Sanen Goat Farming Agrowon
यशोगाथा

Sanen Goat Farming : सानेन शेळीपालनात हिवरे तर्फे नारायणगावचे बाळासाहेब झाले ‘मास्टर’

Success Story : भारतीय वायुदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बाळासाहेब मुळे (हिवरे तर्फे नारायणगाव, जि. पुणे) यांनी २० वर्षांपूर्वी सानेन जातीचे शेळीपालन सुरू केले. नेटक्या नियोजनातून व कुटुंबातील एकीतून या व्यवसायात त्यांनी चांगल्या प्रकारे स्थैर्य आणले आहे.

गणेश कोरे

Goat Farming : पुणे जिल्ह्यात नारायणगाव तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथे बाळासाहेब कुशाभाऊ मुळे यांचे कुटुंब राहते. त्यांची पारंपरिक साडेचार एकर शेती आहे. बाळासाहेब भारतीय वायुदलात तांत्रिक विभागात देशातील विविध भागांत कार्यरत होते. सन २००१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

त्यानंतर पूर्णवेळ शेतीतच लक्ष घातले. शेतीला पूरक व्यवसाय करण्याचे ठरविल्यानंतर शेळीपालनाचा पर्याय निवडला. व्यवसायातील अनुभव नव्हता. मात्र मित्राकडून आणि सासूरवाडीतून अशा एकूण दोन सानेन शेळ्या त्यांना भेट मिळाल्या होत्या. घरच्या दोन गायी होत्या. त्यात एका गायीची वाढ केली आणि शेळीपालनासह दुग्ध व्यवसायही सुरू केला.

उभारले सुसज्ज, नियोजित शेड

शेळ्यांची संख्या वाढू लागल्यानंतर पारंपरिक शेडची जागा कमी पडू लागली. शेळ्यांमध्ये रोगराई वाढू लागली. मरतुक होऊ लागली. मग २०१५ मध्ये मोठे आधुनिक शेड उभारण्याचे ठरविले.

त्यानुसार ५१ बाय ३१ फूट बंदिस्त तर ५१ बाय ३४ फूट अर्धबंदिस्त किंवा मुक्त शेडची उभारणी केली. यामध्ये दुमजली आकारात फळ्यांचा वापर करून, शेळ्यांच्या लेंड्या जमिनीवर पडण्याची व्यवस्था केली.

अशी रचना करण्याचे उद्दिष्ट म्हणजे हवेशीर वातावरण राहते. स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. आणि सोबतीला देशी कोंबडीपालनाचेही नियोजन आहे. येथे वयानुसार शेळ्यांची वर्गवारी व त्यानुसार स्वतंत्र कंपार्टमेंट्‍स केले आहेत. त्यानुसार आहार व्यवस्थापन करण्यात येते.

दैनंदिन व्यवस्थापन

--सध्या लहान- मोठ्या मिळून ४८ पर्यंत संख्या. यात २८ शेळ्या, दोन मोठे व ८ लहान बोकड, १० लहान शेळ्यांचा समावेश. सानेन ही जात बंदिस्त पद्धतीने चांगल्या प्रकारे राहू शकते. शिवाय पाटी घेण्याचा, देखभालीचा खर्चही कमी असल्याचे बाळासाहेब सांगतात.

- सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शेड स्वच्छता व शेळ्यांना चारा खाऊ घालणे.

-करडांना दूध पाजणे. सकाळी आठ वाजता मुक्त शेडमध्ये सोडणे, दुपारी पुन्हा बंदिस्त शेडमध्ये आणणे.

- करडांना वयाच्या चार महिन्यांपर्यंत दूध पाजण्यात येते.

- रात्री पशुखाद्य दिल्यानंतर गोठ्यातील लाइट बंद केले जातात. जेणे करून अंधारात शेळ्यांना चांगला आराम मिळतो.

-साडेचार एकर शेतीपैकी तीन एकरांत ऊस आहे. तर दीड एकरात मका, गजराज, मारवेल घास आदींचा समावेश आहे. याद्वारे वर्षभर ओला चारा उपलब्ध होतो.

-सकाळी डाळीची चुणी व संध्याकाळी कांडी यांचे खाद्यही शेळ्यांना वयानुसार दिले जाते.

-वयाच्या टप्प्यांवर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण केले जाते.

-शेडमध्ये जातिवंत व निरोगी पैदास व्हावी यासाठी जातिवंत बोकडाची खरेदी केली जाते. असे बोकड वाठार स्टेशन, श्रीगोंदा, नगर आदि विविध भागांतून शोधून आणले जातात. आपल्याच गोठ्यात तयार झालेला बोकड प्रजननासाठी वापरला तर आनुवंशिक आजारांचा प्रसार होऊ शकतो. शेळ्यांचा आनुवंशिक दर्जा खालावतो असे बाळासाहेब सांगतात.

-शेळीपालनाला एचएफ संकरित गायीपालनाची जोड दिली आहे. एकूण सहा गायी असून, पाच गाभण आहेत. दुधाच्या हंगामात दररोज ९० लिटरपर्यंत दूध संकलन होते.

-दरवर्षी सुमारे १० ते १२ टन लेंडीखत व तेवढ्याच प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर स्वतःच्या शेतात होतो. त्यातून अन्य खतांवरील खर्चात बचत होते.

विक्री व्यवस्था

दरवर्षी शेळ्या व बोकड मिळून २० ते २५ संख्येने विक्री होते. यात दीड चे चार वर्षे वयापर्यंतच्या पाटी व नरांचा समावेश असतो. प्रति किलो एक हजार रुपये किंवा वयानुसार १५ हजारांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत प्रति नग या प्रमाणे विक्री होते.

मोठ्या वयाच्या बोकडांची ६० हजार ते त्यापुढे किमतीला विक्री होते. बाळासाहेबांनी आपल्या व्यवसायाचे संकेतस्थळ तयार केले आहे. अनेक जण त्याआधारे शेळ्यांची चौकशी करतात. त्यानुसार त्यांना छायाचित्रे पाठविली जातात व त्यानंतर पुढील व्यवहार होतात.

संपूर्ण कुटुंब रमलेय व्यवसायात

माझी आई, मुलांची आणि नातवांची आई अशा तीन पिढ्यांना समर्पित म्हणून आपल्या ‘गोट फार्म’ला बाळासाहेब यांनी ‘मातोश्री’ असे नाव दिले आहे. बाळासाहेबांची पत्नी संगीता यांची मोलाची साथ मिळते. दोन मुलांपैकी मोठा सौरभ व त्याची पत्नी सुषमा संगणकीय पदवीधर आहेत. दोघेही शेळीपालनात रमले आहेत.

दुसरा मुलगा स्वप्नील एमई आहे. पत्नी प्राजक्तासह तो देखील शेतीतील कामांत शक्य ती मदत करतो. सर्वांच्या एकोप्यामुळेच शेती व पूरक व्यवसायात आर्थिकदृष्ट्या स्थिर होणे शक्य झाल्याचे बाळासाहेब सांगतात.

आजमितीला या व्यवसायात सुमारे २० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. भविष्यात दक्षिण आफ्रिका किंवा इस्राइलहून सिमेन आणून त्यांच्याद्वारे जातिवंत शेळी उत्पादनाचे नियोजन आहे. संबंधित देशात शेळीपालनाचे शिक्षण घेण्यासाठी मुलगा प्रयत्नशील असल्याचे बाळासाहेब सांगतात.

संपर्क : बाळासाहेब मुळे, ८२०८५७८२०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT