Jaggery Production Agrowon
यशोगाथा

Jaggery Industry : दौंड तालुक्यात गूळ उद्योगाचे ‘क्लस्टर’

Jaggery Production : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका गूळ उद्योगाचे जणू ‘क्लस्टर’च झाला आहे. तालुक्यातील अनेक गावे गूळनिर्मिती व्यवसायात गुंतली असून, येथील गुळाची लोकप्रियता परराज्यांपर्यंत झाली आहे. एकूणच या उद्योगातून तालुक्यातील कुटुंबे व पर्यायाने गावांचे अर्थकारण विस्तारले आहे.

गणेश कोरे

गणेश कोरे

Cluster of Jaggery Industry in Daund : उसाचे एकरी उत्पादन, वाढलेला खर्च, साखर कारखान्यांकडून मिळणारा दर व हाती पडणाऱ्या रकमेचा कालावधी या सर्व बाबी पाहिल्या तर ऊसशेतीचे अर्थकारण अनेक वेळा फायदेशीर ठरत नाही. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ऊस उत्पादकांना गुऱ्हाळांचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच तालुक्यात गूळ उद्योगाचे ‘क्लस्टर’ तयार झाले आहे.

या परिसरात बारमाही सिंचन सुविधा, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट यामुळे वाढलेल्या ऊस क्षेत्राला पर्याय म्हणून गुऱ्हाळांची संख्या वाढली. तालुक्यातील अनुभवी गुऱ्हाळ व्यावसायिक तात्याबा मोरे यांचा अनुभव बोलका आहे. ते सांगतात, की कानगाव, हातवळण, कडेठाण, आणि दापोडी या चार गावांमध्ये सुमारे १०० गुऱ्‍हाळे असावीत.

मागील ८ ते १० वर्षांत त्यांची संख्या वाढली आहे. उसाचे क्षेत्रही वाढले आहे. गुऱ्‍हाळ हंगाम ७ ते ८ महिन्यांचा असतो. या काळात प्रति गुऱ्हाळ दिवसाला दोन ते अडीच टनांपर्यंत गूळ उत्पादन होते. सर्व गुऱ्हाळांचा विचार केल्यास तालुक्यात मिळून १५० ते २०० कोटींची अर्थव्यवस्था उभी राहिली असावी.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नांदखिलेम्हणाले, की भीमा नदीच्या उरुळीकांचन ते कर्जत करमाळापर्यंतच्या किनाऱ्यालगत उपलब्ध पाण्यामुळे ऊसक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उसाला चांगले दर मिळण्याची शाश्‍वती झाल्याने दौंड तालुक्यात गुऱ्हाळांची संख्या १५ ते २० वर्षांत वाढत गेली. उत्तर प्रदेशातील कुटुंबेहीकामगार म्हणून उपलब्ध होऊ लागली. गूळ गुजरात बाजारपेठेत जाऊ लागल्याने पर्यायी अर्थव्यवस्था ग्रामीण भागात उभारली गेली.

गुऱ्हाळांना ऊस देणे झाले फायदेशीर

दौंड तालुक्यातील साखर कारखाने उसाला प्रति टन २७५० ते २८०० रुपये दर देतात. हाच दर गुऱ्हाळांकडून तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत दिला जातो. प्रति टन ३०० ते ४०० रुपये दर जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. शिवाय गुऱ्हाळघरांमध्ये शेतकऱ्यांच्या समोर उसाचे वजन होते.‘पेमेंट’ देखील १५ दिवसांमध्ये मिळते. बहुतांशी शेतकरी को ८६०३२ हेच वाण गुळासाठी वापरतात.

