Agriculture Success Story : सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सांगोल्यापासून ३६ किलोमीटरवर डोंगराच्या कुशीत खडकाळ माळरानावर गौडवाडी हे सुमारे ३२०० लोकसंख्येचे गाव वसले आहे. सातत्याने प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि दुष्काळ झेलणाऱ्या या गावात ज्वारी, बाजरी, खपली गव्हासारख्या पारंपरिक पिकांशिवाय फारशी शेती नव्हती.
या गावाशेजारीच बुद्धेहाळ गाव आहे. येथे १९३२ मध्ये बुद्धेहाळ तलाव हा मध्यम प्रकल्प झाला, त्यासाठी गौडवाडीतील ६४० हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. पुन्हा १०५ हेक्टर जमीन वनविभागाने अधिग्रहित केली. त्यामुळे गावातील बहुतांश शेतकरी अल्प आणि अत्यल्पभूधारक बनले. गावालगत तलाव होऊनही वारंवारच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होतच होती. परिणामी, गावातून मुंबईत गोदीत हमाली आणि कोल्हापूर-सांगली भागात ऊसतोडीसाठी स्थलांतर होऊ लागले.
...आणि गाव बदलू लागले
सन १९८१ च्या सुमारास सांगोला तालुक्यात डाळिंब लागवडीला सुरुवात झाली. गौडवाडीनेही त्याचा आदर्श घेतला. काही शेतकऱ्यांना यश मिळाले तर काहींना अपयश. पण गावाने डाळिंबाची पाठ काही सोडली नाही. सन २००० नंतर चित्र अधिक वेगाने बदलले. डाळिंबाच्या क्षेत्रवाढीबरोबरच एकरी उत्पादकतेत आणि उत्पन्नातही वाढ होत गेली. शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला.
दरम्यान, सुमारे आठ वर्षांपूर्वी गावातील तरुण पिढी गटशेतीच्या माध्यमातून अधिक सक्रिय झाली.यात नाना माळी, कल्लाप्पा गडदे, शिवाजी हिप्परकर, अण्णासाहेब गडदे, पिंटू माळी, बजरंग हिप्परकर आदींचा पुढाकार राहिला. त्यांनी गटशेतीसाठी अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कृषी सहायक मयूर माळी यांच्या मार्गदर्शनाचीही जोड मिळाली.
निर्यातक्षम उत्पादन
सुरुवातीला अनुभव नसल्याने डाळिंबाची गुणवत्ता वाढीस लागली नव्हती. त्यामुळे किलोला १५ ते २० रुपये दरांवरच समाधान मानावे लागे. आज शेतकरी गुणवत्तेवर विशेष लक्ष देतात.त्यामुळेच स्थानिक भागासह, परराज्यांतील व्यापाऱ्यांची गौडवाडीच्या डाळिंबाला आवर्जून पसंती मिळते. युरोप, अमेरिका, थायलंड, मलेशिया आणि बांगलादेशात इथली डाळिंबे निर्यात होऊ लागली आहेत.
सध्या गावातील एकूण उत्पादनापैकी ६० टक्के निर्यात होते. स्थानिक बाजारपेठेत किलोला ६० ते ९० रुपये, तर निर्यातीसाठी १०० ते १५० रुपये किंवा त्याहून अधिक दर मिळतो. संपूर्ण जिल्ह्यात डाळिंब उत्पादनातील आघाडीवरील गाव म्हणून गौडवाडीचा लौकिक वाढला आहे. म्हणूनच राज्याचे तत्कालीन कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, तत्कालीन कृषी संचालक विकास पाटील यांनी भेट देत डाळिंब उत्पादकांशी संवाद साधला आहे.
शेतकऱ्यांवरील गुरुकृपा
गावातील शेतकऱ्यांनी गुरुकृपा शेतकरी गट तयार केला आहे. यात मृग, हस्त आणि आंबियाअसे बहरनिहाय शेतकऱ्यांचे विभाग व व्हॅाटस ॲप ग्रुप तयार केले आहेत. त्यावर लागवडीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व मार्गदर्शन केले जाते. गटातर्फे कृषी सेवा केंद्रही सुरु केल्याने मार्गदर्शनासह खते-कीडनाशकेही मिळू लागली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गटातील सदस्यांना एकाच ठिकाणी भेटण्याची हक्काची जागा या निमित्ताने तयार झाली.
गावाची आजची ओळख
साडेचारशेहून अधिक डाळिंब उत्पादक. ११२५ एकरपर्यंत क्षेत्र. जवळपास सर्व क्षेत्र ठिबकवर.
दररोज ६०० पुरुष आणि महिला मजुरांना मिळाले काम. परिसरातील १०-१५ खेड्यांमधून मजूर येथे येतात. एकेकाळी सर्वाधिक मजूर असणाऱ्या या गावाने अन्य गावांसाठी निर्माण केला रोजगार.
शेतकरी घेतात एकरी सरासरी ८ ते १० टनांपर्यंत उत्पादन. काही शेतकरी १५ ते १८ टनांपर्यंतही पोहोचले आहेत. बहुतेक उत्पादन ‘रेसिड्यू फ्री’. शेण, गोमूत्रासाठी प्रत्येकाकडे एक ते दोन खिलार गायी. त्याद्वारे जिवामृत स्लरीचा आवर्जून वापर. त्यासाठी खास ब्लोअर्सची सुविधा.
पिन होल बोरर ही शेतकऱ्यांची समस्या. त्याच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला डाळिंबाचे खोड धुण्याचे सामाईक नियोजन.
''सनबर्न’ आणि गारपिटीसारख्या आपत्तीपासून संरक्षणासाठी क्रॉप कव्हरसारख्या तंत्राचा वापर.
या पिकातून तयार झाली सुमारे ७० कोटी उलाढालीची क्षमता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.