Agriculture Success Story : सांगली शहरापासून सुमारे ५० किलोमीटवर बेळगाव जिल्ह्यापासून कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. याच जिल्ह्यातील कागवाड तालुक्यात मंगसुळी हे गाव आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा जवळ असल्याने मराठी भाषा देखील इथले लोक सहजपणे बोलतात.
द्राक्ष पिकासाठी हे गाव आज प्रसिद्ध असले, तरी पंचवीस ते चाळीस वर्षांपूर्वी गावातील शेतकऱ्यांनी जिद्दीने, कष्टाने दुष्काळाशी लढत द्राक्ष पीक उभारले. अलीकडे बदलते वातावरण, नैसर्गिक आपत्ती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे गावातील द्राक्ष पीक काहीसे कमी झाले. आज ऊस हे प्रमुख पीक झाले आहे.
सिंचनाची केली सोय
गावातील गजानन शिवानंद मगदूम हे युवा शेतकरी असून त्यांची वीस एकर शेती. पूर्वी मका, बाजरी यासारखी पिके हे कुटुंब घेत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून पोटाची खळगी भरायची असा नित्यक्रम होता. मात्र आर्थिक परवड कमी झाली नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही गजानन यांचे वडील कधीच खचले नाहीत. त्यांनी शून्यातून शेती ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला.
दहा वर्षांपूर्वी एक एकरांवर देशी केळी लागवडीचा प्रयोग केला. परंतु पाण्याची शाश्वत सोय करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी गावातील शेतकरी एकत्र केले. त्यांना पाणी योजनेचे महत्त्व पटवून दिले. मग सामूहिक शक्तीतून सिंचन योजना सुरू झाली. त्यानंतर हळूहळू शेती बागायती होऊ लागली.
मग उत्पादन आणि उत्पन्न वाढीस मदत झाली. दरम्यानच्या काळात कृष्णा नदीवर असलेल्या कर्नाटक सरकारच्या योजनेचे पाणी कालव्याद्वारे आले. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर केळीचे क्षेत्र वाढू लागले. गजानन व त्यांचे वडील यांनी गावापासून नऊ किलोमीटवर असलेल्या कृष्णा नदीतून थेट पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. त्यासाठी फार मोठा म्हणजे काही लाखांचा खर्च आला.
केळी पिकाचा अभ्यास, प्रशिक्षण
गजानन सांगतात, की आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बारावीपर्यंतच शिक्षण मला पूर्ण करता आले. शेती कसण्याची जिद्द वडिलांकडूनच शिकलो. देशी केळीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यानंतर ग्रॅंडनैन केळीचा अभ्यास सुरू झाला. लागवडीचा निर्धार केला. कोल्हापूरचे पाहुणे प्रमोद चौगुले यशस्वी केळी बागायतदार होते.
त्यांनी या शेतीतील बारकावे, निर्यातक्षम गुणवत्तेसाठी व्यवस्थापन, तंत्रज्ञान आदी बाबींबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जळगाव येथील जैन कंपनीत जाऊन निर्यातक्षम केळी शेतीचे प्रशिक्षण घेतले. केळीचे वजन, गुणवत्ता यांचे बारकावे लक्षात घेतले. केळीला अपेक्षित दर मिळणे तसेच नैसर्गिक संकटांमधून नुकसान कमी होण्यासाठी लागवडीचा हंगाम महत्त्वाचा ठरतो.
त्यामुळे डिसेंबर, जानेवारीच्या दरम्यान लागवड हंगाम निवडला. या हंगामातील केळीची काढणी पावसाळा संपत असल्याच्या काळात होते. त्या काळात गणपती, दसरा आदी सण असल्याने केळीला मोठी मागणी असून अपेक्षित दरही मिळतात. योग्य हंगामामुळे जोखीम कमी झाल्याचे मगदूम सांगतात.
निर्यातक्षम उत्पादन व्यवस्थापन
उतिसंवर्धित ग्रॅंडनैन केळी लागवडीस एक एकरापासून सुरुवात केली. आजमितीला केळीचे क्षेत्र १३ एकर, पैकी लागवड सात एकर, उर्वरित खोडवा व निडवा. केळी पिकात दहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.
सहा बाय पाच फूट अंतरावर लागवड.
प्रत्येक तीन वर्षांनी एकरी १० ते २० टन शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर.
निडवा संपला की केळीचे अवशेष मातीआड केले जातात. फेरपालट म्हणून उसाची लागवड होते. त्यातून सेंद्रिय कर्ब वाढीस व जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.
सरीच्या दोन्ही बाजूंना ठिबकच्या इनलाइन लॅटरलचा वापर केला आहे. प्रति तासचार लिटर पद्धतीने पाणी देण्यासाठी प्रत्येकी दीड फुटांवर ड्रीपरचा वापर केला आहे. वाफसा पद्धतीने पाणी दिले जाते.
घडामध्ये केळींची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी जास्त असलेली फुलांची विरळणी केली जाते.
प्रति घडाला ९ ते १० फण्या ठेवल्या जातात. प्रत्येक फणीत सरासरी २२ पर्यंत केळींची संख्या ठेवली जाते. त्यामुळे आकार आणि लांबी एकसमान मिळते.
एकरी ३० ते ४० टनांच्या आसपास उत्पादन साध्य केले आहे. एकरी सरासरी दीड लाख रुपये उत्पादन खर्च येतो.
मगदूम यांनी दोन निर्यातदार कंपन्यांसोबत संपर्क ठेवला आहे. त्या माध्यमातून एकूण उत्पादनापैकी ८० टक्के निर्यात होते तर २० टक्के विक्री स्थानिक बाजारात होते. निर्यातक्षम केळीला प्रति किलो २० रुपयांपासून २५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळतो. मागील वर्षी २२ रुपये दराने विक्री केली होती.
घरच्यांची साथ ठरली महत्त्वाची
गजानन यांना वडिलांचा मोठा आधार होता. त्यांच्या कष्टांमुळेच शेती बागायती होण्यास मदत झाली होती. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शेतीचा आणि कुटुंबाचा आधार गेल्याचे गजानन सांगतात. आई सरोजनी व पत्नी विद्याश्री या देखील शेतीत राबतात. घरी पाच देशी दुधाळ जनावरे आहेत. त्यांची जबाबदारी पत्नी सांभाळते.
गजानन सांगतात, की सुधारित पद्धतीने एक एकरवर उती संवर्धित केळी लागवड सुरू केली होती. आता त्यात कसब आल्याने कितीही क्षेत्रावर व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो याचा आत्मविश्वास आला आहे. आमचा भाग कन्नड भाषिक असला तरी मराठी भाषाही बोलली जाते. आमच्या गावात ग्रंथालयात ‘ॲग्रोवन’ अंक येतो. त्यातील माहिती अत्यंत उपयुक्त असून त्याचा फायदा शेतीत झाला आहे.
गजानन मगदूम ७२५५०५०५०५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.