परराज्यापर्यंत ‘मार्केट’

दौंड भागातील गुळाने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड आदी राज्यांपर्यंत मार्केट मिळवले आहे. हंगामात तालुक्यातील चार प्रमुख गावांमधून सुमारे ७५ टन गूळ गुजरात राज्यातपाठविला जातो. पुणे बाजार समितीत दररोज बॉक्स व ढेपेच्या रूपात १०० टनांपर्यंत गुळाची आवक होते असे येथील व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवर घाऊक दर तीन हजार ७०० ते चार हजार ४०० रुपये प्रति क्विंटल तर किराणा मालांच्या दुकानांसह मॉलमधील विविध पॅकिंगमधील दर प्रति किलो ५० ते ६५ ते कमाल १०० रुपयांपर्यंत असतात. तर काही ब्रॅण्डसच्या आकर्षक पॅकिंगमधील गुळाचे गर १०० रुपये देखील असतात असेही बोथरा यांनी सांगितले. बाजारपेठेत एक किलोपासून पाच किलोच्या ढेपेपर्यंत आकर्षक पॅकिंग केले जाते.त्यामुळे बाजारपेठेत त्याचे मूल्य व मागणी वाढल्याचे गुऱ्हाळचालक सांगतात.

गुऱ्हाळे होताहेत अत्याधुनिक

दौंड भागातील बहुतांश गुऱ्हाळे पारंपरिक पद्धतीची आहेत. मात्र मजूरटंचाईमुळे ती स्वयंचलित करण्याकडे प्रयत्न होताना दिसत आहे. परिसरात दोन ते तीन गुऱ्हाळे या पद्धतीने गूळनिर्मिती करू लागली असल्याचे येथील व्यावसायिक रणजित मोरे यांनी सांगितले.

ते म्हणाले, की आमचेही याच पद्धतीचे गुऱ्हाळ आहे. पारंपरिक गुऱ्हाळघरात जिथे २५ मजुरांची गरज भासते तेथे स्वयंचलित गुऱ्हाळघरात ही संख्या केवळ १० ते १५ पर्यंतच भासते.

परिसरात झाली प्रगती

गुऱ्हाळ क्लस्टर विकसित झाल्याने दौंड तालुका परिसरात रोजगार निर्मिती झाली आहे. ऊस वाहतुकीसाठी गावांमध्ये ट्रॅक्टर्सची संख्या वाढली. शेतकऱ्यांच्या मुलांना त्यातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण झाले. ऊस उत्पादकांना उसासाठी शाश्‍वत दर मिळू लागला. त्यांचेही अर्थकारण सुधारले. दापोडीचे सरपंच आबासाहेब गुळाणे म्हणतात, की गुऱ्हाळांमुळे अर्थकारण उंचावून शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येऊ लागली आहे.

मुले उच्चशिक्षण घेऊ लागली आहेत. गार गावचे सुभाष चंद्रकांत आटोळे म्हणाले, की माझा तीन एकर ऊस असून नियमित गुऱ्हाळांना पुरवठा करतो. गुऱ्हाळांना वेळेत ऊस गेल्याने दुसरे पीक घेता येते. साखर कारखान्याच्या पेमेंटेला जिथे वर्ष- दीड वर्ष थांबावे लागते, तिथे गुऱ्हाळघरांकडून ‘पेमेंट’ एकरकमी व १५ दिवसांत मिळते.

भागातील निखिल मोरे म्हणाले, की आमचा १० एकर ऊस आहे. कानगाव परिसरातील गुऱ्हाळांना आम्ही ऊस देतो. कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांकडून जास्त दर मिळतो.

भागातील संतोष निगडे म्हणाले, की माझा तीन एकर ऊस असून, गरजेनुसार कारखाना किंवा गुऱ्हाळाला ऊस देतो. गेल्या वर्षी कारखान्याकडून प्रति टन २९०० रुपये दर मिळाला होता. तर गुऱ्हाळांनी ३००० ते ३२०० रुपयांपर्यंत दर दिला.

सुभाष आटोळे (ऊस उत्पादक), ९९२१४५०६६७

रणजित मोरे (गुऱ्हाळ व्यावसायिक, कानगाव), ८४८५८७३६०५

आबासाहेब गुळाणे (सरपंच, दापोडी), ९५२७३६९१९१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT