Pomegranate Farming Agrowon
यशोगाथा

Pomegranate Farming : गुणवत्तापूर्ण, निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात सातत्य

मुकुंद पिंगळे

Agriculture Success Story : डाळिंब क्षेत्रामध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव २०१३ नंतर झपाट्याने वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. मात्र उत्पादकता व दरांमुळे डाळिंब शेती फायदेशीर ठरल्याने कसमादे भागातील काही शेतकऱ्यांनी आजही बागांचे क्षेत्र टिकवून ठेवले आहे. या शेतकऱ्यांसमोर वातावरणातील बदल, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, जमीन व पीक आरोग्य संबंधी शास्त्रोक्त माहितीचा अभाव अशा विविध समस्या होत्या. मात्र यावर मात करीत गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनाचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची प्रयोगशीलता, कामांचे काटेकर नियोजन आणि कमी खर्चात केलेले हंगामी व्यवस्थापन या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. मालेगाव, सटाणा, देवळासह लगतच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अनेक शेतकरी एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड-रोग व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करत आहेत. रासायनिक खते, कीडनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय व जैविक निविष्ठांच्या अधिक वापरावर भर देत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीस मदत झाली आहे.

Chart

डाळिंब उत्पादक मृग, हस्त आणि आंबिया या तीनही हंगामांत उत्पादन घेतात. गेल्या काही वर्षांत रासायनिक निविष्ठांच्या अतिवापरामुळे प्रतिरोधक क्षमता कमी होऊन कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे उत्पादन घटीसह गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत डाळिंब क्षेत्र झपाट्याने कमी झाले.

प्रयोगशील शेतकऱ्यांनी या मागील कारणांचा मागोवा घेत समस्यांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्म अभ्यास केला. भारतीय कृषी संशोधन केंद्राचे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, केगाव (जि. सोलापूर), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब संशोधन व प्रसार केंद्र, लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) यांच्या शिफारशी आणि तंत्र शेतकऱ्यांनी अभ्यासले. त्यातून उत्पादन व गुणवत्तेत वाढ मिळविण्यासह तेलकट डाग रोग ही समस्या कमी करण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. त्यातून दर्जेदार डाळिंब उत्पादन घेत उत्पन्न वाढ साधली आहे.

जमीन सुपीकतेवर भर

रासायनिक खते आणि तणनाशकांच्या बेसुमार वापरामुळे मातीतील उपयुक्त जैव घटकांना अनुकूल वातावरण व खाद्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे गुणन होत नव्हते. परिणामी क्रयशक्ती वापरात येत नव्हती. आता जमिनीचे आरोग्य सुधारल्याने उपयुक्त जिवाणूंना अनुकूल वातावरण मिळत आहे. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढीस फायदा झाला आहे. शिवाय जिवाणूंचे गुणन होऊन सूत्रकृमी व मर नियंत्रण होत आहे. पूर्वी तणनाशक फवारणीमुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र अलीकडे तणनाशकांचा वापर कमी करून ब्रश कटरने तणनियंत्रण करून ते शेतात गाडले जात आहे. त्याचाही फायदा होत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडून जैविक खते व नियंत्रकांचा वापर वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांकडील शेतजमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब, मातीची भौतिक संरचना आणि पोत सुधारण्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची कार्यक्षमता व झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. त्याचा फायदा तेलकट डाग रोग नियंत्रणात ठेवण्यात झाला असल्याचे डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्राचे (लखमापूर, जि. नाशिक) प्रमुख डॉ. सचिन हिरे यांनी सांगितले.

वाफसा अवस्था तपासूनच सिंचन

जमिनीचा प्रकार व झाडांच्या गरजेनुसार सिंचन करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा अवलंब होत आहे. ठिबक संच व ड्रीपर यांची खोडापासून २.५ ते ३ फूट अंतरावर बांधणी केली आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सोबतच वाफसा स्थितीनुसार पिकास सिंचन केल्यामुळे पाण्याची बचत होत आहे.

मृदा आरोग्य सुधारण्याकडे लक्ष

पावसाळ्यात डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग रोग, मररोग, सूत्रकृमी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. नियंत्रणासाठी बागेच्या विश्रांती काळात खोड धुणे, अन्नद्रव्ये व्यवस्थापन असे महत्त्वपूर्ण पर्याय शेतकरी अमलात आणतात. मातीतील सेंद्रिय व जैविक घटकांचे प्रमाण, भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म वाढविण्यावर भर दिला जातो. शेतातील टाकाऊ सेंद्रिय घटक बागेबाहेर न टाकता बागेतच कुजविण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. यासह रासायनिक खतांचा वापर कमी करून शेणखतासह बोनमिल, शेंगदाणा पेंड, एरंडी पेंड यांच्या वापरावर भर दिला जातो. सेंद्रिय खतांबरोबरच, जैविक (बायो) फॉर्म्यूलेशन वापर केल्याने मर रोग आणि सूत्रकृमी प्रादुर्भाव कमी करण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले आहे. मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी कंपोस्ट खतांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. माती परिक्षणानुसार नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा केला जातो. या माध्यमातून रोपांची वाढ, उत्पादन आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी फायदा होत असल्याचे सातमाने (ता. मालेगाव) येथील प्रगतिशील डाळिंब उत्पादक रवींद्र पवार यांनी सांगितले.

नियोजनातील मुख्य बाबी

विश्रांती काळात अन्नद्रव्यांचा साठा होण्यासाठी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा.

सूत्रकृमी नियंत्रणासाठी वरखतांसोबत ठिबकमधून जिवाणू खते, निंबोळी पेंड वापर.

छाटणीनंतर बागेतील स्वच्छतेकडे विशेष लक्ष.

मधमाश्यांची संख्या वाढविण्यासाठी रसायनांचा मर्यादित वापर.

बागेत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पाचट, गवत यांचे आच्छादन.

फळांना चकाकी व आकर्षकपणा येण्यासाठी जैविक निविष्ठांचा अधिक वापर.

गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड, मळी आदींच्या वापरातून झाडे सशक्त होऊन गुणवत्तापूर्ण फळधारणा.

ट्रायकोडर्मा, सुडोमोनास बॅसिलस इत्यादींचा संतुलित वापर.

ट्रायकोडर्मा मित्रबुरशी वाढविण्यावर भर.

हवामान बदलानुसार रोगाची शक्यता व प्रादुर्भाव ओळखून त्यानंतर शिफारशीत घटकांचा वापर.

फवारणीसाठी आवश्यक पीएच, टीडीएस नियंत्रित पाण्याचा वापर.

छाटणीनंतर रोगग्रस्त पाने, फांद्या, फळे, फुले आदी पीक अवशेष जाळून नष्ट करण्यावर भर.

तापमान वाढ, अवकाळी पाऊस, गारपिटीपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी ॲन्टी-हेलनेट कव्हर (आच्छादन) तंत्रज्ञानाचा वापर.

रवींद्र पवार ९८२३०३३६००

तेलकट डाग रोग या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले. शेणस्लरी, जैविक निविष्ठांच्या वापरावर अधिक भर दिल्यामुळे झाड सशक्त होऊन रोग प्रतिकारक क्षमता वाढली. काही प्रमाणात तेलकट डाग रोग आहे. मात्र जागेवर नियंत्रण करण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर हे यातील बलस्थान आहे.
डॉ. सचिन हिरे, ७६९८५३६८७३, प्रमुख, डाळिंब संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Management : भातावरील कडाकरपा रोगाचे व्यवस्थापन

Silk production : पंजाब स्वत:चा रेशीम ब्रँड बाजारात आणणार; रेशीम दिनानिमित्त लाँच केला 'लोगो'

Fish Conservation : तलाव, मत्स्य संवर्धनासाठी महिला गटांचा पुढाकार

Bird Conservation : पर्यावरण, धनेश पक्षी संवर्धनाचा ‘संकल्प’

Weekly Weather : राज्यात ईशान्य मॉन्सून दाखल

SCROLL FOR NEXT