनातील धडपड

नगर जिल्ह्यासह राज्यात २००२ मध्ये दुष्काळ पडला. निंबोडी परिसर तसाही दुष्काळी होता. त्या वेळी शासनाने जनावरांची छावणी सुरू केली. भापसे यांच्याकडे एक-दोन देशी जनावरे होती. छावणी सुरू झाल्यावर संधी समजून त्यांनी संकरित (एचएफ) गाय खरेदी केली. चार महिन्यांनंतर पुन्हा एक गाय घेतली. भाच्याची ही धडपड पाहून ढवळेवाडी (ता. पाथर्डी) येथील मामा विष्णू चितळे यांनी तीन कालवडी भेट दिल्या. सन २००५ ते २०११ या काळात गणेश सैन्यदलात नोकरीस असल्याने वडिलांनी दुग्ध व्यवसाय सांभाळला.

सन २०१२ पर्यत गायींची संख्या आठपर्यंत झाली. त्या वर्षीही दुष्काळ पडला. जनावरांच्या छावण्या पुन्हा सुरू झाल्या. त्या वेळीही आपल्याकडील गायींचा सांभाळ सुरू ठेवताना तीन गायी खरेदी केल्या. दुष्काळ जणू या कुटुंबाला व्यवसाय वाढीसाठी संधीच देत होते. कालवडींची पैदास, चांगल्या प्रकारे जतन व उत्तम गोठा व्यवनस्थापनातून आज २० गायी, १० मोठ्या कालवडी व सहा वासरे असे पशुधन तयार झाले आहे.

व्यवस्थापन

-दिवसाची सुरुवात पहाटे चार-साडेचार वाजता. प्रत्येक गायीला दररोज पंचवीस ते तीस किलो चारा.

त्यात बारा किलो मुरघास, चार किलो भुसा, दहा किलो गवत व अन्य हिरवा चारा.

-दूध काढणीनंतर गायींना पाणी, गोठ्याची साफसफाई. सायंकाळी चार वाजता पुन्हा हीच प्रक्रिया.

-चौदा वर्षांपासून ‘मिल्किंग मशिन’चा वापर होतो.

-गोठ्याची उभारणी व विकास टप्प्याटप्प्याने. गोमूत्र व गोठा स्वच्छतेतून उपलब्ध होणारे शेणपाणी साठवण्यासाठी हौद. त्याचा वापर शेतीसाठी.

-डॉ. . शरद शिंदे व सुयोग बेहळे यांचे मार्गदर्शन.

दूध संकलन व विक्री

सध्या दररोजचे दूध संकलन १७० लिटरच्या दरम्यान पोहोचले आहे. गणेश यांनी प्रभात डेअरीच्या दूध संकलनाची जबाबदारीही स्वीकारली असल्याचा फायदा होत आहे. सध्या दुधाला ३७ रुपयांपर्यंत प्रति लिटरचा दर मिळतो. एक काळ असाही आला की ८० हजारांचे कर्ज घेऊन गाय घेतली आणि काही दिवसांतच लॉकडाउन समस्येला सामोरे जावे लागले. त्याचा मोठा आर्थिक फटका बसला. मात्र त्यावर मात करत व चिकाटीतून व्यवसाय सुरू ठेवला.

मुरघासातून चाराटंचाईवर मात

भापसे कुटुंब सहा वर्षांपासून मुरघास निर्मितीत आहे. दरवर्षी १५० टन मुरघास उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी प्रत्येकी ७५ टन क्षमतेचे दोन हौद बांधले आहेत. दरवर्षी ७ ते ८ एकरांत जूनमध्ये मका घेण्यात येतो. गणेश यांनी या भागात सर्वात प्रथम कृषी विभागाच्या मदतीने तीन वर्षे हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादनाचा प्रयोग केला. दर दिवसाला २१० किलो चारा उत्पादित व्हायचा. मक्याचे दर वाढल्यानंतर २०१९ पासून प्रयोग थांबवला. सन २०१८ मध्येही दुष्काळ पडला. त्या वेळीही जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या. मात्र मुरघासामुळे गायी छावण्यांमध्ये नेण्याची गरज भासली नाही.

सेंद्रिय खतांची उपलब्धता

भापसे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती होती. गणेश व दादासाहेब या भावंडांनी शेती, दुग्ध व्यवसाय व अन्य बाबींतून मिळालेल्या उत्पन्नातून सुमारे १२ शेती टप्प्याटप्प्याने खरेदी केली. पूर्वी ते पारंपरिक पिके घेत. सन २०११ मध्ये साडेतीन एकरांवर डाळिंब लागवड केली. चाऱ्यासाठी दीड एकरांवर गिन्नी गवत लावले. शेणखत उपलब्ध होऊ लागले तसा शेतीत त्याचा वापर वाढवला. आता पंधरा ते वीस टक्के रासायनिक तर उर्वरित सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन होते. डाळिंबावरील तेलकट डाग, मर आदी रोगांचे प्रमाण कमी झाले आहे. फळांचा दर्जा, टिकवणक्षमता वाढली आहे.

अर्ध्या एकरावर शेततलाव

सिंचनासाठी चार विहिरी आहेत. तीन किलोमीटरच्या परिघात एकूण १५ एकर जमीन आहे. त्या सर्व बाजूला पाणी पोचेल अशी व्यवस्था केली आहे. विहीरी असल्या तरी या भागात उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांना २००२, २०१२, २०१८ च्या दुष्काळात फळबागा काढाव्या लागल्या. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन भापसे यांनी २०१५ मध्ये स्वखर्चाने अर्ध्या एकरावर शेततलाव उभारला आहे. त्याचा फायदाही होत आहे.

संपर्क ः गणेश भापसे, ८४५९४८०६६२, ९६५७६१६००३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT