Coconut Processing Products and Dhananjay Rane Agrowon
यशोगाथा

Processing Industry : प्रक्रिया उद्योगातील ‘कोकनट मास्टर’

Coconut Processing Products : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडुर (ता. मालवण) येथील धनंजय सतीश राणे या केमिकल इंजिनिअरने नारळापासून तेल, पावडर, तुकडा, वडी आणि शोभिवंत वस्तूंचा ‘कोकोनट मास्टर’ ब्रॅण्ड तयार करीत राज्यभर उत्पादनांना बाजारपेठ मिळविली.

एकनाथ पवार

Coconut Master Brand Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये नारळ लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील नारळाला बाजारपेठांमध्ये चांगली मागणी असते. पेंडुर हे गाव मालवण कट्टा येथून तीन किलोमीटरवर आहे. या गावशिवारात नारळ, सुपारी, आंबा, काजूची व्यावसायिक लागवड आहे. या गावातील धनंजय राणे हे प्रयोगशील कृषी उद्योजक आहेत.

केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनुभवासाठी दोन वर्षे रत्नागिरी येथील एका कंपनीमध्ये नोकरी केली. परंतु फार काळ नोकरीत न रमता स्वतःच्या व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्धार केला.

कोकणातील नव उद्योजक काजू किंवा आंबा प्रकिया उद्योगात उतरतात. परंतु राणे यांनी या भागातील नारळ लागवडीचे क्षेत्र आणि त्यातील प्रक्रिया उद्योगाची संधी लक्षात घेतली. कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये जाऊन त्यांनी नारळ प्रक्रिया प्रकल्पांना भेटी दिल्या, उत्पादनांचा अभ्यास केला. तेथील तेल, काथ्या उद्योगांसह विविध प्रक्रिया प्रकल्प पाहिल्यानंतर स्वतःच्या गावी नारळ प्रक्रिया उद्योगाचा निर्णय घेतला.

प्रक्रिया उद्योगाला सुरवात

धनंजय राणे यांनी सुरुवातीला घरगुती स्तरावर साध्या पद्धतीने नारळ प्रक्रिया उद्योगाचा श्रीगणेशा केला. पहिल्या टप्यात मोठी गुंतवणूक न करता घरगुती पद्धतीने तेल, नारळ वडी, कीस निर्मितीस सुरुवात केली. प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा कुडाळ येथेच तयार करून घेतल्या. पहिली दोन वर्षे घरगुती पद्धतीने व्यवसाय सुरू होता. या कालावधीत बाजारपेठेत वेगवेगळे अनुभव त्यांना आले.

अनेक व्यापाऱ्यांनी उत्पादने घेण्यास नकार दिला. खोबऱ्यापासून तयार केलेली उत्पादने जास्त काळ टिकत नाही असे प्रत्येकाचे मत होते. प्रत्येक व्यापाऱ्याला उत्पादनाची गुणवत्ता पटवून द्यावी लागत होते. एवढेच नाही तर माल खराब झाला तर परत घेतला जाईल, माल विक्री झाल्यानंतर रक्कम द्या असे वेगवेगळे फंडे व्यवसाय वाढीसाठी वापरले.

ना नफा- ना तोटा याच धोरणाने दोन वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध बाजारपेठांत जाऊन उत्पादन विक्रीला सुरुवात केली. हळूहळू चांगला प्रतिसाद मिळाल्याने बाजारपेठेत जम बसला. खोबरा उत्पादने काही काळ चांगल्या पद्धतीने टिकतात, हे देखील व्यापाऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे विविध उत्पादनांना मागणी वाढू लागली. त्यानंतर पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय राणे यांनी घेतला.

दोन वर्षांच्या अनुभवानंतर पेंडुर येथे राणे यांनी प्रकिया उद्योगाचा विस्तार केला. या ठिकाणी मोठी शेड उभारून त्यामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या आधुनिक यंत्रणा बसविल्या. हा नवीन प्रकल्प सुरू असताना काळसे येथील घरगुती स्तरावरील प्रकल्प सुरू ठेवला होता. कोकणात नारळ खरेदी-विक्री नगावर होत होते.

परंतु राणे यांनी केरळ, कर्नाटक प्रमाणे किलोवर नारळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या भूमिकेला शेतकऱ्यांकडून सुरुवातीला संथ प्रतिसाद मिळाला, परंतु त्यानंतर हळूहळू शेतकऱ्यांना राणे यांची भूमिका पटली.

नारळ प्रक्रिया उद्योगामध्ये धनंजय यांना पत्नी सौ. श्रद्धा, आई सौ. सुप्रिया, वडील सतीश आणि भाऊ सिद्धेश यांची चांगली साथ मिळाली आहे. प्रकिया उद्योगात धनंजय यांनी १० महिला, २ पुरुष कामगारांना बारमाही रोजगार दिला आहे.

उद्योगासाठी शेड आणि यंत्रणा

२०१६ मध्ये मुद्रा योजनेमध्ये ५ लाखांचे कर्ज. यातून दोन इलेक्ट्रिकल ड्रायर, खोबरा किसणी यंत्राची खरेदी.

२०१८ मध्ये स्वगुंतवणुकीतून पेंडुर येथे ४ हजार स्क्वेअर फूट इमारत.

स्वगुंतवणुकीतून तीन इलेक्ट्रिक ड्रायर, चार वूड फायर, एक किसणी यंत्र, तेल घाणा, पॅकिंग यंत्रणेसह विविध गरजेनुसार यंत्रांची खरेदी.

प्रक्रिया उद्योगाची वाटचाल

प्रकिया उद्योगामध्ये नऊ वर्षांचा अनुभव.

किलोवर नारळाची खरेदी. हंगामानुसार दरामध्ये चढ-उतार, परंतु सरासरी प्रति किलो ३० ते ३५ रुपये दर.

दर महिन्याला ३० ते ३५ टन नारळावर प्रकिया. खोबरेल तेल, पावडर, खोबरा तुकडा, खोबरा वडी, खोबरा वाटी, खोबरा कीस आणि शोभिवंत वस्तूंची निर्मिती.

हंगामानुसार उत्पादनाचे दर. साधारणपणे (प्रति किलो दर) खोबरा वाटी ११० ते १४० रुपये, वाळवलेला खोबरा कीस १६० ते १९० रुपये, खोबरा तुकडा १६० ते १९० रुपये, खोबरा पावडर २०० ते २३० रुपये, खोबरा वडी २५० रुपये, खोबरेल तेल २६० ते ३०० रुपये लिटर.यावर्षी शेंगदाणा तेल निर्मितीला सुरुवात.

विविध उत्पादनांचे पाव, अर्धा, एक, पाच, दहा किलोमध्ये पॅकिंग.

करवंटी प्रति किलो ७ ते १० रुपये दराने विक्री.

सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे विक्री. आता मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून उत्पादनांना मागणी.

उत्पादने ‘रेडी टू यूज’ असल्यामुळे ग्राहकांकडून पसंती. ई कॉमर्स, सोशल मीडियावरून विक्री.

उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘कोकोनट मास्टर’ ब्रॅण्ड निर्मिती.

करवंटीपासून पेन स्टॅण्ड, चहा कप

धनंजय राणे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वाया जाणाऱ्या नारळाच्या करवंटीपासून शोभिवंत वस्तूंची निर्मिती सुरू केली. यासाठी रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. दुकानदार तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार पेन स्टॅण्ड, बाउल, चहा कप, कॅण्डल लाइट, जग यांसह विविध वस्तू तयार केल्या जातात.

धनंजय राणे ७३५०३९४०७४, ९४२०३००९४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT